ज्याचे करावे भले..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
9 Sep 2020 - 7:53 pm

मी आजवर अनेकजणांना आर्थिक आणि इतरही मदत केली आहे. मला बऱ्याच वेळा यश आले पण जास्त वेळा वाईट अनुभव आले. त्यातले नमुन्यादाखल अगदी थोडे किस्से सांगावेसे वाटतात.

माझ्या घरच्या प्रत्येक कामवालीचे मी बॅंकेत खाते काढून दिले.
त्यांच्या पगाराची काही रक्कम त्यांच्या अनुमतीने त्यांच्या खात्यात जमा केली. बचतीची सवय व्हावी हा उद्देश. माझ्या एकुलत्या एक मुलाला सोबत म्हणून कायम एखादा गरजू मुलगा किंवा मुलगी घरी सांभाळली. तिला/त्याला शाळेत घातलं.
कपडालत्ता, वह्या पुस्तकं, फी याची काळजी घेतली. मुलींच्या लग्नासाठी खर्चात मदत केली. भांडीकुंडी दिली. इतर कितीतरी मुलांचे क्लासेसचे पैसे भरले. पुढे त्यांच्या नोकरीसाठी खटपट केली.

आपण सगळेच अशी मदत करत असतो. पण आपणा सर्वांनाच बहुधा बरेवाईट अनुभव येत असावेत.

असाच एक तरुण मुलगा. लहान गावातून आलेला. शिक्षण बेताचं. दहावी पास. तो आमच्या घरी मदत मागायला आला. त्याला माझ्या मिस्टरांनी खटपट करुन नोकरी लावून दिली. पण नोकरी कष्टाची होती. जड शारिरीक काम, वेल्डिंग करावे लागे. त्याला जरा सुखाची नोकरी मिळावी म्हणून मी त्याला म्हटले, तू टायपिंग शिक. चांगला क्लास शोधला आणि त्याची टायपिंगची फी भरली. पुढे दरमहा मी त्याला घरी बोलवायची. त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायची. त्याला जेवू खाऊ घालायची. घरापासून दूर एकटा राहात होता म्हणून.
त्याला दरमहा माझ्याकडं फीचे पैसे मागायला ऑकवर्ड होऊ नये म्हणून त्याने न मागता त्याच्या हातात फीचे पैसे ठेवायची. फी भर असं सांगायची.

असे चार महिने झाले. एका निमसरकारी ऑफिसमध्ये काही पोस्टस् भरायच्या होत्या. टायपिस्टच्या. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर तिथे ऑफिसर होते. त्यांच्याकडं या मुलासाठी शब्द टाकला. ते हो म्हणाले.

त्यांनी याला म्हटलं,"तू तुझं टायपिंग क्लासचं सर्टिफिकेट घेऊन ये. तुला नोकरी मिळू शकेल.

अनेकदा सांगूनही त्यांनी सर्टिफिकेट आणले नाही. मग मी माझ्या मिस्टरांना त्याच्या क्लासमध्ये चौकशी करायला सांगितले. तर क्लासवाला म्हणाला, "साहेब,तो फक्त आठवडाभर क्लासला आला. नंतर आलाच नाही. क्लासची फीही भरलेली नाही. कसलं सर्टिफिकेट देणार?"

ते ऐकून मी हतबुद्ध झाले. म्हणजे मी दरमहा देत असलेले फीचे पैसे घेताना हा एकदाही म्हणाला नाही की,"मला पैसे देऊ नका मी क्लासला जात नाही."

मग त्या पैशाचं तो करायचा काय? आणि मी मात्र त्याला पैसे मागायचीही वेळ येऊ द्यायची नाही. स्वतःहून द्यायची. त्याच्या मनाचा विचार करुन. मी त्याच्यावर चिडले. पण एका अक्षराने त्याला रागाने बोलले नाही. तो फक्त साॅरी म्हणाला. काही दिवसांनी तो त्याच्या आईकडे निघून गेला.

