टाकी उपानह पदे...

नूतन's picture
नूतन in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

टाकी उपानह पदे...

टाकी उपानह पदें अतिमंद ठेवी।
केली विजार वरि डौरहि मौन सेवी॥
हस्ती करीं वलय उंच अशा उपायीं।
भूपें हळूच धरिला कलहंस पायीं॥

एका सुंदर सकाळी चहाचं आधण ठेवता ठेवता सहजच वरील ओळी ओठांवर आल्या. डोक्याला रिकामपण मिळताच दिवसभरात अनेकदा माझ्या मनात रुंजी घालत राहिल्या. अखेर संध्याकाळी मी एका प्रसिद्ध पुस्तक दालनाकडे माझा मोर्चा वळवला. पाठ्यपुस्तकात अभ्यासलेला हा 'वेचा' रघुनाथ पंडितांच्या 'दमयंती स्वयंवर' या आख्यानातील आहे, एवढं पक्कं आठवत होतं. पुस्तक मिळण्याविषयी मनात शंका होतीच, पण पुस्तक मिळावं असंही वाटत होतंच. मी विचारलं, "आपल्याकडे रघुनाथ पंडितांचं 'दमयंती स्वयंवर' मिळेल का?" "रघुनाथ पंडित?" काउंटरवरच्या माणसाचा प्रश्नार्थक चेहरा! मी समजले, कठीण आहे एकूण! इतक्यात दुकानात काम करणारा दुसरा एक जण माझ्यापाशी येत म्हणाला, "ताई, 'रघुनाथ पंडितांचं' नाही. पण अ.का. प्रियोळकरांचं असंच काहीसं एक पुस्तक आहे. एम.ए. करणारे कुणीकुणी येतात विचारायला. दाखवू आणून?" माझा चेहरा खुलला. प्रियोळकर तर प्रियोळकर, बघू या तरी! मी हो म्हटलं. पुस्तक हातात पडलं आणि मी मनातल्या मनात उडीच मारली. चक्क रघुनाथ पंडितांचंच 'दमयंती स्वयंवर' होतं ते! संपादन श्री. प्रियोळकरांचं होतं. एम.ए. च्या अभ्यासाला लावलं म्हणून मनातल्या मनात मी मुंबई युनिव्हर्सिटीचे आभारही मानून टाकले.
तर अशा या काहीशा विस्मृतीत गेलेल्या, रघुनाथ पंडित विरचित आणि अ.का. प्रियोळकर संपादित काव्याचा अल्प परिचय. हे काव्य प्राचीन मराठी काव्यांपैकी अतिशय महत्त्वाचं आणि रसाळ काव्य. या काव्याचे रचनाकार रघुनाथ पंडित शिवकालीन असावेत, असा अंदाज आहे.

विदर्भ देशचा राजा भीमक याची दमयंती ही अतिशय रूपवती, उपवर कन्या. एकदा दरबारात बसलेली असताना काही ब्राह्मणांकडून "लोकी नसे नलमनस्तुलना विलोकी "अशा शब्दातील नलराजाची स्तुती ऐकून नलालाच वरण्याचा ती मनोमन संकल्प करते. इकडे नलाच्या दूतांनी केलेलं दमयंतीचं वर्णन ऐकून नलाचाही दमयंतीवर जीव जडतो. प्रत्यक्षात न बघता फक्त वर्णन ऐकून परस्परांना वरणार्‍या प्रेमिकांची ही कथा. दमयंतीला अनुकूल करून घेण्याचं कार्य, नलराजा सुवर्णकांती असलेल्या एका राजहंसावर सोपवतो. हा हंसच दोघांतील दुवा होतो आणि अखेर नल-दमयंती विवाहबद्ध होतात. या सार्‍या कालखंडातील घटनांची काव्यबद्ध रचना म्हणजे दमयंती स्वयंवर आख्यान.
एकूण २५४ चरणांच्या या काव्यात वृत्तांची आणि अलंकारांची (व्याकरणातील!) लयलूट आहे. शार्दूलविक्रीडित, गीति किंवा आर्या, दण्डी, मालिनी, शिखरिणी, वसंततिलका, द्रुतविलंबित अशा एकूण १९ वृत्तांचा, तर अतिशयोक्ती, अन्योक्ती, श्लेष अशा २०पेक्षा अधिक अलंकारांचा यात समावेश आहे.

1

वाङमय अभ्यासकांसाठी तर हे काव्य म्हणजे खजिना आहेच, तसंच माझ्यासारख्या सामान्य वाचकांसाठीही वृत्तविविधतेमुळे तयार होणार्‍या वेगवेगळ्या चाली, त्यातून निर्माण होणारे ध्वनी, अनुप्रासामुळे तयार होणारी गंमत आनंददायक आहे. त्याचबरोबर या संस्कृतप्रचुर काव्यात संस्कृत भाषेचा गोडवा आहे. अर्थात संस्कृत न शिकलेल्यांसाठी (मीही त्यातलीच) अर्थ समजणं थोडसं क्लिष्ट आहे. पण प्रियोळकरांच्या या पुस्तकात दिलेल्या शब्दार्थांमुळे ते सोपं झालं आहे. हा लेख लिहायला घेतल्यावर आणखी थोडंसं संशोधन करताना मला सीताराम विष्णू सरवटे संपादित, याच काव्याचं पण 'नल-दमयंती-स्वयंवराख्यान' नावाचं दुर्मीळ पुस्तक हाती लागलं, ज्यामुळे हे काव्य समजणं आणखीनच सोपं झालं. या काव्यात मध्येमध्ये अरबी, फारसी शब्दांचाही वापर आढळतो. या काव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नादमय, लयबद्ध आणि चित्रदर्शी शब्दरचना. या काव्याचे नायक-नायिका आहेत नल-दमयंती, पण त्याबरोबरीच कांचनतनू राजहंसाची मोठी भूमिका आहे.
राजहंस पक्षी हा देवलोकातील पक्षी मानला जातो. कैलासातील मानसरोवरात त्याचा वास असून त्याच्याकडे नीरक्षीरविवेक क्षमता आहे. याशिवाय राजहंस आपल्या जोडीदाराशी नेहमी एकनिष्ठ असतो. नल-दमयंतीच्या मिलनात म्हणूनच राजहंस पक्ष्याची निवड केली असावी.
या काव्याची वैशिष्ट्यं लक्षात यावी, तसंच आस्वाद घेता यावा, म्हणून काही निवडक (सार्थ) पद्यचरण प्रस्तुत करीत आहे.
चरण २ : वृत्त गीति/आर्या, अलंकार - नलसती शब्द/श्लेष.
इन्द्रादिक वर असतां कसी नलसतीच होय दमयंती।
सुंदर सकल वधूंते कसली न लसतीच होय दमयंती॥
इंद्रादिक वर असूनही दमयंती नळाचीच पतिव्रता (नलसती) कशी झाली आणि अनेक सुंदर स्त्रिया (वधू) न होता रूपवती, तेजस्वी (लसती) दमयंतीच नळाची वधू कशी झाली, याविषयीची कथा सांगतो.
चरण ६ : वृत्त - शार्दूलविक्रीडित.
वाजीचे मन जाणता सकळही राजी शिपाई जया।
याजी होऊनि जो द्विजांसि म्हणतो 'या जी धनें घ्यावया'॥
त्याजी जो धनदापरी सुकृत जें त्या जीव ऐसें गणी।
गाजी तो नलभूप हूप धरूनी गा जी गुणांच्या गणी॥६॥
वाजी (घोडा)ची ज्याला उत्तम पारख आहे आणि जो अश्वविद्येत प्रवीण आहे, जो यज्ञयाग करून ब्राह्मणांना दक्षिणा देतो, ज्याच्याकडे कुबेरासारखे धन आहे आणि जो तितकाच त्यागी आणि दानशूर आहे, पुण्यकृत्य करणं हे ज्याला भूषणावह वाटतं (सुकृत), जो पराक्रमी (गाजी) आहे अशा नळराजाचे गुणगान गुणिजनांमध्ये जाऊन करा.
चरण १५ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - व्यतिरेक/अतिशयोक्ती

