राजयोग - २०

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
10 Jul 2020 - 12:50 pm

राजयोग-१९

***

नक्षत्रराय सैनिकांबरोबर कूच करीत होता, त्याच्या प्रवासात कुठेही अडथळा आला नाही. त्रिपुराच्या प्रत्येक गावात त्याचं राजा म्हणून स्वागत केलं गेलं. जसजसा राजा असण्यातला आनंद क्षणोक्षणी मिळू लागला, तसतशी त्याची तहान अजूनच वाढू लागली. चारी दिशांना पसरलेली शेतं, गावं, डोंगर, नदी सगळं काही माझंच आहे ही भावना वाढू लागली आणि त्याचबरोबर आपण स्वतःही असेच विशाल, शक्तिशाली आहोत असे वाटू लागले. मुघल सैनिकांचा जसा कल असेल, तशाच आज्ञा तो देऊ लागला. त्याला वाटलं, हे सगळं माझंच आहे, हे लोक माझ्या राज्यात आले, त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये. उद्या हेच मुघल त्यांच्या देशात परत जाऊन माझ्या थोरवीचे, माझ्या दानशूरतेचे कौतुक करतील. म्हणतील, "त्रिपुराचा राजा काही लहानसहान राजा नाही. " मुघल सैनिकांच्या मनात आपली प्रतिमा चांगलीच असावी असं नक्षत्ररायला वाटतं. त्यांनी त्याच्याशी प्रेमाचे, कौतुकाचे दोन शब्द जरी बोलले तरी तो पाघळतो. काही तरी निमित्तमात्र गोष्टीने मुघल सैनिक आपल्यावर नाराज तर होणार नाहीत अशी भीती त्याला सतत वाटत राहते.

रघुपती त्याच्याकडे येऊन म्हणाला, "महाराज, युद्धाच्या तयारीची काहीच चिन्ह दिसत नाहीत इथे."

"नाही, ठाकूर घाबरला असेल." असं म्हणून नक्षत्रराय खळखळून हसू लागला.

रघुपतीला यात हसण्यासारखं काही आहे असं वाटलं नाही, तरीही हसला.

नक्षत्रराय म्हणाला, "नक्षत्रराय नवाबाचे सैनिक घेऊन येतोय, ही काय साधीसोपी गोष्ट आहे का?"

रघुपती म्हणाला, "बघू आता कोण कुणाला निर्वासनात पाठवतं ते! काय?"

नक्षत्रराय म्हणाला, "मला वाटलं, तर निर्वासनाची शिक्षा करेन, तुरुंगात टाकेन, वध करण्याची आज्ञाही देऊ शकतो. अजून मी ठरवलं नाही नक्की यातलं काय करायचं ते."

असं म्हणून फार गंभीर विचारवंतासारखा चेहरा करून बसला.

रघुपती म्हणाला, "महाराज इतका विचार नका करू, अजून खूप वेळ आहे त्याला. पण मला भिती वाटतेय की गोविंदमाणिक्य युद्ध न करताच तुमचा पराजय करतील."

नक्षत्रराय म्हणाला, "ते कसं शक्य आहे?"

रघुपती म्हणाला, "गोविंदमाणिक्य सैनिकांना बाजूला करून फार बंधुप्रेम दाखवतील. म्हणतील, "माझा लाडका छोटा भाउ आला, घरी चल, दुधातुपाच्या मिठाया खा.” महाराज पाघळून म्हणतील, "जशी आज्ञा, मी लगेच येतो. आता उशीर नाही करणार." असं म्हणून पादत्राणे घालून कुंभाराच्या गाढवासारखे राजाच्या मागे मागे चालू पडाल. मुघल बादशहाची फौज हा तमाशा बघून हसत हसत परत जाईल. "

रघुपतीने आपली अशी नक्कल केलेली पाहून नक्षत्ररायला फार वाईट वाटले. उगीच हसून, ही गोष्ट चेष्टेच्या सुरात घेतोय असं दाखवत म्हणाला, "मला काय लहान बाळ समजतात की काय असं फसवायला! मी अशी संधीच देणार नाही. असं मुळीच होणार नाही ठाकूर, बघाच तुम्ही."