माझ्याकडे कामाला एक मुलगी होती. तिला शाळा वगैरे शिकवून मी तिच्या बॅंकेत पैसे टाकले. तिचं लग्न झालं. तरीही ती माझ्याकडे काम करतच होती. मी नोकरीला जायची. घरात ती आणि माझा मुलगा असायचे. मुलगा शाळेत गेला की ती घरी एकटीच असायची. माझ्या लक्षात आलं की घरातले टोपलीतले कांदे, बटाटे, डब्यातले डाळ, तांदूळ हळूहळू कमी होत आहेत.
पण पुरावा नसताना तिच्यावर आळ कसा घेणार? एकदा माझे सासरे आमच्याकडे राहायला आले. मी त्यांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. एकदा त्यांना काॅटखाली एक पिशवी दिसली. त्या पिशवीत त्यांना गहू भरून ठेवलेले दिसले. जरा वेळाने ती मुलगी सासऱ्यांना म्हणाली,"माझी वेळ संपली. मी घरी जाते." जाताना ती गव्हाची पिशवी काॅटखालून काढून लपवत लपवत घेऊन गेली. सासऱ्यांना शंका आली. मी कामावरून आल्यावर ते म्हणाले,"तू कामवालीला गहू दळून हा आणायला सांगितलंस का? ती गहू घेऊन गेलीय."

दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांनी तिला त्या पूर्ण महिन्याचे पैसे देऊन कामावरून कमी केले. मी तिला केलेली सगळी मदत ती विसरली होती. तिला पश्चात्ताप झाला. ती रडली. मलाही वाईट वाटले. गरीबी वाईट असा विचार मनात आला.

आता एकच किस्सा सांगते. आमच्या नव्या काॅलनीचं बांधकाम अजून चालू होतं. पण आमचं घर पूर्ण झालं म्हणून आम्ही लवकर राहायला आलो होतो. बांधकाम साहित्याच्या रक्षणासाठी एक वाॅचमन ठेवला होता. त्याची फॅमिली घेऊन तो आमच्या काॅलनीतच एका शेडमध्ये राहात होता. त्याला दोन मुलं होती. एक मुलगी, एक मुलगा. ती दोघंही कुपोषित होती. मी ठरवलं, त्या दोघांना दूध प्यायला द्यायचं. सकाळी माझ्या घरच्या रतीबाच्या दुधाच्या पिशव्या आल्या की मी त्यातली अर्धा लिटरची पिशवी त्याच्या बायकोला हाक मारून तिच्या हातात द्यायची. मुलांना प्यायला दे असं सांगायची. तीही, "हो ताई, देते प्यायला" असे म्हणून पिशवी घेऊन जात असे.
एक दीड महिना झाला, मला मुलांच्या तब्येतीत फरक दिसेना. मग न राहवून मी तिच्या मुलीला विचारलं की रोज दूध पिता की नाही? ती म्हणाली,"आई आमाला दूद प्याला देत न्हाई. ती आन बाबा दोनदा चा करून पितात." मला त्या बाईचा राग आला. ती माझ्याकडून रोज दूध घेऊन जायची आणि मुलांना द्यायचीच नाही. बरं, तुझ्या मुलीनं मला असं सांगितलं असं तरी कसं सांगायचं? त्या मुलीला मार बसला असता. मग मी एक युक्ती केली. वाॅचमनला बोलावून सांगितले,"तुझ्या दोन्ही मुलांना तू उद्यापासून माझ्या घरी पाठवत जा. मीच दूध देईन त्यांना." दुसऱ्या दिवसांपासून ती दोन्ही मुलं माझ्या घरी यायची. आणि मी त्यांना माझ्यासमोर दूध , बिस्किटे द्यायची.
महिन्याभरात मुलांची तब्येत सुधारली. पण नंतर काॅलनीचं बांधकाम संपलं आणि तो वाॅचमन दुसऱ्या कामावर गेला.

अशी कितीतरी उदाहरणे आहेत. काही थोड्याजणांनी मी केलेल्या मदतीचा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुधारलं. पण खूप जास्त जणांनी फसवलं..

