चित्रपट परीक्षण - पानिपतचे पानिपत !

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
26 Dec 2019 - 8:14 pm

https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcS0jmiD28tffm_2izqU...

निर्माते कशासाठी चित्रपट काढतात ? लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ? खरा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून ? समाज प्रबोधन करण्यासाठी?
वरील प्रश्नाचे खरे उत्तर "पैसे कमावण्यासाठी " हेच आहे. जेव्हा एखादा निर्माता शेकडो कोटी खर्च करून एखादा चित्रपट काढतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की त्यातून त्याचे शेकडो कोटी वसूल व्हावेतच, शिवाय अधिक शेकडो कोटींचा नफा व्हावा.
आता उलट बाजू विचार करू. जेव्हा एखादा प्रेक्षक ३०० -४०० रुपयाचे तिकीट काढून चित्रपट बघायला जातो, तेव्हा त्याची काय अपेक्षा असते? आपले प्रबोधन व्हावे की आपल्याला खरा इतिहास कळवा ? खरे उत्तर बव्हंश वेळा मनोरंजन होऊन आपले ३०० - ४०० रुपये ( पॉपकॉर्न धरून आकडा हजारात जाईल ) वसूल व्हावेत हेच असते. आणि ही कसोटी लावून पानिपत तपासला तर तो नक्कीच पैसे वसूल चित्रपट आहे हे नक्की.
जेव्हा एखाद्या ऐतिहासिक विषयावर चित्रपट काढायचा असतो तेव्हा इतिहासाशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहून त्यात नाट्य आणि मनोरंजन ही करण्याची दुहेरी कसरत दिग्दर्शकास करावी लागते. त्यात आपल्या कडे लगेच कोणाच्या ना कोणाच्या भावना दुखावल्या जातच असतात. त्या सगळ्यांना सांभाळणे हीही एक तारेवरची कसरतच असते. त्यात तो युद्धपट म्हणून प्रदर्शित करायचा असेल तर काम अत्यंत क्लिष्ट होते. कारण एखाद्या युद्धावर चित्रपट बनवायचा तर त्या युद्धाच्या मागची किमान आवश्यक पार्श्वभूमी ही दाखवावीच लागते. आणि ती पार्श्वभूमी अधिक ते युद्ध असा सगळा घटनाक्रम जास्तीत जास्त ३ तासात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा लागतो. शिवाय तो युद्धपट माहितीपट होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते.
पानिपतचे युद्ध हा एक अत्यंत क्लिष्ट विषय आहे. पानिपतच्या ३ऱ्या युद्धाचा ऐतिहासिक घटनाक्रम किमान १० वर्षे आधी जातो. हा सगळा घटनाक्रम अधिक युद्ध ही ३ तासात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे एक आव्हानच आहे. चित्रपटाचा पूर्वाध याबाबतीत अधिक जास्त चांगल्याप्रकारे हाताळता आला असता हे मात्र नक्की. पानिपत समजून घेताना दोन्ही बाजूच्या अनेक व्यक्तिरेखा अभ्यासाव्या लागतात. या प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वतःचा फायदा तोटा पाहण्याचा एक तत्कालीन दृष्टिकोन होता. उपलध वेळेत तो चित्रपटाने ज्या पद्धतीने तो दाखवला आहे तो पूर्वार्धातील अनावश्यक प्रसंग टाळून अधिक चांगला पोहोचवता आला असता. यात पेशवाईतील अंतर्गत कुरबुरी, मराठा सरदारांतील कुरबुरी, दुसरीकडे नजीब, सूज उद्दौला, अब्दाली यांचे दृष्टिकोन सर्व काही आले. नदी पार करण्यासाठी लागलेला वेळ, अन्नधान्याची कमतरता आणि त्यापायी मराठ्यांची झालेली उपासमार, जानेवारीतील उत्तरेतील थंडी, सोबतच्या आणलेल्या बायका, त्यांची सुरक्षा याचा मराठा सैन्यावर पडलेला ताण या सगळ्या मराठ्यांच्या विरुद्ध गेलेल्या गंभीर बाबी प्रभावी पणे पोहोचतच नाहीत.
आता प्रत्यक्ष युद्ध. भारतीय दिग्दर्शकाना युद्धपट कसा असावा याबाबतचा त्यांचा अभ्यास वाढवावा लागेल यात शंका नाही. यासाठी त्यांनी वॉटरलू , द लोंगेस्ट डे किंवा battle of japan sea सारखे युद्धपट नक्की पाहावेत. युद्ध प्रसंग चांगले असले तरी प्रत्यक्ष पानिपतावर झालेल्या युद्ध घटनाक्रमाशी ते विसंगत आहेत. आणि एक युद्धपट म्हणून ही अक्षम्य चूक आहे. (उदा: हुजुरात हे पेशव्यांचे खास घोडदळ होते. चित्रपटात हुजुरातीचे पायदळ दाखवलय.)
आता याचा अर्थ पानिपत चित्रपट बनवणारे आणि पाहणारे या दोघांचा वेळ आणि पैका वाया गेला काय? मला नाही तसं वाटत. या चित्रपटाच्या निमित्ताने निदान पानिपत आणि पराक्रमी मराठे यांची माहिती जगापर्यंत पोहोचेल तरी. आणि तो पाहणाऱ्यांपैकी काही जण तरी पानिपतचा खरा इतिहास शोधतील. आणि कदाचित काही वर्षांनी या पानिपतचा अधिक अचूक, इतिहासाशी प्रामाणिक, प्रेम कहाणी विरहित, दर्जेदार युद्धपटाचा रिमेक बनेलही !!