त्याचदिवशी गोविंदमाणिक्यची चिट्ठी घेऊन दूत आला. रघुपतीने ती उघडली. राजाने खूप प्रेमाने विचारपूस करून नक्षत्ररायला प्रार्थना केली होती. त्याने चिट्ठी नक्षत्ररायला दाखवलीच नाही. दूताला सांगितले, "गोविंदमाणिक्यना कष्ट करून इथपर्यंत येण्याची काही गरज नाही. महाराज नक्षत्रमाणिक्य आता सैनिक आणि तलवार घेऊन त्यांच्या भेटीला येतच आहेत. आता एवढ्याशा विरहाने गोविंदमाणिक्यने व्याकुळ होऊ नये. आठ वर्षांच्या निर्वासनात तर याहून अधिक काळ विरह होण्याची शक्यता होती. "

रघुपती नक्षत्ररायकडे जाऊन म्हणाला, "गोविंदमाणिक्यने आपल्या निर्वासित छोट्या भावाला फार प्रेमाने पत्र पाठवलं आहे. "

नक्षत्रराय खोट्या उपेक्षेने हसून म्हणाला, "खरं की काय? कसलं पत्र? बघू तरी." असं म्हणून हात पुढे केला.

रघुपती म्हणाला, "महाराजांना ही चिठठी दाखवणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळं त्याचवेळी तिला फाडून फेकून दिली. आणि सांगितलं, युद्ध हेच आमचं उत्तर आहे."

नक्षत्रराय हसत हसत म्हणाला, "खूप छान केलंत, ठाकूर! तुम्ही सांगितलं? युद्धाशिवाय दुसरं काही उत्तर नाही? एकदम बरोबर उत्तर दिले आहे."

रघुपती म्हणाला, "उत्तर ऐकून गोविंदमाणिक्य विचार करेल, जेव्हा निर्वासनाची शिक्षा दिली होती तेव्हा तर छोटा भाऊ गुपचूप निघून गेला होता. पण तोच भाऊ घरी परत येताना काही शांतपणे येत नाहीये. "

नक्षत्रराय म्हणाला, "त्याला वाटेल, भाऊ पण काही साधासुधा नाहीये. मनात येईल तेव्हा निर्वासित करायचं आणि मनात येईल तेव्हा परत बोलवायचं, आता मी अशी मनमानी खपवून घेणार नाही."

***

नक्षत्ररायचे ऊत्तर ऐकून गोविंदमाणिक्यच्या जिव्हारी घाव बसला. बिल्वनला वाटलं, आता कदाचित महाराज युद्धाला विरोध करणार नाहीत. पण गोविंदमाणिक्य म्हणाले, "हे सगळं नक्कीच नक्षत्ररायने नाही सांगितलेलं. ही नक्कीच त्या पुरोहिताची शिकवण आहे. नक्षत्रराय माझ्याशी अशा शब्दांत कधी बोलूच शकत नाही."

बिल्वन म्हणाला, "महाराज, आता यावर उपाय काय?"

राजा म्हणाला, "काही तरी करून मला एकदा नक्षत्ररायला भेटता आलं तर यातून मार्ग निघू शकतो."

बिल्वन म्हणाला, "आणि जर भेट होऊ शकत नसेल तर?"

राजा - "असं झालं तर मी राज्य सोडून निघून जाईन."

बिल्वन म्हणाला, "ठीक आहे, मी एकदा प्रयत्न करून बघतो."

एका विशाल पर्वतावर नक्षत्ररायचं शिवीर होतं. आजूबाजूला घनदाट जंगल होतं. बांबूची, वेताची वनं. अनेक प्रकारच्या वेली, झाडाझुडपांमुळे खालची जमीन जराही दिसत नव्हती. सैनिक जंगली हत्तींच्या पाऊलखुणांचा पाठलाग करीत करीत शिखरावर पोचले होते. दुपारनंतरची वेळ होती. सूर्य पहाडाच्या पश्चिम दिशेला झुकला होता. पूर्वेकडे अंधार पसरत होता. सायंकाळची पसरलेली सावली आणि झाडांच्या सावल्या एकमेकांत मिसळून जंगलात अवेळी अंधार होऊ पहात होता. संध्याकाळी थंड झालेल्या हवेमुळे जमिनीतून धुकं वाटावं अशी वाफ बाहेर पडत होती. रातकिड्यांच्या किर्र आवाजाने जणू काही शांत, नि:शब्द वनाला कंठ फुटला होता. बिल्वन शिविरात पोचेपर्यंत सूर्य पूर्णपणे मावळला होता, फक्त पश्चिम क्षिताजावरची सोनेरी लकेर अजून मावळली नव्हती. पश्चिमेकडील दरीवर पसरलेल्या सोनेरी प्रकाशामुळे ते घनदाट जंगल एखादा दूरवर पसरलेला हिरवा समुद्र असल्याचा भास होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सैनिक कूच करणार होते. रघुपती सेनापतीसोबत एक सैनिकांची टोळी घेऊन पुढचा मार्ग शोधायला गेला होता, तो अजून परतला नव्हता. रघुपतीला माहिती न होता कुणालाही नक्षत्ररायच्या जवळ जाणे शक्य नव्हते, तरीही संन्यासाचा वेष धारण केलेल्या बिल्वनला थांबवणं कुणाला आवश्यक वाटलं नाही.