मला काही वेळा वाटतं ज्या माणसांनी माझीच मदत घेऊन शेवटी मलाच अपयश दिलं, त्यांच्यामुळे माझा इगो हर्ट झाला का? म्हणून मी चिडले का? तसं असेल तर ती माझीच चूक आहे.

इतक्या जणांना मदत केल्यावरही दान सत्पात्री करावं इतकंही मला कळू नये?

समाजजीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

जास्त विचार करू नका आजी. १० मधल्या २ लोकांना जरी नीट मदत झाली आणि त्यांनी त्याचा फायदा (गैर फायदा नाही) घेतला तरी खूप झालं म्हणायचं. आपल्याला वाटलं कि आपण मदत करत राहायची, केली नाही तरी नंतर आपल्यालाच वाईट वाटतं.

गरीबी वाईट असा विचार मनात आला >>
गरीबी आणि चोरटेपणा या २ वेगळ्या गोष्टी आहेत. सगळे गरीब चोरटे नसतात आणि सगळे चोरटे गरीब नसतात. एखादीला खरंच अडचण असती तर तिने तुम्हाला सांगितलं असतं कि मदत करता का मी तुमची अजून ४ कामं देते. कामवाल्या बायका हे सर्रास करतात. आत्ता गरज आहे, जास्त पैसे द्या सणावाराला अन्नधान्य द्या मी पुढच्या महिन्यात फेडते.

मदतीचा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुधारलं. पण खूप जास्त जणांनी फसवलं.>>
आपण मदत करायची ती आपल्याला नंतर चुटपुट लागू नये म्हणून, ते फायदा करून घेतायत कि नाही हे त्यांचं नशीब.

Gk's picture

9 Sep 2020 - 10:15 pm | Gk

छान

शा वि कु's picture

10 Sep 2020 - 8:18 am | शा वि कु

माझीच मदत घेऊन शेवटी मलाच अपयश दिलं, त्यांच्यामुळे माझा इगो हर्ट झाला का? म्हणून मी चिडले का? तसं असेल तर ती माझीच चूक आहे.

अगदी प्रांजळपणे लिहिलेय.
काही वेळेस कुणाचीच चूक नसते असे मला वाटते. देणाऱ्यास एखादी गोष्ट अग्रक्रमी वाटते, तर घेणाऱ्याला आणखी १० गोष्टी अग्रक्रमी दिसत असतात.

राजाभाउ's picture

24 Sep 2020 - 1:34 pm | राजाभाउ

हे बरोबर आहे, हे या आधी लक्षात नव्हते आले, आणि ईथ कुणाचा आग्रक्रम बरोबर हाही मुद्दा गैरलागू आहे, कारण ते सापेक्ष आहे.

योगी९००'s picture

10 Sep 2020 - 9:07 am | योगी९००

तुम्ही मदत करता लोकांना याचे कौतूक वाटले.

काही थोड्याजणांनी मी केलेल्या मदतीचा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुधारलं. पण खूप जास्त जणांनी फसवलं..

मला काही वेळा वाटतं ज्या माणसांनी माझीच मदत घेऊन शेवटी मलाच अपयश दिलं, त्यांच्यामुळे माझा इगो हर्ट झाला का? म्हणून मी चिडले का? तसं असेल तर ती माझीच चूक आहे.
जास्त विचार करू नका. तुम्हाला मदत केल्यामुळे समाधान वाटले असेल तर तोच आनंद त्यांनी मदतीची परतफेड केली किंवा त्यांचे आयुष्य सुधारले यापेक्षा जास्त आहे. बर्‍याच वेळा आपण शक्य असूनही मदत करत नाही. नंतर याचे जास्त वाईट वाटत रहाते. अब्राहम लिंकनची गोष्ट आठवा...

लहान तोंडी मोठा घास घेत आहे..

१. मला वाटते आपण स्वतःच्य समाधानासाठी मदत करत रहावी..
त्याचे भले व्हावे म्हणून नाही, तर त्याला मदत केली नाही तर मला माझे मन खाईल म्हणून.

