कथा एअरकंडिशनिंगची ः एका अनुभवाचा सारांश

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जनातलं, मनातलं
8 Sep 2020 - 9:53 pm

मी एका ठिकाणी ग्रंथालय व माहिती केंद्रात काम करीत होतो. तेथे असलेल्या वातानुकूलन यंत्र बिघडलेले होते. थोड्या दुरुस्तीनंतर ते यंत्र पुन्हा सुरु होत असे व पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. नव्या यंत्राची निकड होती. नवीन यंत्र घ्यावे किंवा केंद्राची पूर्ण खोलीच वातानुकूलित करावी असे दोन पर्याय समोर येत होते.
मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख माझे साहेब होते. त्यांना आपण म्हणू या. त्यांच्यासमोर विषय मांडला. त्यांनी तो वीज व ऊर्जा विभागाच्या प्रमुखांना पाठवला. या प्रमुखांनी सांगितले की, संपूर्ण जागा वातानुकूलित करणे खर्चिक आहे. त्यापेक्षा आकाराने लहान असलेला एक हॉल बांधू. त्यात तुम्हाला बसायला व भेट देणाऱ्या काही लोकांना जागा असेल. तेवढी जागा वातानुकूलित करता येईल. हे पटण्यासारखे होते. ग्रंथालय व माहिती केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की, माहिती केंद्र हे नफा मिळवून देणारे केंद्र नाही. त्यामुळे त्यावर खर्च करणे परवडत नाही.
हा नेहमीचाच अनुभव असतो. लहान आकाराच्या हॉलची ती योजना मी मंजूर केली. खूप काही मागून हाती काहीही न लागण्यापेक्षा थोडेसे का होईना पदरात पाडून घ्यावे, हा हेतू होता.
पुढे, दुदैवाने यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर एक साहेब काम करू लागले. त्यांना आपण क्ष म्हणू या. मनुष्यबळ विकास विभागाने विविध विभागांच्या गरजा, गैरसोई जाणून घ्यायच्या असतात व त्यावर मार्ग काढायचा असतो. क्ष जरा स्वार्थी होते. त्यांना स्वतःचेच भले बघण्यात रस होता. शिवाय, जिथे जिथे म्हणून खर्च वाचवता येईल तिथे ते वाचवत असत. चांगले झाले की स्वतःमुळे झाले व वाईट काही झाले की, त्यांची जबाबदारी दुसऱ्यावर असाही एक त्यांचा स्वभाव होता.
मी त्यांच्याकडे माझी वातानुकूलनाची गरज मांडली. त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांचा रंग मला कळून चुकला. मी ठरवले, आता त्यांच्यावर अवलंबून न राहता स्वबळावर प्रयत्न करायचे. नावाचे एक उच्च पदावरील गृहस्थ त्यांचे साहेब होते. मी त्यांच्याशी संपर्क साधला. हे भले गृहस्थ होते. मला एक दिवसाच्या आत मला मंजुरी मिळाली. मंजुरी देताना त्यांनी सूचित केले की, डिझाईन विभागाकडून योजना बनवून घ्या. नंतर सिव्हिल विभागाशी संपर्क साधा. यांनी पाठवलेल्या उत्तरात डिझाईन विभागाला सीसीमधे ठेवले होते. क्ष ला डावलून य कडे जाणे हे एका अर्थी संकेतभंग केल्यासारखे होते पण त्या गोष्टीला क्ष हेच जबाबदार होते. तसे केले म्हणून मंजुरी मिळाली हीही वस्तुस्थिती आहेच.
डिझाईन विभागाचा जो प्रमुख होता तो फक्त यांची सूचना आली की काम करायचा. इतरांच्या मागण्यांकडे डे तो दुर्लक्ष करे. यांची सूचना येताच तो कामाला लागला. त्याने फोनवर माझ्याशी संपर्क साधला व सांगितले की, मी मोजमापे घ्यायला सिव्हिल इंजिनिअरला पाठवतो. इंजिनिअर आला व हॉलबाबत काहीही न बोलता केवळ मी जिथे बसतो तेवढी जागा वातानुकूलित करून देण्याबाबत सांगू लागला. हॉल आकाराने अजून लहान करण्याबाबत तो बोलत होता. ऊर्जा विभागाच्या प्रमुखांनी बहुधा माझ्याशी चर्चा न करता परस्पर योजना बदलली होती. तसे