बिल्वन नक्षत्ररायजवळ जाऊन म्हणाला, "महाराज गोविंदमाणिक्यनी आपल्याला भेटायची इच्छा प्रकट केली आहे. माझ्याद्वारे हे पत्र आपल्याला पाठवले आहे. " असं म्हणून पत्र नक्षत्ररायच्या हातात ठेवले. नक्षत्ररायच्या हाताला कंप सुटला. पत्र हातात घेताच त्याला स्वतःची शरम वाटू लागली. भितीही वाटू लागली. जोपर्यंत रघुपती त्याच्या व गोविंदमाणिक्यच्यामध्ये भिंतीसारखा उभा होता, तोपर्यंत त्याला कसलीच चिंता नव्हती. जणू काही त्याला कुठल्याही रूपात गोविंदमाणिक्यला पहायची इच्छा नव्हती. गोविंदमाणिक्यचा हा दूत असा एकदम समोर उभा राहिल्याने नक्षत्रराय जमिनीला खिळला, मनातल्या मनात थोडा नाराज झाला. त्याला वाटलं, रघुपती इथे असता आणि या दूताला त्याने आपल्यापर्यंत येऊ दिलं नसतं, तर किती बरं झालं असतं. मनातल्या मनात अशी अळमटळम करत त्याने पत्र उघडलं.

त्या पत्रात जरादेखील तिरस्कार नव्हता. त्याला वाईट वाटेल, असं काहीही गोविंदमाणिक्यने लिहिलं नव्हतं. भावावर जराशीही नाराजी दाखवली नाही. नक्षत्रराय सैनिकांना घेऊन जे आक्रमण करतोय, त्याचा साधा उल्लेखही नाही. आधी दोघा भावांमध्ये जसं प्रेम होतं, त्या प्रेमाला जराही धक्का लागलेला नव्हता. पूर्ण पत्रात एक प्रकारची गहिरी माया आणि त्याचबरोबर कसलीतरी उदासीनता, नैराश्य लपलं होतं - भावाने मनमोकळेपणे आपल्याला काही सांगितलं नाही असा विचार मनात येऊन नक्षत्ररायला वाईट वाटलं.

पत्र वाचता वाचता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. हृदयाला घालून घेतलेल्या भिंती गळून पडल्या. त्याच्या कंप सुटलेल्या हातामध्ये ते पत्रही थरथर कापू लागलं. काही वेळ त्याने ते पत्र आपल्या मस्तकाला लावून ठेवलं. भावाने पाठवलेला आशीर्वाद त्याच्या तप्त, वैराण हृदयात थंड झऱ्यासारखा वाहू लागला. बराच वेळ काही न बोलता, दूर पश्चिमेकडे पहात सायंकाळच्या लालसोनेरी उन्हात उजळून निघालेलं जंगल डोळ्यात साठवत राहिला. चारी दिशांनी वेढत आलेली संध्याकाळ निःशब्द अथांग समुद्रासारखी जागी होती. हळहळू त्याचे डोळे भरून येऊ लागले. स्वतःची लाज वाटून पश्चातापाने त्यानं आपला चेहरा हातांच्या ओंजळीत झाकला.

कातर आवाजात म्हणाला, "मला हे राज्य नको. दादा, माझे सारे अपराध पोटात घेऊन मला पुन्हा तुमच्या चरणांपाशी स्थान द्या. मला तुमच्यापासून दूर करू नका. "

बिल्वन एक शब्दही बोलला नाही, भरून आलेल्या मनाने फक्त पहात राहिला. शेवटी नक्षत्रराय शांत झाल्यावर म्हणाला, "युवराज, गोविंदमाणिक्य तुमची वाट पहात आहेत. आता उशीर नको करायला."

नक्षत्रराय म्हणाला, "मला माफ करेल तो?"