हे वामनैकपद भूमि, नसोनि जंघी।
एके दिनींच रविसूत नभास लंघी॥
वार्राशि वानरविलंघित होय तो कीं।
लोकीं नसे नलमनस्तुलना विलोकीं ॥१५॥
वामनैकपद - वामनाचं एक पाऊल
रविसूत - सूर्याचा सारथी अरुण
वामनाने आपल्या छोट्याशा पावलाने सारी पृथ्वी व्यापली. विनतेचा पुत्र आणि सूर्याचा सारथी अरुण हा पंगू असूनही एका दिवसात नभाला पार करतो. एक वानर (मारुती) उड्डाण करून समुद्र लंघून जातो. पण या सगळ्यापेक्षाही विशाल मनाचा आणि पराक्रमी, नळासारखा राजा तिन्ही लोकी दुसरा कुणीही नाही.
चरण १९ : वृत्त - मालिनी, अलंकार - यमक (रंजयंती/जयंती).
निषधपतिकथा हे जे सुधेतें जयंती।
परिसुनि दमयंती रंजली रंजयंती॥
नवल मज न भासे चन्द्रवंशैकशाली।
नळ तरि वनमाळी भीमजा हेचि जाली ॥१९॥
निषधपतीची (निषध देशीचा राजा नळ याची) अमृतालाही मागे टाकणारी गोड कथा ऐकून एरवी इतरांना आनंद देणारी (रंजयंती) दमयंती मात्र अस्वस्थ, शोकमग्न झाली. पण तिला खातरी होती की नळ हा वनमाळी कृष्णाच्या चंद्रवंशातील आहे आणि भीमजा रुक्मिणीप्रमाणे आपणही भीमककन्या आहोत. तेव्हा कृष्ण-रुक्मिणीप्रमाणे आपलेही मिलन होणार.
चरण २० : वृत्त - माल्यभारा, अलंकार - श्लेष व दृष्टान्त.
नळराजकथा सुधाचि साजे। दमयंती वरवर्णिनी विराजे॥
मिळणी उभयांसी होय जेथे । अधिकारी अधिकानुराग तेथे॥२०॥
नळराजाची कथा अमृताप्रमाणे (सुधा) तर होतीच, तशीच दमयंतीसारख्या वरवर्णिनीने (उत्तम, गुणी स्त्रीने) ती ऐकली, त्यामुळे साहजिकच हा संगम अधिकानुराग (अधिक प्रीती) निर्माण करणारा होता. अनुरागाचा रंग आरक्त आहे. या चरणात सुधा = अमृत, चुना, वरवर्णिनी = उत्तम स्त्री, हळद व अधिकानुराग = विशेष प्रेम, अधिक तांबडा या शब्दांवर श्लेष असून, 'चुना आणि हळद यांच्या संगमाने जसा लालिमा उत्पन्न होतो तसा.... 'हा दृष्टान्त आहे.
चरण २५ आणि २६ : वृत्त - दण्डी.
असें बोलतां चार समाचारा। करी दमयंती नलमनी विहारा ॥
"नोवरी ते मज होय कशी दारा"। करूं लागला भूप या विचारा ॥२५॥
विभूतीने झांकला अनळसा तो। गुप्त दमयंतीविरह नृपा होतो ॥
नित्य पोटीं वडवाग्नि पेट घेतो। सागरानें तो काय सांगिजेतो ॥२६॥

भीमकाच्या दरबारची खबर घेऊन येणार्‍या चरांनी (हेरांनी) दमयंतीचं वर्णन केल्यावर झालेल्या नलाच्या स्थितीचं अतिशय यथार्थ वर्णन या चरणात केलं आहे.

चरांकडून दमयंतीचं वर्णन ऐकल्यावर नलाच्या मनात दमयंती विहार करू लागते. ही 'नोवरी' म्हणजे उपवर कन्या माझी 'दारा' म्हणजे पत्नी कशी होईल, याची विचारणा नलराजा चरांजवळ करतो. ज्याप्रमाणे आपल्या उदरीचा वडवानल सागर पोटातच दडवतो, तद्वत दमयंती विरहाचा अनळ (अग्नी) त्याने मोठ्या प्रयत्नाने विभूतीने (राखेने) झाकावा तसा झाकला आहे (प्रकट केला नाही).
चरण २७ : वृत्त - वसंततिलका.
मानी मनोजशर हारतुरे फुलांचे
कंदर्पकोपवचन ध्वनि कोकिलांचे॥
राकाशशी मदनदर्पण भाविला. हे- ।
नेघेचि, तो न परिसे, न तयासि पाहे ॥२७॥

मनोजशर (मदनबाण) फुलांचे हारतुरे, कोकीळस्वरातील मदनाचं बोलणं, पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्ररूपातील मदनदर्पण यापैकी हार, स्वर, रूप कशातही नळाचं मन रमलं नाही.
चरण २८ : वृत्त - शार्दूलविक्रीडित.
छायानायकसा निदाघसमयीं छाया धरी तो विधू ।
पायांहीं हृदयश्रमासि करितो दायादसा हा मधू॥
जाया जे रुचली मनीं तिजकडे जाया न ये की पहा ।
रायाला न गमे न जाय रजनी आयास होती महा ॥२८॥