त्यांनी डिझाईन विभागालाही सांगितले होते. पटकन उरकून टाकायचे व संबंधिताला गुंडाळायचे असा एकंदर कावा होता. ऊर्जा व डिझाईन यांच्यात कोणताही संवाद नव्हता. प्रत्येकजण आपापल्या रीतीने नियोजन करत होता. मी ठरवले , ' आपली बाजू आपण मांडत राहायची व आपल्याला जेवढा हॉल पाहिजे आहे तेवढा बांधून घ्यायचा व तो वातानुकूलित करून घ्यायचा. डिझाईन व इलेक्ट्रिकल च्या दबावाखाली येऊन मान तुकवायची नाही. शेवटी माहिती केंद्र कसे असावे हे आपण ठरवायचे. इतरांनी नाही.'
उच्च पदावरच्या व्यक्तीची मंजुरी असल्याने योजना रद्द होण्याचा संभव नव्हता.
मी दोन्ही विभागांना मेलद्वारा आदरपूर्वक कळवले की, मला आकाराने मोठा हॉल हवा आहे. मोठे असण्यामुळे तिथे येणाऱ्या लोकांची सुखद सोय होईल. केवळ माझ्याकरिता हॉल बनवणे, हे इतरांवर अन्यायकारक होईल.
दोन्ही विभागांनी दीर्घकाळ कुठलीही हालचाल केली नाही. त्यांच्या मूळ योजनेला मी थोपवले होते. मी वारंवार माझ्या योजनेची स्मरणपत्रे पाठवणे सुरु ठेवले. अखेर, मला हव्या त्या आकाराचा हॉल बनवण्याचे नक्की झाले व डिझाईन विभागाचा इंजिनिअर येऊन मापे घेऊन गेला. मापे सिव्हिलला दिली गेली. सिव्हिलकडून दीर्घकाळ कुठलाही हालचाल झाली नाही. माझा पाठपुरावा चिकाटीने सुरु होताच. एक दिवस हॉलचे बांधकाम साहित्य आल्याची मेल सिव्हिलकडून आली. बांधकाम पूर्ण झाले. बांधकाम पूर्ण करीत असताना संबंधित कंत्राटदाराला मी आतापर्यंत आलेले प्रतिसाद सांगितले. तो म्हणाला, "जाऊ दे साहेब. वरचे लोक त्यांच्या पध्दतीने योजना बनवतात. आम्हा मधल्या लोकांना त्यांचे सगळे विचार माहीत असतात. जितक्या लांबीचा हॉल मंजूर आहे त्यापेक्षा थोडा जास्त मी तुम्हाला बनवून देतो. "
बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण झाल्यावरही इलेक्ट्रिकल विभागाने आता वातानुकूलन यंत्र लावण्यात दिरंगाई सुरु केली. डिझाईनने व सिव्हिलने आधीच कामाला उशीर केला होता. माहिती केंद्रात नेहमी येणारे एक अधिकारी गृहस्थ मला विचारू लागले की, वातानुकूलन यंत्र कधी बसणार म्हणून. त्यांचा तीनही विभागांशी थेट संबंध नव्हता. मी त्यांच्यापुढे परिस्थिती कथन केली. मी बघतो काय करायचे ते, असे सांगून मला आश्वस्त केले. त्यांनी अधिकार वापरून इलेक्ट्रिकलला सांगितले. पुढच्या आठवड्यात वातानुकूलन यंत्र बसले.
मला आनंद झाला. हॉल पूर्ण झाला. यंत्रही बसले. उन्हाळ्यात मला व इतर संबंधितांना थंडाई मिळू लागली. एक दिवस क्ष गृहस्थ आले आणि हॉल पाहून हादरले. आपण या कार्यात काहीच सहभाग घेतला नाही, असे जाणवून त्यांना थोडी लाजही वाटली. उगीचच काहीतरी विचारायचे म्हणून त्यांनी कोणाकडून मंजुरी घेतली वगैरे विचारले. काही वेळाने निघून गेले.
हवी ती गोष्ट मिळाली पण संबंध प्रकरणात सुमारे दीड वर्ष गेले. याबाबत मला काही गोष्टी जाणवल्या.
१. आपल्याला हव्या त्या गोष्टीकरता सातत्याने पाठपुरावा करावा लागतो.
२. दर्जा मिळत नसल्यास संघर्षाची तयारी ठेवावी लागते.
३. स्वतःची बाजू मांडणारी व्यक्ती जोडीला असल्यास आपल्या मागण्यांना अर्थ मिळतो. यशस्वी होण्याची शक्यता वाढते. एकी हेच बळ.
४. योजनांमधे व्यक्तिगत रस नसल्यास कोणीही दुसऱ्याकरिता मर्यादेपलीकडे प्रयत्न करीत नाही.
५. संवाद ईमेलद्वारा झाल्याने पाठपुरावा करणे, मुद्दे मांडणे सोपे जाते.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