२. शक्यतो "हातात पैसे देणे टाळावे" जसे घर घेताना बँक कर्जाचा चेक घरमालकाच्या नावाने काढते तसे.. हातात पैसा असला कि पैशाला पाय फुटतात.

३. चोरी करणे किंवा फसवणे ही मानसिक गरिबी आहे. त्याचा आर्थिक गरीबीशी काहीही संबंध नाही.

जयन्त बा शिम्पि's picture

10 Sep 2020 - 3:16 pm | जयन्त बा शिम्पि

असे अनुभव मलाही आलेले आहेत. एका मोलकरणीला, बँकेत खाते उघडता येत नव्हते,कारण कायमस्वरुपी तिचा पत्ता नव्हता. रेशनकार्ड गावाकडील होते. ती आमच्याकडेच रहाते असे बँकेला सांगून ( बँकेत ओळख असल्याने ) बचत खाते सुरु करुन दिले. सोसायटीच्या कार्यालयाचे साफसफाईचे काम मिळवुन दिले. तिच्या मुलीचे लग्न निघाले म्हणुन महाड-पोलादपुर कडील तिच्या गावी जावुन लग्नास हजर राहिलो. जाता-येता प्रवासात त्रास झाला, तो वेगळाच ! ! इतके सारे करुन , जेव्हा आम्ही दोघे, मोठ्या मुलाकडे, अमेरिकेत सहा महिन्यांसाठी गेलो, त्यावेळी घरकामासाठी अनियमितपणे येवुन, छोट्या सुनबाईस त्रास दिला. ( दोन लहान जुळ्यांना सांभाळुन , घरकाम करणे अवघड होत होते.) आणि आम्ही भारतात परत येईपावेतो, कायमस्वरुपी काम सोडुन सुद्धा दिले. यातुन एकच धडा.. त्यांच्या गरीबीची फार दखल न घेणेच उत्तम.

ते म्हणतात ना, 'नेकी कर और पानीमें डाल!!'

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 10:01 am | सुबोध खरे

मला आलेल्या अनुभवांपैकी दोन अनुभव लिहितो आहे.

साधारण दीड वर्षांपूर्वी मी माझी सॅंडल शिवायला मुलुंड स्टेशन जवळच्या गटई कामगाराकडे (चर्मकार) गेलो होतो. ते शिवत असताना त्याचा भिशीवाला आला ( जो यांच्याकडून रोज अल्पबचतीसारखे १०-२० रुपये घेऊन जातो) आणि हा कामगार त्याच्याकडे अत्यंत अजीजीने २० हजार रुपये उधार मागत होता. त्याचे दाजी आजारी आहेत म्हणून. इतका वेळ गयावया केल्यावरही त्या भिशी वाल्या माणसाने त्याला पैसे देण्यास नकारच दिला. त्याचे गयावया करणे पाहून तो माणूस गेल्यावर माझ्या खिशात असलेले पाच हजार रुपये काढून मी त्याला दिले. त्याला सांगितले कि मी डॉक्टर आहे आणि तुझ्या दुकानापासून २ मिनिटावर माझा दवाखाना आहे. माझे कार्ड त्याला दिले आणि सांगितले कि जसजसे जमेल तसे पैसे परत कर. आजतागायत त्याने एकही पैसा परत केलेला नाही. मध्ये एकदा परत चप्पल शिवायला गेलो त्याचे ३० रुपये दिले आणि विचारले मला ओळखले का? त्यावर त्याने तुम्ही डॉक्टर आहात दवाखाना येथे आहे वगैरे सर्व काही सांगितले पण पैसे परत करण्याचे नाव नाही.

काही दिवसांपूर्वी एक दुसरा गटई कामगार (चर्मकार) पोटात खूप दुखत होते म्हणून आला होता. मी त्याची सोनोग्राफी करून पोटात फक्त सूज आहे, औषधाने ठीक होईल शल्य क्रियेची गरज नाही असे नीट समजावून सांगितले.

