यात्री ---- कथा ---- काल्पनीक -------

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
13 Dec 2019 - 3:36 pm

यात्री ---- कथा ---- काल्पनीक -------

तो यात्री अनेक दिवस नर्मदा नदीच्या तीरावरील गावांमधून भटकत होता . आपण कुठुन आलो , कुठे चाललो आहोत याची त्याला काहिच सय राहिली नव्हती . अंगावरील एके काळचे भरजरी कपडे धुळीने माखुन गेले होते . पण तिकडेही त्याचे लक्ष नव्हते . तहान भुक हरपुन तो नुसताच दिसेल त्या वाटेने चालत होता .

वाटेतील काही गावांमधे त्याला परिक्रमावासी समजुन आदराने , भक्तीभावाने खाऊ पिउ घातले गेले . तर काही गावांमधे त्याला चोर , वेडा , भिकारी समजुन चोपही देण्यात आला . पण या कशाचीच तमा न बाळगता तो यात्री आपल्याच नादात चालतच होता .

अनेक दिवस चालल्यावर तो यात्री नर्मदा तीरावरील एका घनदाट अरण्यात शिरला . सतत चालून थकल्यामुळे तो एका शिळेवर विसाव्यासाठी बसला . संध्याकाळची वेळ झाली होती . सुर्यदेव मावळती कडे झुकु लागले होते . नदीच्या पात्रामधे मावळतीचे प्रतिबिंब वेधक दिसत होते .

यात्री बराच वेळ त्या प्रतिबिंबाकडे बघत बसला होता . अचानक अंतस्फुर्तीने त्या यात्रीच्या मुखातुन सुर्यस्तुतीचे सुर निघु लागले . ते काही साधे सुर नव्हते . मुळचा दैवी देणगी लाभलेला गळा आणी त्याला वर्षानुवर्षे असलेली खडतर रियाझाची साथ त्या अलौकिक सुरांमधुन आसमंतामधे दिव्यतेचा वर्षाव करीत होती . आजुबाजुचे वृक्ष जणु त्या सुरांच्या जादुमुळे तल्लीन होउन हळुवारपणे डुलत होते .

अचानक दिवसभराच्या अतीश्रमामुळे भोवळ येउन तो यात्री जागीच निपचित पडला . जवळच्याच वृक्षांमागुन भगवी वस्त्रे परिधान केलेला एक तेजस्वी यती तिथे आला . त्याने आपल्या कमंडलुमधले थोडे पाणी त्या यात्रीच्या मुखावर शिंपडले . काही वेळाने तो यात्री शुद्धीवर आला . त्याने आपली मदत करणार्‍या त्या यतीला कृतज्ञतेने नमस्कार केला . तो यती आस्थेने त्या यात्रीची विचारपुस करु लागला .

"यात्री महोदय , आपण कोण आहात ? आपण काही वेळापुर्वी जे अलौकिक गायन केले . ते ऐकुन आपण कोणी साधे सुधे पांथस्थ वाटत नाही ."

तो यात्री खिन्नपणे आपली कथा सांगु लागला .

"यती महाराज , मी इथल्याच एका राज्यातील राजगायक आहे . माझ्या दैवी सुरांनी , आणी अखंड मेहनतीनी मी माझ्या गायकीची , माझ्या संगीत घराण्याची ख्याती सर्व दुर पोचवली . अनेक राजे आणी प्रजाजन माझ्या गायनाने भारुन गेले . पण इथेच घात झाला . माझ्या गायकीला , माझ्या घराण्याला महान बनवण्याच्या नादात मी इतर संगीत घराण्यांचा , इतर गायन शैलींचा तिरस्कार करु लागलो . त्या घराण्यातील गायकांना शत्रु मानुन मी त्यांचा अनेक संगीत मैफलींमधे पराभव केला , अपमान केला . वेगळी गायन शैली असलेले अनेक नवोदीत गायक मोठ्या भक्तीने , उमेदीने माझे शिष्यत्व पत्करण्यासाठी माझ्याकडे आले . पण मी त्यांना न स्विकारता हाकलुन दिले. जे काही थोडे फार माझे शिष्य होते ते अधिक धनाच्या लोभाने पळुन गेले . मी आता उतार वयाकडे झुकलो आहे . या मावळत्या सुर्यासारखे माझ्याप्रमाणेच माझे गाणे , माझ्या घराण्याची गायकी नामशेष होणार याची मला खंत वाटते आहे . माझ्या अहंकारानेच माझ्या गायकीचा घात केला . मी समर्थ शिष्य घडवु शकलो नाही . हि जाणीव असह्य होउन अखेर मी माझ्या राजगायक पदाचा त्याग केला . आणी सारे वैभव सोडुन जिथे वाट नेईल तिथे फिरत आहे . "

यात्रीचे कथन ऐकुन यतीचे डोळे पाणावले . थोडा विचार करुन तो यात्रीला म्हणाला .