कौस्तुभ पोंक्षे

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

26 Dec 2019 - 8:38 pm | चौकटराजा

१८५७ च्या अगोदरच्या इतिहासात अजिबात रस नसल्याने माझा या ठिकाणी पास !

जॉनविक्क's picture

26 Dec 2019 - 8:41 pm | जॉनविक्क

या चित्रपटाच्या निमित्ताने निदान पानिपत आणि पराक्रमी मराठे यांची माहिती जगापर्यंत पोहोचेल तरी. आणि तो पाहणाऱ्यांपैकी काही जण तरी पानिपतचा खरा इतिहास शोधतील. आणि कदाचित काही वर्षांनी या पानिपतचा अधिक अचूक, इतिहासाशी प्रामाणिक, प्रेम कहाणी विरहित, दर्जेदार युद्धपटाचा रिमेक बनेलही !!
किमान हीच अपेक्षा पूर्ण व्हावी.

चौथा कोनाडा's picture

28 Dec 2019 - 3:49 pm | चौथा कोनाडा

जौदे, यासाठी बघनार सिनेमा !

निर्माते कशासाठी चित्रपट काढतात ? लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ? खरा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून ? समाज प्रबोधन करण्यासाठी?
वरील प्रश्नाचे खरे उत्तर "पैसे कमावण्यासाठी " हेच आहे. जेव्हा एखादा निर्माता शेकडो कोटी खर्च करून एखादा चित्रपट काढतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की त्यातून त्याचे शेकडो कोटी वसूल व्हावेतच, शिवाय अधिक शेकडो कोटींचा नफा व्हावा.
आता उलट बाजू विचार करू. जेव्हा एखादा प्रेक्षक ३०० -४०० रुपयाचे तिकीट काढून चित्रपट बघायला जातो, तेव्हा त्याची काय अपेक्षा असते? आपले प्रबोधन व्हावे की आपल्याला खरा इतिहास कळवा ? खरे उत्तर बव्हंश वेळा मनोरंजन होऊन आपले ३०० - ४०० रुपये ( पॉपकॉर्न धरून आकडा हजारात जाईल ) वसूल व्हावेत हेच असते. आणि ही कसोटी लावून पानिपत तपासला तर तो नक्कीच पैसे वसूल चित्रपट आहे हे नक्की.

जौदे, यासाठीच बघनार सिनेमा !

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Dec 2019 - 4:13 pm | अमरेंद्र बाहुबली

सिनेमा महाराष्ट्राबाहेर पाहिला. सिनेमा पाहताना आणी बाहेर आल्यावर लोकांच्या प्रतिक्रियांवर बारीक नजर ठेवून होतो. अनेक प्रतिक्रिया पोसीटीव्ह होत्या. मराठी इतिहास महाराष्ट्रबाहेर लोकांना कळतोय. ही खूप आनंदाची बाब आहे.
सिनेमा मला खूप आवडला. फक्त ते सदाशिवभाऊ आणी पार्वतीबाईंमधले कोकणातले संवाद, आणी सकिना बेगम चा सिन हे काही गरज नसताना घातलेले वाटले. ते कमी करून चित्रपटाची लांबी कमी झाली असती.
जसे बाजीराव मस्तानीच्या सुरुवातीलाच introduction देणारा सीन आणी बाजीरावाची स्पीच ह्या मुळे जसा जबरजस्त goosebump मिळतो. तसा ह्या सिनेमात कुठेही नव्हता.
सिनेमा प्रदर्शनाआधीच अर्जुन कपूर बद्दल लोकांमध्ये मोठी शंका होती. त्यामुळे अनेकांनी आधीच ह्या सिनेमाकडे पाठ फिरवली. अर्जुन कपूर च्या जागी कुणीही दुसरा मोठा सिनेतारा असता तर चित्रपट नक्की 200 कोटी पार गेला असता.
बाकी सिनेमा खूप छान बनवलाय. पानिपता सारखी किचकट कथा खूप सोपी करून सांगितलीय जी इतिहास माहीत नसणाऱ्या आणी माहीत करून घ्यायची इच्छा नसणाऱ्या सर्वांना समजेल.