त्याने गेले काही दिवस कामच नाही कारण माणसे बाहेर पडत नाहीत कोणाची पादत्राणे तुटत नाहीत आणि नवीन बांधलेल्या चपला पण कोणी घेत नाही इ. गंभीर आणि वाईट वस्तुस्थिती सांगितली.यावर करूणा येऊन मी त्याला १,०००/- रुपये सवलत दिली. माझ्या स्वागत सहायिकेशी बोलणेही झाले कि लोकांची स्थिती कशी गंभीर आहे इ इ.

दुसऱ्या दिवशी दुपारी हेच महाशय जवळच्या वाईन शॉप मधून दोन बाटल्या विकत घेऊन जात असताना पाहिले. मला पाहून त्याने तोंड फिरवून दुसऱ्या दिशेने कूच केले. ते पाहून माझ्या मनात संताप वैफल्य आणि वाईट वाटणे अशी संमिश्र भावना आल्या.

काही लोकांमध्ये गरिबी ही आर्थिकच नव्हे तर मानसिक दुःस्थिती आहे असेच म्हणावे लागेल.

बाप्पू's picture

11 Sep 2020 - 2:19 pm | बाप्पू

काही लोकांमध्ये गरिबी ही आर्थिकच नव्हे तर मानसिक दुःस्थिती आहे असेच म्हणावे लागेल

सहमत.. असे अनुभव खूप वेळेला आलेत.. लोकांना मदत आपण एका उद्देशाने करतो कि त्यांचं चांगलं व्हावे. पण त्यांना त्यांची चिंता ना फिकीर.. !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2020 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी, सर्व अनुभव वाचले. आपण मदत करीत गेलात आणि लोक कृतघ्न निघत गेले, आपण लोकांना मनापासून मदत करतो, कारण आपल्याला आनंद मिळतो. कोणाची तरी निकड होती, ते पुरे करतांना एक समाधान असतं. पण, जेव्हा लोक अशा मदतीनंतरही विचित्र वागतात तेव्हा अशी मदत करु नये असेच मनात येते. आपले अनुभव असेच आहेत.

पण तरीही मदत करणे सोडू नये. नेकी कर दरिया में डाल असे म्हणून आपण मदत करीत राहु या. असे बरेच उदाहरणे माझीही आहेत. आमच्याकडे माझी आई अशा गरजूंना राहु दे बाई म्हणून काहीना काही गरजूंना सढळ हाताने काही ना काही देत असतेच. मी अनेकदा (लटकं) रागावतो, असेच करीत राहीलो तर त्यांना सवय लागेल वगैरे. पण तिचं सुरुच असतं. माझंही अधुनमधून असे काही सुरुच असते. आताची एक गोष्ट. लॉकडाऊन सुरु व्हायच्या अगोदर माझ्या कॉलेजवर एक टेम्प्रररी रोजंदारीवर काम करणारा गृहस्थ, बै माणूस आजारी आहे, पाचशे रुपये द्या म्हणे, दोन दिवसांनी पगार होईल तेव्हा देतो. महिनाभर मला पाहिलं की कट मारीत राहीला. चालायचंच.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

11 Sep 2020 - 2:16 pm | प्रचेतस

उत्तम लेख.
कितीही गरज असली तरी लोकांना अशी मदत करावी की नाही असंच वाटतं आता.

ह्याच विषयावर धन्याने लिहिलेला लेख आठवला.

पैसे सोडून बोल...

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2020 - 3:07 pm | चौथा कोनाडा

तुमचे अनुभव वाचून वाईट वाटले.
छान व्यक्त झालात, मनातली उद्विगता उत्तम मांडलीय.
चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे असतात, त्यांनी फसवले तर आपण नाउमेद होऊ नये.
पुढे जमेल तेवढं नीट पारखून मदत करावी!

संजय क्षीरसागर's picture

11 Sep 2020 - 3:10 pm | संजय क्षीरसागर

आपल्याला तसं करावसं वाटतं म्हणून करतो. हे एकदा लक्षात आलं की त्याचा हिशेब मनात रहात नाही.
मग त्यानं कसं वागायचं हा त्याचा प्रष्ण आहे.