जिला भेटण्याची इच्छा आहे, तिची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे नळराजा व्याकूळ झाला आहे. मधुमास (वसंत ऋतू )असूनही मन उल्हासित न होता शिणलं आहे. आकाशीच्या चंद्राचे किरण शीतल न वाटता निदाघसमयी (उन्हाळ्यात) तळपणार्‍या छायानायकाच्या (छायेचा पती जो सूर्य, त्याच्या) उन्हाप्रमाणे राजाला पोळत आहेत. विरहाग्नीमुळे राजाची अशी स्थिती झाली आहे.
चरण ३० : वृत्त - गीति.
रजनीदिवस गमेना नृपास संगीतही सुख गमेना।
मन कोठेंहि रमेना, म्हणूनि 'करूं वनविहार', विरमेना ॥३०॥

दिवसरात्र राजा तळमळत आहे. संगीताचे सूरही त्याचं मन शांत करू शकत नाहीत. कशातही मन रमत नव्हतं, म्हणून अखेर 'वनविहार' करण्यासाठी तो सज्ज झाला.
यापुढील अकरा चरणांत वनविहाराला जाण्यासाठीची नळराजाची सिद्धता, वनसौंदर्याचं वर्णन आणि या काव्यातील प्रमुख भूमिका निभावणार्‍या राजहंसाची भेट याचं अतिशय मनोहार आणि चित्रदर्शी वर्णन केलेलं आहे.
चरण ३१ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - उपमा (पहिल्या तीन ओळी).
गंगातरंगसम जो निज देहवर्णी ।।
भृंगापरी रुचिर कांति जयासि कर्णी ॥
जंघाल जो पवनसंगतिची सवे घे।
श्रृंगारिला हय तयावरि भूप वेंघे ॥३१॥

गंगातरंगसम (गंगेच्या लहरींप्रमाणे पांढराशुभ्र) असा ज्याचा वर्ण आहे, भृंगापरी रुचिर कांतीसम (भ्रमरासारख्या काळ्याभोर रंगाचे) ज्याचे कान आहेत, म्हणजे हा पांढटया रंगाचा श्यामकर्ण घोडा आहे. तो पवनाप्रमाणे जंघाल (वेगवान) आहे, असा हय (घोडा) शृंगारून, त्यावर राजा आरूढ झाला आहे.
चरण ३२ : वृत्त वसंततिलका.
जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निजतनूवरि डाग लाहे ॥
जो या यशास्तव कसें धवलत्व नेघे? ।।
शृंगारिला हय तयावरी भूप वेंघे ॥३२॥

तो घोडा इतक्या वेगाने पळतो की जणू आकाशातून उडत जातो. असे जाताना त्याचा खूर चंद्राला लागला आणि त्यामुळे चंद्रावर डाग आहे. त्याच्या या पराक्रमामुळे बक्षीस म्हणून त्याला चंद्राचं धवलत्व प्राप्त झालं आहे.
चरण ३३ : वृत्त - दण्डी.
सवें सेना भूपाळ निघालाहे । सीम लंघी उद्यान एक पाहे ॥
रिघे तेतें मित सेवकांसि बाहे । फौज सारी बाहेर उभी राहे ॥३३॥

आधी वर्णिलेल्या घोड्यावर भूपाळ स्वार झाला आहे. राज्याच्या सीमेजवळ असलेल्या (शीव) एका उद्यानाशी तो येऊन पोहोचला. सोबत त्याची सेना आहे. पण आता मात्र तो आपल्या मोजक्याच (मित) सैनिकांना घेऊन उद्यानात प्रवेश (रिघे तेथे) करतो. बाकीची फौज बाहेरच उभी राहते.
चरण ३४ : वृत्त - दण्डी.
फणस जंबू जंबीर विविध निंबे। कुंद चंदन माकंद दाऽलिंबें॥
तुंग नारिंगे विकसली कदंबें। वसति जेथे शुकसारिकाकदंबें॥३४॥

या उद्यानात नानाविध वृक्षवेली आहेत, ज्यांचं वर्णन या चरणात केलेलं आहे.
पनस (फणस), जंबू (जांभूळ), जंबीर (ईडलिंबू) विविध प्रकारची लिंबं, पांढरी सुवासिक चांदणीप्रमाणे दिसणार्‍या फुलांची कुंदलता, चंदन वृक्ष, माकंद (आंबा), सुदाडिंबे (रसदार अशी डाळिंबे) अशा नाना वृक्षांची इथे दाटी आहे. कदंबाला बहर आला आहे आणि त्यावर शुक सारिकांनी दाटी केली आहे. याखेरीज इथे इतरही तुंग (उंच) वृक्षांची दाटी आहे. असं हे अत्यंत रमणीय असं स्थान आहे.
चरण ३५ : वृत्त - वंशस्थ, अलंकार - सहोक्ति.
लतेतळी रुंद निरुंद कालवे। गळोनि तेथें मकरंद कालवे॥
परागही सांद्र तयांत रंगती। फुलांसवें भृंगतती तरंगती॥३५॥

उद्यानातील वेलींच्या तळाशी निरुंद (अरुंद) कालवे वाहात आहेत. त्यात फुलांतील मकरंद (मध) टपकत आहे आणि कालव्याच्या पाण्यात मिसळत आहे. त्याच पाण्यात परागांनी (फुलांतील केसरांनी ) दाटी केली आहे. त्या केसरांचा रंग पाण्यात उतरला आहे. या पाण्यात पाकळ्यांचीही पखरण आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर या पाकळ्याही वाहत जात आहेत. आणि या सगळ्याने आकृष्ट होऊन भृंगततीही (भुंग्याचे थवे) त्या पाण्यातील मधाची आणि सुवासाची मजा चाखत पाण्याबरोबर तरंगत जात आहेत.
चरण ३६ : वृत्त - गीति, अलंकार - विरोधाभास.
उपरीस कंटक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे।
घोंस तसे फणसांचे षण्मासांचे कितेक वरसाचे॥३६॥

वरून सकंटक (काटेरी) असलेल्या, तरी आतून मात्र सुमधुर रसाने युक्त अशा गरांनी जे भरले आहेत, असे असंख्य फणस झाडांवर लागले आहेत.