8 Sep 2020 - 10:01 pm | उपयोजक

अनुभव रोचक आहे.

कानडाऊ योगेशु's picture

8 Sep 2020 - 10:17 pm | कानडाऊ योगेशु

तुमची चिकाटी दाद देण्याजोगी आहे.

एक दिवस क्ष गृहस्थ आले आणि हॉल पाहून हादरले.

क्षंना त्यांच्या नाकाखाली काय चालले आहे ह्याची कल्पनाच कशी काय आली नाही ? म्हणजे त्यांचे कार्यालय व ही हॉलची जागा फार दूर आहेत काय?

चौकस२१२'s picture

9 Sep 2020 - 4:03 am | चौकस२१२

हे कामाचे ठिकाण सरकारी कि खाजगी? कि सहकारी संस्था वैगरे?
अर्थात प्रत्येक ठिकाणचे राजकारण वेगळे म्हणा आणि पद्धती पण वेगळी

निनाद's picture

9 Sep 2020 - 5:18 am | निनाद

चिकाटी मुळे उत्तम यश मिळाले या प्रकल्पात. छान अनुभव!
कार्यालयीन राजकारणाचा बाऊ न करता योग्य तो पेशन्स ठेऊन प्रतिकूल असलेले राजकारण ही कसे यशस्वीरित्या हाताळता येऊ शकते याचा हा चांगला नमुना आहे.

अजून लिहा.

महासंग्राम's picture

9 Sep 2020 - 11:02 am | महासंग्राम

प्रयत्ने मेल हि धाडता एसी हि मिळे

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2020 - 6:44 pm | चौथा कोनाडा

वाह, चिकाटीने पाठपुरावा केला आणि वातानुकूलन यंत्र बसले.
तुमच्या पाठपुराव्याला आणि शिस्तबद्ध अ‍ॅप्रोचला सलाम !
लेखन आवडले ! लिहित रहा !

डिपार्टमेंटच्या सुसुत्रता अभावामुळे कंपन्या आणि विशेष सरकारी योजना उपक्रम मार खातात.

कानडाऊ योगेशु's picture

9 Sep 2020 - 10:38 pm | कानडाऊ योगेशु

अधिकार्यांच्या नावांसाठी निवडलेली अक्षरे "अ क्ष य" अशी आहेत. इथे काही हिंट देताहात का काय?

दुर्गविहारी's picture

10 Sep 2020 - 4:40 pm | दुर्गविहारी

अनुभव रोचक आह,, पण नीट पोहचत नाही. ते क्ष ,, य अशी नावे वाचून अंकगणित घालताय कि काय असे वाटले. काहीतरी नाव दिली असती तर नेमका मुद्दा काय हे स्पष्ट झाले असते.