तो जर कृतज्ञ राहिला तर कौतुक; कृतघ्न झाला तर त्याला अश्वदर्शन घडवून कायमचा बाद करायचा.

कपिलमुनी's picture

11 Sep 2020 - 3:29 pm | कपिलमुनी

म्हणजे नक्कि काय करायचे ?
तुम्ही आजवर कोणाला कायमचा बाद केले आहे का ? असल्यास अनुभव शेयर करून ज्ञानदान करावे

राजाभाउ's picture

24 Sep 2020 - 1:52 pm | राजाभाउ

सर,

आपल्याला तसं करावसं वाटतं म्हणून करतो

हा मुद्दा परफेक्ट कळाला, आपण आपल्या भावनिक स्वार्था (emotional interest) साठी करतो हे लक्षात घेतले तर समोरच्या कडूनच्या अपेक्षा कमी होतात्/रहात नाहीत.
कुणी आपल्या मदतीचा गैरवापर केला , फसवले तर त्याला परत मदत न करणे हे ही व्यवहारीक आहे. पण एकदा हिशेब मनात रहात नाही म्हणल्या वर कृतज्ञ व कृतघ्न अशी वर्गवारी कशी करणार ? कारण कृतज्ञ व कृतघ्न या शब्दा मध्ये समोरच्यानी आपल्याशी कसे वागावे या संबंधी काही अपेक्षा आहेत.

फरक आहे. एखादा पगार झाल्यावर लगेच पैसे परत करतो म्हणाला आणि मग अनेक पगार होऊन सुद्धा त्यानं टाळाटाळ सुरु केली तर निर्लज्जपणे तगादा लावून सगळे पैसे वसूल करणं आणि मग त्याला कधीही मदत न करणं हे व्यावहारिक आहे.

राजाभाउ's picture

25 Sep 2020 - 12:32 pm | राजाभाउ

हो ते मान्यच आहे, व ते व्यावहारिक आहे हे मी ही म्हणलय, पण हीशोब ठेवायचा नाही म्हणल्यावर कृतज्ञ, कृतघ्न हे थोड जास्त तीव्रतेचे शब्द वाटले म्हणुन विचारले, बाकी तुमचा मुद्दा बरोबर पोहोचलाय.

संजय क्षीरसागर's picture

25 Sep 2020 - 12:52 pm | संजय क्षीरसागर

त्याऐवजी प्रामाणिक आणि बेरकी शब्द वापरा. एकूणात मुद्दा कळला की झालं !

कंजूस's picture

11 Sep 2020 - 3:54 pm | कंजूस

फार वाईट अनुभव.

यांच्याकडे खूप पैसे आहेत, थोडे बुडवले तर काही होत नाही ही वृत्ती असते. एक दोन वाईट अनुभव आल्यावर मदत बंदच करायची. काही संस्था आहेत त्यांच्या पेटीत अधूनमधून पैसे टाकून यायचे.

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 8:27 pm | सुबोध खरे

यांच्याकडे खूप पैसे आहेत, थोडे बुडवले तर काही होत नाही ही वृत्ती असते
कसं बोललात?

सेम. यांच्याकडे खूप पैसा आहे.. यांना काय कमी आहे.. थोडे आम्हाला दिले तर काय फरक पडतो.. अशी त्यांची विचारसरणी असते. त्यामुळे आपण एखाद्याला आर्थिक मदत केल्यावर बऱ्याच लोकांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसते. आपल्याबद्दल कधीही ते उपकाराची भावना ठेवत नाहीत..

तसेच.. "यांना पैश्याची काय कमी आहे" असं आपल्याबद्दल म्हणताना आपण पैसा मिळवण्यासाठी करत असेलेला त्याग, धावपळ, कष्ट याकडे ते ढुंकून ही बघत नाहीत.