या चरणात 'साचे' हा अक्षरसमूह मोठ्या कौशल्याने वापरला आहे. साचे = खरे, सांचे = गरे, सुरसाचे = मधुर रसाचे, वरसाचे = वर्षाचे (इथे अनेक या अर्थी).
चरण ३७ : वृत्त - उपेन्द्रवज्रा.
तया वनीं एक तटाक तोयें। तुडुंबले तामरसानपायें॥
निरंतरामंद मरंद वाहे। तपांतही यास्तव रिक्त नोहे॥३७॥

या वनात एक तटाक (सरोवर) असून ज्यातील तामरस (कमळं) कधीही कमी होत नाहीत अशा पाण्याने ते भरलेलं आहे. या पाण्यातही अतिशय मंद पण निरंतर अशी पुष्परसाची भर पडत आहे आणि ग्रीष्माच्या तापातही ते कधी रिक्त होत नाही.
चरण ३९ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - संबंधातिशयोक्ती.
वीतां मरंद उदरंभर बंभरंचें।
जें होय मंदिरहि सुंदर इंदिरेचें॥
तें पद्म जेथिल सहस्र दळां धरी तें।
प्रत्येक सूर्यकिरणास विकासवीतें॥३९॥

या चरणात तळ्यातील कमळांचं वर्णन आहे. हे पद्म (कमळ)) जे इंदिरेचं (लक्ष्मीचं) सुंदर असं मंदिर आहे. (पद्मालया असंही लक्ष्मीचं नाव आहे.) या कमळातून मकरंद स्रवताच (वीतां) उदरंभर (बुभुक्षित) असे बंभर (भ्रमर) तिथे येतात. ही कमळं सहस्रदळांची आहेत, त्यामुळे सहस्ररश्मी सूर्याचा एकेक किरण एकेका कमळदळावरून परावर्तित होतो, एकेक कमळदळाला सुशोभित करतो.
चरण ४०, ४१ : वृत्त - दण्डी.
तया सरोवरि राजहंस पाहे । राजहंसांचा कळप पोहताहे ॥
तयासाठी हे वापिकाच पोहे। नळे केली हे कोण म्हणे नोहे !॥४०॥
तया हंसांचे देह कांचनाचे। पक्ष झळकती वीज जसी नाचे॥
रंग माणीक चंचुचे पदाचे। जसे अधरराग भीमकन्यकेचे॥४१॥

अशा या नळानेच निर्मिलेल्या सरोवरात राजहंसाचा कळप पोहत आहे. त्या हंसांचे देह कांचनासम असून पंख फडकवताच वीज चमकल्याचा भास होतो. भीमककन्येच्या - म्हणजे दमयंतीच्या अधरांप्रमाणे त्यांच्या चोचींचा आणि पायांचा रंगही माणकासारखा आहे.
चरण ४२ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - स्वभावोक्ति.
तेथील एक कलहंस तटीं निजेला।
जो भागला जलविहार विशेष केला॥
पोटींच एक पद, लांबविला दुजा तो।
पक्षी तनू लपवि; भूप तया पहातो॥४२॥

त्या हंसापैकीच एक कलहंस (राजहंस) विशेष जलविहार केल्यामुळे थकून भागून सरोवराच्या काठावर निजला होता. आपला एक पाय त्याने पोटाशी दुमडून घेतला होता, तर दुसरा लांब केलेला होता. राजाचं त्याच्याकडे लक्ष जाताच त्याने आपला देह पंखात लपवला.
चरण ४३ : वृत्त - वसंततिलका, अलंकार - स्वभावोक्ति.
टाकी उपानह पदें अतिमंद ठेवी।
केली विजार वरि डौरहि मौन सेवी॥
हस्ती करीं वलय उंच अशा उपायीं।
भूपें हळूच धरिला कलहंस पायीं॥४३॥
नळराजाने आपले जोडे (उपानह) काढून ठेवले आणि अगदी मंद, हलकी पावलं टाकत तो पुढे झाला. आपली (विजार) चोळणा वर ओढला आणि डौर म्हणजे आपल्या घोळदार अंगरख्याचा जराही आवाज होणार नाही अशा बेताने तो जाऊ लागला. आपल्या हातातील वलयं (कंकणं/कडी) कोपराच्या दिशेने वर केली आणि अगदी अलगदपणे पुढे जात आपल्या दोन्ही हातांचं कडं करून त्या कलहंसाला हळूच पकडलं.
चरण ४४ : वृत्त - मालिनी.
कलकल कलहंसें फार केला सुटाया।
फडफड निजपक्षीं दाविलीही इडाया॥
नृपतिस मणिबंधीं टोंचिता होय चंचु।
धरिल दृढ जया त्या काय सोडील पंचू ?॥४४॥
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवनजलकेली जे कराया मिळाले॥
सजण गवसला जो याचपासीं वसे तो।
कठिण समय येतां कोण कामास येतो!॥४५॥

तावडीत सापडलेला तो हंस सुटकेसाठी धडपडू लागला. त्यासाठी त्याने अगदी नृपतीच्या मणिबंधावर (मनगटावर) चोचीने टोचण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण नळाने आपल्या मजबूत पंजात पकडल्यामुळे ती सारी धडपड फोल ठरली. याचा परिणाम असा झाला की जलविहारासाठी जमलेले इतर राजहंस, आपल्या सख्याला सोडून, (भेणे ) भिऊन पळाले. म्हणूनच कवी सत्य सांगतो -
'कठीण समय येता कोण कामास येतो!'
अनेक आर्जवं केल्यानंतर आणि नळराजाला मदत करण्याचं आश्वासन दिल्यावर हंसाची सुटका होते. काय होतं ते आश्वासन?
चरण ६३ : वृत्त - द्रुतविलंबित.
विरहिसा दिसतोसि महा नळा। तरि हरीन तुझ्या विरहानळा॥
चतुर जे तरुणी ह्रुदयंगमा। करवितों तिजसीं तुज संगमा॥६३॥

या चरणात हंस म्हणतो, "हे नळराजा, मला तू विरहाकुल दिसतो आहेस. तू जिच्यासाठी झुरतो आहेस, त्या चतुर, सुंदर रमणीचा आणि तुझा संगम घडवीन आणि तुझा विरह हरीन (दूर करेन).
या अशा आश्वासनानंतर 'बरं, येतो' म्हणून तो नळराजाचा निरोप घेतो. काही दिवसांनी विदर्भदेशाची राजधानी असलेल्या कुंडिननगरीच्या दिशेने तो उड्डाण करतो. वाटेत त्याला काही शुभशकुन होतात आणि लवकरच तो राजधानी कुंडिननगरीत प्रवेश करतो.
चरण ९१ : वृत्त - चूर्णिका.
सकलभुवनललामायमाना। मानाधिकविभवधनिकसदनशतविराजमाना॥
कलशजनितमुनिचकितपंचजलधिशरणायितविस्तारपरिखांतरीपायमाना॥
असमाना जीचे सौध-विमाना, गगन धराया स्तंभच माना॥
लाविति जे जलदां निज माना। वासवचाप जयांस कमाना॥
ऐसी कुंडिननामधेय नगरी राजहंसें पाहिजेसी पाहिजेली ॥९१॥