"यात्री महोदय , तुमची आणी माझी कहाणी एकप्रकारे सारखीच आहे . तुमच्या संगीत घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही इतर घराण्यातील गायकांशी संघर्ष केला . माझ्या कडुनही तशीच चुक झाली . महाभारत युद्धामधे पांडवांची बाजु न्यायाची आहे हे समजत असुनही मी राजनिष्ठेचे पालन करण्यासाठी कौरवांच्या बाजुने उभा राहिलो . अखेरपर्यंत मी पांडवांशी संघर्ष केला . त्याचेच प्रायश्चित मी अजुनही भोगत आहे . माझ्या शिक्षेला कुठलाच उशाप नाही . परीमार्जन नाही . पण तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला तुमच्या चुकीच्या परिमार्जनाची संधी निश्चीत मिळेल . "

एवढे बोलुन तो यती उठला . त्याने आपल्या कपाळाला बांधलेले वस्त्र किंचीत सैल झाले होते . ते परत घट्ट करुन तो अंधारामधे त्या अरण्यात जसा अचानक आला तसाच निघुनही गेला .

यती ज्या दिशेने गेला तिकडे तो यात्री बराच वेळ विचारमग्न होउन बघत बसला . थोड्या वेळाने यात्रीही उठला आणी दिसेल त्या रानवाटेने चालु लागला. अरण्यातुन बाहेर निघुन तो एका गावात येईपर्यंत बरीच रात्र झाली होती . यात्रीला परत अतिश्रमामुळे भोवळ आली . तो वाटेतच कोसळला .

"महोदय , आपण कोण आहात ? आपल्याला बरे वाटत नाही का ? आपण थोडा फलाहार करावा . म्हणजे थोडी शक्ती येईल ."

कुणाच्यातरी आवाजाने यात्रीला जाग आली . सुर्योदयाच्या प्रकाशात समोर एक लहान तरतरीत मुलगा हातामधे एका भांड्यात काही फळे घेउन उभा होता . यात्रीला जाग आलेली पाहुन तो मुलगा धीटपणे आपली ओळख सांगु लागला .

"माझे नाव गुणीराम . मी या गावामधेच राहतो . माझे वडील नावाडी आहेत . ते यात्रेकरुंची नदीच्या तीरांवरुन नावेने ने आण करतात . मी त्यांना त्यांच्या कामात मदत करतो . आपण काही वेळापुर्वी निद्रेमधेच काहितरी गुणगुणत होतात ते मी ऐकले . आपल्या गाण्यावरुन आपण कोणी थोर गायक आहात असे वाटते . मलाही गाणे शिकण्याची खुप इच्छा आहे . पण गरीबीमुळे मला शिकता येत नाही . आपण मला गाणे शिकवाल ?"

त्या मुलाचे निरागस बोलणे ऐकुन यात्रीला हसु आले . त्याने प्रेमाने त्या मुलाच्या कपाळावर हात ठेवला .

------------------------------------------ समाप्त ----------- काल्पनीक -------------------------

कथा प्रेरणा -- १ . प्रसिद्ध संगीत नाटक "कट्यार काळजात घुसली" ,
२. प्रख्यात साहित्यीक जी. ए. कुलकर्णी यांची "भेट" ही कथा ,
३. " स्वाती किरणम" हा गाजलेला तेलुगु चित्रपट ,
४. नर्मदा परिक्रमा संदर्भातील परीक्रमावासियांचे अनुभव लेखन .

संगीतसद्भावना

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

13 Dec 2019 - 4:46 pm | पद्मावति

छान लिहिलंय. आवडलं.

शा वि कु's picture

13 Dec 2019 - 4:52 pm | शा वि कु

मस्तच

जॉनविक्क's picture

13 Dec 2019 - 4:52 pm | जॉनविक्क

कट्यार काळजात घुसली

चा संदर्भ लगेच मनात आला होता व

संजय पाटिल's picture

18 Dec 2019 - 11:39 am | संजय पाटिल

मला पण.....

मुक्त विहारि's picture

13 Dec 2019 - 5:41 pm | मुक्त विहारि

मस्त. ..

शित्रेउमेश's picture

16 Dec 2019 - 10:27 am | शित्रेउमेश

सुन्दर....

सिरुसेरि's picture

17 Dec 2019 - 7:51 pm | सिरुसेरि

आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद .

कर्नलतपस्वी's picture

29 Jul 2022 - 4:45 pm | कर्नलतपस्वी

अश्वत्थामा,एकलव्य यांच्यावर नियतीने अन्याय केला आसे नेहमीच वाटते. कदाचित नियती आहे हे सिद्ध करण्यासाठी तर हि पात्रे निर्माण तर केली नाहीत आशी शंका येते.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Aug 2022 - 3:51 pm | ॲबसेंट माइंडेड ...

कथा आवडली.

कुमार१'s picture

14 May 2023 - 11:37 am | कुमार१

छान लिहिलंय. आवडलं.

कथा अर्धवट वाटते. मला असे वाटले , यात्री तथास्तु म्हणून तरी मुलाच्या डोक्यावर व पश्तापाने पोळून तरी म्हणून हात ठेवेल व तथास्तु म्हणून म्हणेल व त्याच्या वागण्याचे परिमार्जन किंवा प्रायश्चि चांगला शेवट होईल.घेण्याची सुरूवात करेल किंवा धक्कादायक काही दुसरा व चांगला शेवट होईल.
चांगला शेवट होईल. ।

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 May 2023 - 12:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

कथा आवडली