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2020 - 10:18 pm | चौथा कोनाडा

सवलती, अंशदान, आरक्षण, कर्जमाफी, अतिक्रमण, वशिलेबाजी, वेळकाढूपणा, कामचुकारपणा असली संस्कृती जपलेल्या लोकांकडून फारशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही !

बबन ताम्बे's picture

12 Sep 2020 - 8:34 am | बबन ताम्बे

कृतघ्न लोक आयुष्यात कधी ना कधी भेटतातच.
एक खूप जुना किस्सा शेअर करावासा वाटतो. अमेरिकेत 9/11 झाले , dot com चा फुगा फुटला आणि त्यांनतर तिथल्या बऱ्याच भारतीयांना जॉब गेल्यामुळे भारतात परत यावे लागले.
माझ्या बिल्डिंगमधल्या एका व्यक्तीने मला विचारले तुमच्या कम्पनीत माझ्या साडू साठी प्रयत्न करता का. अमेरिकेत नोकरी गेल्यामुळे तो इकडे आलाय आणि नोकरी नसल्यामुळे खूप तणावात आहे. घरी नवरा बायको खूप डिस्टर्ब आहेत. म्हटले ठीक आहे, तुम्ही त्याचा रेज्युमी द्या, मी बघतो प्रयत्न करून. आमच्या कम्पनीने नुकतीच पुण्यात सबसिडरी सुरू केली होती त्यामुळे काही जागा भरायच्या होत्या. मी एच आरला त्याचा रेज्युमी दिला.
एक आठवड्याने एच आर ने मला बोलावले आणि विचारले की तुम्ही ज्या माणसाला रेफर केले होते तो तुमच्या ओळखीचा होता का? मी म्हटले नाही, माझ्या शेजारी आहे त्याचा नातेवाईक आहे.
एच आर मॅनेजर म्हणाला की तुमच्या चांगला ओळखीचा असल्याशिवाय जॉब साठी कुणाला रेफर करू नका. तुम्ही रेफर केलेला माणूस इंटरव्ह्यूसाठी दारू पिऊन आला होता. आम्ही त्याला सिक्युरिटीच्या मदतीने परत पाठवले.यात तुमचा पण तोटा आहे. पुढच्या वेळी अजून कुणी कँडीडेट तुम्ही रेफर केला तर आम्हाला विचार करायला लागेल.
मी कपाळावर हात मारून घेतला.

कोणत्याही माणसाच्या नोकरीसाठी शिफारस करण्यापूर्वी त्या माणसाला एकदा भेटावे असेच मी सुचवतो कारण हा माणूस नम्र आहे कि उर्मट/ दीड शहाणा आहे हे तुम्ही त्याच्याशी बोलल्यावर बऱ्याच वेळेस समजून येते.

अर्थात धूर्त माणसे नोकरी मिळेपर्यंत नम्र पणे वागतात आणि नंतर खरे रंग दाखवतात पण एकदा भेटल्यावर साधारणपणे माणसाची पारख होऊ शकते.

नोकरी लागल्यावर करायची गोष्ट त्यानी इंटरव्यूलाच केली !

बबन ताम्बे's picture

12 Sep 2020 - 4:07 pm | बबन ताम्बे

पण जर त्याला नोकरीची एव्हढी गरज होती, तर तो एव्हढा मॅनर्सलेस का वागला हे कोडे काय उलगडले नाही.

संजय क्षीरसागर's picture

12 Sep 2020 - 4:16 pm | संजय क्षीरसागर

म्हणजे कोडं उलगडेल.

बबन ताम्बे's picture

12 Sep 2020 - 7:11 pm | बबन ताम्बे

या गोष्टीला 18 वर्षे झाली. आता तो कुठे आहे माहीत नाही.