या चरणात कुंडिननगरीचं वर्णन केलं आहे. हा चरण वाचताना लक्षात येते की ही रचना संस्कृत काव्याप्रमाणे आहे. मध्ये खंडित न होणारी लांबच लांब शब्दरचना इथे दिसते.
सकलभुवनात अर्थात त्रिभुवनात, लालामायमाना (भूषण ठरलेली) अशी ही नगरी आहे. इथे मानाधिक (अमित/अगणित) अशी संपत्ती आहे. शेकडो धनिकांची सदनं इथे विराजित आहेत. कलशजनितमुनींना (अगस्त्य ऋषींना) घाबरून पंचमहासागर राहतील एवढ्या मोठ्या विस्ताराचा खंदक असलेल्या या नगरीत पंचमहासागरांनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे तिला जणू बेटाचं स्वरूप प्राप्त झालं आहे, अशी ही नगरी. इथे असमाना (अजोड अप्रतिम) असे गगनचुंबी सौंध आणि मनोरे आहेत. इतके की ते जणू गगनाला आधार देत आहेत. ते आकाशातील जलदांना (ढगांना) स्पर्श करत असून वासवचाप म्हणजे इंद्रधनुष्याची त्यावर कमान आहे. अशी ही अद्भुत आणि देखणी अशी 'कुंडिन नामधेय'असलेली नगरी राजहंसाने पाहिली.

आपल्या सख्यांसह खेळणारी दमयंती राजहंसाने पाहिली आणि युक्तीने तिला सख्यांपासून दूर घेऊन आला. एकांतात आल्यावर मग नळराजाविषयी तो तिच्याशी संवाद करू लागला आणि शिष्टाई करत म्हणाला,

ddd

चरण १३५/१३६ वृत्त....दण्डी
"जसी रंजलीस तूं निषधभूपीं। तसा तोही रंजला तुझ्या रूपीं॥
दैवघटितें अन्योन्य व्हाल सोपी। तुम्ही नांदाल सत्य मी निरोपीं॥१३५॥
कोण योजावी नोवरी नळाला। ब्रह्मदेवे हा जैं विचार केला॥
तुझा नामाक्षरसंघ घेइजेला। असें भासतें माझिया मनाला"॥१३६॥

तू जशी निषधभूपावर (नळराजावर) अनुरक्त झाली आहेस, तसाच तिकडे नळराजाही तुझ्या रूपावर भाळला (रंजला) आहे. दैवघटिताप्रमाणे तुम्ही अन्योन्य (दोघेही एकमेकांना) सुलभप्राप्त व्हाल, असं मी भाकीत (निरोपी) करतो. नळासाठी कोणती वधू योजावी असा विचार जर ब्रम्हदेवाने केला, तर तोही तुझ्याच नामाक्षरसंघाची (देवयानी या नावाचीच) निवड करील हे निश्चित.
अशा प्रकारे दमयंतीच्या मनातील नळाविषयीची प्रीती अधिकच गाढ केल्यावर हंस म्हणतो,
चरण १४० : वृत्त - मालिनी.
करुनि मज रवाना राजसे तूजसाठीं।
नृपति निरखि माझी वाट आरामवाटीं॥
बसवुनि निजपाठी तूज नेईन तेथें।
परि चुकुर तुझे हे लोक होतील येथे"॥१४०॥

"हे सुंदरी, आपल्या मनातील भाव तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला रवाना करून, उत्तरासाठी अधीर असलेला नृपती आरामवाटिकेत माझी वाट पहात बसला असेल. खरं तर माझ्या पाठीवर बसवून मी तुला आत्ताच तिकडे घेऊन गेलो असतो. पण तू नाहीशी झालेली कळताच राजवाड्यातील सारे जण घाबरे (चुकूर) होतील. तेव्हा आता मी तुझा निरोप घेतो" आणि नळराजाला निरोप देण्यासाठी हंसाने उड्डाण केले.
यानंतर प्रीतिविरहाने दमयंतीची अवस्था अगदी वेड्यासारखी झाली. त्या अवस्थेचे वर्णन १४६व्या चरणात केले आहे.
चरण १४६ : वृत्त - शिखरिणी.
न रंजे कारंजे निरखुनि फणीने फणफणी।
मुदेनें मोदेना नळगुणगणी जे गुणगुणी॥
न बैसे जे सेजेवरि न परिसे जे शुकगिरा।
न नाहे, माना हे न धरि ललना हेतु दुसरा॥१४६॥

एरवी मनाला आनंद देणारे कारंजे बघण्यातही तिचे मन लागत नाही (न रंजे). आपले केस विंचरण्याचीही शुद्ध तिला राहिली नाही की मुदा (केसांचे आभूषण) केसात खोवण्याची इच्छा तिला होत नाही. नळाशिवाय तिला दुसरं काहीच सुचत नाही. सेजेवर (शय्येवर ) बसून तिला चैन पडत नाही की शुकाचं बोलणं तिला मोहवत नाही. (न नाहे) तिला स्नान करण्याचीही शुद्ध नाही. थोडक्यात, तिच्या मनाला काहीच रुचेनासं झालं आहे.
आपल्या मनातील भावना वडिलांपाशी बोलण्याची तिची हिम्मत झाली नाही आणि त्यामुळे तिची प्रकृती बिघडू लागली. एक दिवस ती मूर्छित झाली. सगळीकडे धावपळ सुरू झाली. अनुभवी दासी उपचार करू लागल्या. आई धावत आली. तिला विजणवारा (पंख्याने वारा) करू लागली. या उपचारांनी शुद्धीवर आल्यावर ती आईला हळूच म्हणते,

a

"औषध नलगे मजला"
हे तर श्लेष अलंकाराचं अतिप्रसिद्ध उदाहरण आहे.
आपल्या या उपवर मुलीसाठी वरसंशोधन करायला पाहिजे, याची जाणीव होऊन भीमक राजा तिच्या स्वयंवराची घोषणा करतो.