बिल्वन म्हणाला, "त्यांच्या मनात तुमच्याविषयी काडीइतकाही आकस नाही. तुमच्यावर मुळीच रागवणार नाहीत ते. अजून रात्र झाली तर परतीचा मार्ग सापडणार नाही. ताबडतोब एक घोडा घेऊन चला. पर्वताच्या पायथ्याजवळ महाराजांचे लोक आपली वाट पहात आहेत. "

नक्षत्रराय म्हणाला, "मी गुपचूप इथून पळतो. सैनिकांना काही सांगायला नको. आता एक क्षण सुद्धा वाया नको घालवायला. लवकरात लवकर इथून निघून जाणंच चांगलं आहे. "

बिल्वन म्हणाला, "ठीक आहे."

तीनमुडा पहाडावर संन्यासाबरोबर शिवलिंगाची पूजा करायला जात आहे असं म्हणून नक्षत्रराय बिल्वनबरोबर निघाला. त्याच्या सेवकांनी बरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांना नकार देऊन तो बाहेर पडला.

बाहेर पडताच घोड्याच्या टापांचा आवाज आणि सैनिकांचा गोंधळ ऐकू आला. नक्षत्ररायला काय करायचं सुचेनासं झालं. बघता बघता रघुपती सैनिकांना घेऊन परतला. आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "महाराज, कुठे चालले आहेत?"

नक्षत्ररायला काही उत्तर सुचलं नाही. त्याला निरुत्तर झालेलं पाहून बिल्वन म्हणाला, "महाराज गोविंदमाणिकयांची भेट करायला चालले आहेत."

रघुपतीने एकवेळ बिल्वनला वरपासून खालीपर्यंत न्याहाळलं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यानंतर थोड्या निग्रहाने म्हणाला, "अशा अवेळी आम्ही महाराजांना इथून जाऊ देणार नाही. चिंता करायचं तस काही कारणही नाही. उद्या सकाळी गेलात तरी काही हरकत नाही. चालेल ना, महाराज?"

नक्षत्रराय कुणाला ऐकू जाईल न जाईल अशा आवाजात म्हणाला, "उद्या सकाळीच जातो. आता खूप रात्र झाली आहे."

बिल्वन निराश झाला. ती रात्र कशीबशी शिविरात घालवून, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नक्षत्ररायकडे जाण्याचा त्याने प्रयत्न केला. सैनिकांनी त्याला अडवलं. चारी बाजूंनी सैनिकांनी घेरलं. त्याला कुठूनही जाण्याची संधी दिली नाही. शेवटी बिल्वन रघुपतीकडे जाऊन म्हणाला, "आता निघण्याची वेळ झाली आहे. युवराजांना सूचित करा."

रघुपती म्हणाला, "महाराजांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. "

बिल्वन म्हणाला, "मला त्यांना एकदा भेटायचं आहे."

रघुपती - "भेट होणार नाही. त्यांचा निर्णय ठाम आहे."

बिल्वन म्हणाला, "महाराज गोविंदमाणिक्यांच्या पत्राचं उत्तर हवं आहे."

रघुपती - "पत्राचं उत्तर याआधीही एकदा दिलं आहे."

बिल्वन - "मला त्यांच्या तोंडून ते ऐकायचं आहे."

रघुपती - "ते आता शक्य नाही."

बिल्वनला समजलं, आता प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. फक्त वेळ आणि शब्द वाया जाणार. जाता जाता रघुपतीला म्हणाला, "ब्राह्मण, हा कसला सर्वनाश आरंभ केला आहेस. हे ब्राम्हणाचं काम खचितच नव्हे."

***

क्रमश:

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

10 Jul 2020 - 4:23 pm | श्वेता२४

पुढची उत्सुकता वाढते आहे

अनिंद्य's picture

10 Jul 2020 - 9:36 pm | अनिंद्य

छानच.
युद्धाची की शिष्टाईची - कोणती बाजू वरचढ होणार ?
वाट पाहतोय :-)

प्रचेतस's picture

11 Jul 2020 - 8:48 am | प्रचेतस

जबरदस्त झालाय हा भाग. पुढे काय होईल याची प्रचंड उत्सुकता.

वीणा३'s picture

15 Jul 2020 - 1:45 am | वीणा३

पु. भा. प्र.

विजुभाऊ's picture

16 Jul 2020 - 6:55 am | विजुभाऊ

उत्कंठा वाढतेय वाचताना
मस्त लिहीताय

रातराणी's picture

17 Jul 2020 - 10:04 am | रातराणी

सर्वांना धन्यवाद :)
पुढील भाग टाकत आहे थोड्या वेळात.