मदत घेणे आणि मदत करणे दोन्ही अनुभव असल्या मुळे माझी काही मत आहेत.
शक्यतो कधीच कोणाची मदत घेवू नका मदत घेतल्याने व्यक्ती मदत करणाऱ्या व्यक्तीला बांधील होते .
उपकारच बोजा आयुष्य भर डोक्यावर राहतो.
तुम्ही पुढे स्वतः यशस्वी झालात तरी मदत करणारा हा माझ्या मुळेच स्थिर झाला असे सूनवू शकतो .
शक्यतो मदत घेणे टाळा.
काही काम कोणाची मदत घेवून करणे गरजेचे वाटेल तेव्हा त्या मदतीची लगेच परत फेड करा म्हणजे ती देवाण घेवाण होते उपकार होत नाहीत.
मी काही जणांना मदत पण केली पण जेव्हा केली तेव्हाच ती विसरून पण गेलो.
मित्र मंडळी,नातेवाईक मध्ये आर्थिक व्यवहार ठेवलेच नाहीत .
आर्थिक मदत करायची तर ती विसरून जायची मित्र मंडळी मध्ये.
पैसा हा चांगले संबंध बिघडवू शकतो.

लोकांची पारख करता आली पाहिजे .
संधी साधू कोण सभ्य लोक कोण हे ओळखता आले की बरेच प्रश्न मिटतात.
चारच मित्र असावेत पण जीवाला जीव देणारे पैसे हे जिवापुढे किरकोळ च.
माझे थोडेच मित्र आहेत काही करोडपती तर काही अगदी किरकोळ .
पण पैसा हा आमच्या मध्ये कधीच आला नाही.
आता अर्ध वय झाले पण प्रेम तेच.
संकटात धावून येणे तेच.
कोणालाच मदत केली म्हणजे उपकार केले अशी भावना येत नाही.

वीणा३-"जास्त विचार करू नका.आजी,आपण मदत करायची त्यांनी फायदा घेतला तर त्यांचं नशीब."पटलं तुमचं म्हणणं.

GK- "छान". धन्यवाद.

शाविकु- खरंय.ही गोष्ट मी लक्षात घ्यायला हवी.

योगी९००-"जास्त विचार करू नका.तुमचं समाधान खूप मोठं आहे." हे तुमचं म्हणणं पटलं.

आनन्दा-"शक्यतो हाताने पैसे देणे टाळावे.हातांत पैसा आला की त्याला पाय फुटतात." योग्य आहे तुमचं म्हणणं! संस्थांना मी चेकनेच मदत देते.

जयन्त बा शिम्पि-तुम्हांलाही वाईट अनुभव आला ना!आपण समदुःखी आहोत.

Cuty-"नेकी कर और पानी में डाल.असं वागा."हे तुमचं म्हणणं पटलं.

सुबोध खरे-"गरीबी ही आर्थिक नव्हे तर मानसिक दुःस्थिती आहे."हे तुमचं म्हणणं चपखल आहे. तुम्ही तुमचेही अप्रिय अनुभव दिले आहेत.

बाप्पू-सुबोध खरेंशी तुम्ही सहमत आहात. असे अनुभव खूप वेळा आलेत.

प्रा. डॉ.दिलीप बिरुटे-तुम्हांलाही असेच अनुभव आलेत.तुम्ही म्हणता,"चालायचंच.नेकी कर और दरिया में डाल." बरोबर. मान्य.
प्रचेतस-"उत्तम लेख"धन्यवाद.

चौथा कोनाडा- अभिप्राय वाचून समाधान वाटले.

संजय क्षीरसागर-"मदत करावीशी वाटते म्हणून करावी.ते कृतज्ञ राहोत की कृतघ्न." हे तुमचं म्हणणं विचार करण्यासारखं.

कंजूस-"संस्थेच्या पेटीत पैसे टाकायचे." हेही मला रिस्की वाटतं. त्यापेक्षा चेक द्यावा.

चौथा कोनाडा- तुम्ही नेमकं वर्मावर बोट ठेवलंय.अभिनंदन.

बबन ताम्बे- तुमचा अनुभव वाचला. फारच वाईट अनुभव आला तुम्हाला.

Rajesh 188-"मदत घेणे टाळावे.पैसा हा चांगले संबंध बिघडवतो." हे तुमचे विचार 'मूले कुठारः'अशा स्वरुपाचे मूलभूत आहेत. चांगलं आहे.