या पुढच्या २४९ चरणांपर्यंतच्या भागात स्वयंवरासाठी इंन्द्रादिक देवता, पराक्रमी राजे इत्यादींना पाठवलेली निमंत्रणं, दमयंती आणि तिच्या सख्यांमधील संवाद, इंद्रादिक देवांनीही नळाचं रूप धारण केल्यामुळे खर्‍या नळाला ओळखण्यासाठी चाललेला दमयंतीचा प्रयत्न इत्यादी वर्णन केलं आहे.
अखेर खर्‍या नळाला ओळखल्यावर दमयंतीच्या मनाच्या स्थितीचं वर्णन २५०व्या चरणात केलं आहे.
चरण २५० : वृत्त - वसंततिलका.
मायेचना सुख मनी, कमनीय बाला।
मायेसही विसरली; न पुसेच बा-ला॥
दूर्वादली कलितबंध-मधूक-माला।
तीणें अलंकृत करी नल-कंठनाला ॥२५०॥

त्या कमनीय बालेच्या मनात आनंद मावेना (मायेचना). त्या आनंदात ती आपल्या (मायेसही) आणि बापाला (बा-ला) विसरली. दुर्वादलांनी आणि कदलीबंधाने (केळीच्या सोपटाने) बांधलेल्या मधुक (मोहाची फुलं) मालेने नळराजाच्या कमळदेठासारख्या गळ्याला अलंकृत (सुशोभित) केलं. अशा प्रकारे नल-दमयंती यांचं मिलन झालं. चार दिवस लग्नसोहळा करून वधुवर मिरवत नेले, नानापरीची मिष्टान्नं खाऊन, भीमकाचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन दमयंतीसमवेत नळराजा आपल्या नगरीत परतला.
अशा प्रकारे सुखान्त असणारं हे दमयंती स्वयंवर आख्यान.

व्याकरणाच्या दृष्टीने हे काहीसं क्लिष्ट आहे. पण ज्याप्रमाणे मनाला आनंद देणारं, मनाला स्पर्शून जाणारं संगीत ते उत्कृष्ट संगीत - मग त्यासाठी श्रोत्यांना तांत्रिक बाबी ठाऊक नसल्या तरी हरकत नसते, तद्वत या काव्याच्या व्याकरणात न शिरताही हे आपल्याला आनंद देऊन जाईल, हे खचितच!

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

क्या बात हैं! सुंदर रसग्रहण.
एक जुनं काव्य देखणेपणाने उलगडून दाखवलंत.
एखाद्या भारी वस्त्रावरलं सोन्याचं नाजूक जरीकाम बघितल्यासारखं वाटलं.

नूतन's picture

26 Oct 2019 - 8:24 pm | नूतन

धन्यवाद

टाकी उपानह पदे... असे शिर्षक वाचून काहीच अर्थबोध न झाल्याने थोड्या साशंक मनाने धागा उघडला आणि "Don't judge a book by its cover" ह्या इंग्रजी उक्तीचा पुनःप्रत्यय तर आलाच, वर नळ-दमयंती वर आधारित असलेल्या एका उत्तम रसग्रहणाला मुकलो नाही ह्याचे समाधानही लाभले.
छान लिहिले आहे! आवडले 👍

नूतन's picture

26 Oct 2019 - 10:11 pm | नूतन

धन्यवाद

लेख सुरेख आहे. एक गोष्ट जाणवली ती लिहितो. तो शब्द गाझी (पराक्रमी) असा इथे विसंगत आहे कारण त्या उर्दू शब्दाला धर्मयोद्धा म्हणजे काफरांचा विनाश करणारा अशी छटा आहे.

https://www.urdupoint.com/dictionary/urdu-to-english/ghazi-meaning-in-en...

बहुतेक गाजलेला = गाजी असे ते काहीतरी असावे, या विषयाचा अभ्यास नसल्यामुळे नक्की सांगता येणार नाही मला.

नूतन's picture

27 Oct 2019 - 10:57 am | नूतन

रघुनाथ पंडित शिवकालीन होते असा उल्लेख आढळतो. साहजिकच त्या काळी मराठी भाषेत अरबी, फारसी,उर्दू शब्दांचा वापर केला जात होता. माझ्याकडे उर्दू हिंदी शब्दकोशात ग़ाजी या शब्दाचे दोन अर्थ आहेत ...एक आपण लिहिल्या प्रमाणे धर्मयोद्धा आणि दुसरा वीर . तेव्हा तार्किक दृष्ट्या या काव्यातील वापरलेला गाजी हा शब्द वीर,पराक्रमी या अर्थीच असावा असे म्हणायला हरकत नाही.

कंजूस's picture

27 Oct 2019 - 7:29 pm | कंजूस

उत्तम.

वाह ! विषय आणि त्याचे रसग्रहणही छान !
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 10:42 pm | पद्मावति

उत्तम रसग्रहण.

दमयंती स्वयंवराचे आख्यान छानच. चित्रांची निवड उत्कृष्ट, राजा रवी वर्मा ?

माझे मराठी काव्याचे ज्ञान शून्यावर तीन शून्ये टाईपच आहे पण मराठी वृत्तांच्या करामती ह्यात फार आहेत असे ऐकून माहिती होते, तुम्ही दाखलेच दिलेत भरपूर.

थोडे अवांतर :- 'औषध नलगे मजला' हे मात्र माहिती होते. आमच्या एका परिचितांचे आडनाव 'नलगे' आणि त्याच्या भावाचा औषधविक्रीचाच (!) व्यवसाय आहे, त्यामुळे हा श्लेष अपील होतो नेहमी :-)

नूतन's picture

30 Oct 2019 - 9:00 am | नूतन

शैलीवरून चित्रं रविवर्माचीच असावीत. आंतर्जालावर शोधताना सुयोग्य वाटली म्हणून निवडली.

नूतन's picture

30 Oct 2019 - 9:02 am | नूतन

अभिप्रायांबद्दल सर्वांचे आभार.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 1:37 pm | गुल्लू दादा

तुम्ही मराठी रूपांतर केलं नसतं तर मला काहीच कळालं नसतं... अवघड आहे समजण्यास...छान रसग्रहण केलंय तुम्ही...धन्यवाद

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 4:34 pm | श्वेता२४

अतीशय सोप्या भाषेच समजावून सांगितलंय. भाषेची मजा समजून घेण्यास मदत झाली. सुरेख लेख

नरेश माने's picture

2 Nov 2019 - 4:35 pm | नरेश माने

छान रसग्रहण!
याच पुस्तकातील एक वेचा-
म्हातारी उडता न येच तिजला माता मदीया तसी|
कांता काय वदो नवप्रसव ते साता दिसांची असी||
त्राता त्या उभयांस मी मज विधी घातास योजीतसे|
हातामाजि नृपाचिया गवसलो आता करावे कसे! ||

नलराजाने राजहंसाला पकडल्यानंतर राजहंस या प्रकारे नलाची सोडण्यासाठी विनवणी करतो तेव्हाचे. हे मी शार्दूलविक्रीडित वृत्ताच्या उदाहरणासाठी परीक्षेत वापरायचो ते आठवले.

नूतन's picture

2 Nov 2019 - 6:52 pm | नूतन

गुल्लूदादा,श्वेता२४,नरेश माने आभार
म्हातारी उडता.....
बरोबर आहे. शार्दूलविक्रीडित वृत्तातील हा चरण याच काव्यातील आहे.

गामा पैलवान's picture

3 Nov 2019 - 7:44 pm | गामा पैलवान

नूतन,

वृत्तालंकारविलासिनी असलेल्या मायमराठीची ओळख करवून दिल्याबद्दल आभार! मराठीस अभिजात दर्जा मिळायचा तेव्हा मिळेल. पण तोवर आपण रसिकांनी तिच्यातलं अभिजात सौंदर्य संततधारैव आस्वादिलं पाहिजे. हे काम तुम्ही सुरू केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हांस वेळोवेळी अनेक वाङ्मयरत्नांचं रसग्रहण करण्याची उर्मी लाभो.

आ.न.,
-गा.पै.

जाताजाता : ते मानसरोवर नको हो. मानससरोवर करा.

यशोधरा's picture

3 Nov 2019 - 8:01 pm | यशोधरा

मानसरोवर बरोबर आहे, मानस नव्हे.

गामा पैलवान's picture

4 Nov 2019 - 2:24 pm | गामा पैलवान

यशोधरा,

मानससरोवर हेच नाव योग्य आहे. कारण की याचं दुसरं नाव मानसतीर्थ आहे. मानतीर्थ नव्हे. शिवाय मानसरोवर असा चुकीचा उच्चार लिहिलाय त्या हिंदी विकीवरही याची फोड मानस + सरोवर अशीच दिलेली आहे.

इंग्रजीत डबल एस चा उच्चार सिंगल एस सारखाच होतो. त्यामुळे ही विकृती निपजली असावी.

आ.न.,
-गा.पै.

यशोधरा's picture

4 Nov 2019 - 3:59 pm | यशोधरा

गा. पै.

विकृती वगैरे काही नाहीये, मानसरोवर बरोबर नाव आहे, संस्कृतमध्ये मानस हे योग्य आहे. असो.

images

गामा पैलवान's picture

4 Nov 2019 - 5:39 pm | गामा पैलवान

यशोधरा,

चुकीचं नाव कितीही ठिकाणी कितीही वेळा लिहिलं तरी ते चुकीचंच असतं. म्हणूनंच मूळ संस्कृत नाव वापरणं इष्टं. असं आपलं माझं मत. बाकी आपापली मर्जी.

आ.न.,
-गा.पै.

यशोधरा's picture

4 Nov 2019 - 5:43 pm | यशोधरा

बाकी आपापली मर्जी.

बरोबर. हे लक्षात येत असेल तर उत्तम आहे, प्रश्नच मिटला.

नूतन's picture

6 Nov 2019 - 2:44 pm | नूतन

माझ्या माहितीप्रमाणे मानसरोवर बरोबर असावं. एका लेखात वाचल्याप्रमाणे मानसरोवर हा संस्कृत शब्द असून तो मानस आणि सरोवर या शब्दांपासून बनलेला संयुक्त शब्द आहे.

धर्मराजमुटके's picture

3 Nov 2019 - 8:56 pm | धर्मराजमुटके

संपुर्ण दिवाळि अंकात हा लेख अगदी दृष्ट लागण्याजोगा झाला आहे. आता जुन्या कवितांच्या एखादा धागा काढावा लागेल.

नूतन's picture

6 Nov 2019 - 2:45 pm | नूतन
नूतन's picture

6 Nov 2019 - 2:45 pm | नूतन
नूतन's picture

6 Nov 2019 - 2:46 pm | नूतन

मनापासून धन्यवाद !

धर्मराजमुटके's picture

3 Nov 2019 - 8:56 pm | धर्मराजमुटके

संपुर्ण दिवाळी अंकात हा लेख अगदी दृष्ट लागण्याजोगा झाला आहे. आता जुन्या कवितांच्या एखादा धागा काढावा लागेल.

प्रचेतस's picture

4 Nov 2019 - 9:54 am | प्रचेतस

प्रियोळकर म्हणजे फार मोठे इतिहासतज्ज्ञ. त्यांनी संपादित केलेले पुस्तक तुम्हाला लाभले. भाग्यवान आहात.
रघुनाथपंडितांची सर्वश्रेष्ठ रचना म्हणजे दमयंती स्वयंवर. हे काव्य श्रीहर्षाच्या 'नैषधीयचरित' ह्या महाकाव्याच्या आधारे लिहिले असे पंडित शेवटी लिहितात.
दमयंतीस्वयंवराशिवाय रघुनाथपंडितांची गजेंद्रमोक्ष आणि रामदासवर्णन ही इतर काव्ये प्रसिद्ध आहेत. मात्र इतकी प्रतिभा असलेल्या पंडिताचे म्हातारपणाचा काल अत्यंत विपन्नावस्थेत गेला. त्यांच्या ह्या अवस्थेवरील श्लोक तंजावर प्रांतात प्रसिद्ध आहे.

म्हातारा बहु जाहलों, कवण ही त्राता नसे भेटला
भाताची तजवीज तेच उदरी भाता गमे पेटला |
हातामाजि नसेच येक कवडी हा ताप आतां हरी
दातारा मज वाचवी सदय हो माता पिता तु हरी ||

मात्र रघुनाथ पंडिताच्या विपन्नावस्थेचे हे वर्णन कपोलकल्पितही असावे.
काही संशोधक रघुनाथपंडित हेच शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले राज्यव्यवहारकोषकार रघुनाथ नारायण हणमंते हेच आहेत असे मानतात. साक्षात छत्रपतींचे व्यंकोजीस उद्देशून लिहिलेले एक अस्सल पत्र उपलब्ध आहे.

"रा. रघुनाथ पंडित त्या प्रांतें आहेती, तें काही इतर नव्हेतीं, आम्हांस मानितांत तैसें तुम्हांस मानितांत"

नूतन's picture

6 Nov 2019 - 2:47 pm | नूतन

अभिप्राय आणि माहिती बद्द्ल धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2019 - 7:45 am | प्राची अश्विनी

प्रतिसाद आवडला.

"सजण गवसला जो याचपासीं वसे तो।" या ऐवजी "स्वजन गवसला जो त्याजपासी नसे तो|" असे वाचल्याचे आठवते.

नूतन's picture

6 Nov 2019 - 2:56 pm | नूतन

मूळ रचनेत सजण हा शब्द आहे. इथे सजण म्हणजे सखा,मित्र या अर्थी हा शब्द येतो. आतापर्यंत एकमेकांचे सवंगडी असे ते सारे हंस जलक्रीडा करत होते .त्यापैकी एका सजणाला/ सख्याला राजाने पकडले. तेव्हा मात्र हे सवंगडी पळाले.
प्रतिक्रिये बद्दल आभार

शा वि कु's picture

4 Nov 2019 - 11:47 am | शा वि कु

लेख फारच आवडला.

नूतन's picture

6 Nov 2019 - 2:48 pm | नूतन

धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2019 - 7:43 am | प्राची अश्विनी

संग्रही ठेवण्यासारखा लेख. आवडलाच.

चौकटराजा's picture

14 Nov 2019 - 9:33 am | चौकटराजा

आपण लिहिलेले पहिलेच काव्य आम्हास शिकवताना वर्ग " केली विजार वरि ' ला वर्गातील वात्रट पोरे फिदी फिदी हसत असत. पण बाई तन्मय होऊन शिकवायच्या ! पेपरात हुकमी मार्क मिळविण्यासाठी वृते , छंद यांचा उपयोग तर व्हायचाच पण निरनिराळे अलंकार अभ्यासताना रंजन ही होत असे .नीतिशतक, श्रुंगारशतक च्या आठवणी आता पुसट झाल्या खऱ्या पण आपण लहानपणात नेलेत यासाठी धन्यवाद !

धर्मराजमुटके's picture

15 Nov 2019 - 8:51 pm | धर्मराजमुटके

'या कुंदेंदु तुषार हार धवला' हा असाच एक सालस श्लोक आमच्या लहानपणी वात्रटपणास बळी पडलेला आठवतो.
निशेश्य "जाड्या" पहायला आम्हाला फार आवडे.

नूतन's picture

15 Nov 2019 - 2:22 pm | नूतन
नूतन's picture

15 Nov 2019 - 2:29 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

केली विजार वरि ' ला वर्गातील वात्रट पोरे फिदी फिदी हसत असत :)

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 2:03 pm | मुक्त विहारि

आवडलं

स्मिताके's picture

12 Dec 2019 - 7:58 pm | स्मिताके

अगदी सोप्या भाषेत अर्थ समजावलात. व्याकरण आणि काव्यातलं सौंदर्य दोन्ही इतकं सुरेख उलगडून दाखवल्याबद्द्ल आभार!

दीपा माने's picture

15 Dec 2019 - 7:29 am | दीपा माने

इथे अमेरिकेत नाॅर्थ अमेरिकेतून प्रसिध्द होणार्या ‘एकता’ या त्रैमासिकातून सर्व वृत्ते आणि त्यांची सोदाहरण माहिती प्रसिध्द झाली होती त्याची आठवण झाली.
आपला हा लेख साठवला आहे. धन्यवाद.

स्वाती जोशी's picture

6 Jul 2020 - 10:32 pm | स्वाती जोशी

विजार हा शब्द तेव्हा होता?

अरविंद कोल्हटकर's picture

11 Aug 2020 - 8:31 am | अरविंद कोल्हटकर

काही वर्षांपूर्वी 'ऐसीअक्षरे' ह्या संस्थळावर मी रघुनाथ नावाच्या तंजावरच्या मराठी व्यक्तीने लिहिलेल्या 'भोजनकुतूहल' नावाच्या ग्रंथाचा परिचय करून देणारे तीन लेख लिहिले होते. (त्यांपैकी पहिला लेख येथे आहे.) त्या लेखाअखेरीस पुढील पृच्छा केली होती,

" प्रस्तुत ग्रंथाचा लेखक रघुनाथ कोण असावा? ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये पूर्वी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे बरीच वर्षे क्यूरेटर असलेले डॉ.प.कृ.गोडे ह्यांच्या संशोधनाच्या आधारे असे लिहिले आहे की हा रघुनाथ नवहस्त (नवाथे) आडनावाचा एक महाराष्ट्रीय कर्‍हाडा ब्राह्मण समर्थ रामदासांच्या परिवारात होता आणि रामदासांनी त्याला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. काही काळ चाफळच्या राममंदिराच्य़ा देखभालीचे काम त्याच्याकडे होते. नंतर १६७८च्या सुमारास तो दक्षिणेकडे भोसले घराण्याच्या तंजावर शाखेच्या आश्रयास गेला. त्याचे अन्य सात संस्कृत आणि तीन मराठी ग्रंथ माहीत आहेत.

त्याचे हा तंजावर संबंध पाहता अशी शंका घेता येईल काय की नलदमयन्तीस्वयंवराचा कवि रघुनाथपण्डित तो हाच काय? असे मी फार सावधपणे लिहीत आहे कारण डॉ गोडेंनी असे कोठेहि सुचविलेले नाही. परन्तु विश्वकोशामधील रघुनाथपंडितावरील लेखन आणि महाराष्ट्रसारस्वताच्या पुरवणीमध्ये डॉ.शं.गो.तुळपुळे ह्यांचे त्याच्यावरील लिखाण ह्या दोहोंमध्ये तो तंजावरला १६७५च्या पुढे गेल्याचा उल्लेख आहे, तसेच तो रामदासांच्या परिवारातील एक होता असेहि म्हटले आहे. भोजनकुतूहलकार रघुनाथ आणि नलदमयंतीकार रघुनाथपंडित ह्यांच्या चरित्रांतील हे समान दुवे पाहता ते दोघे एकच व्यक्ति असण्याची शक्यता दृष्टिआड करता येईल काय?

(नलदमयंतीस्वयंवरातील हा श्लोक, कमीतकमी त्यातील शेवटची ओळ, बहुतेकांस माहीत असते:
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवन जलकेली जे कराया मिळाले।
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?) "

भोजनकुतूहलकार रघुनाथ आणि नलदमयंतीकार रघुनाथपंडित हे एकच व्यक्ति होते काय ही माझी शंका अजूनहि अनुत्तरित आहे.

नूतन's picture

17 Aug 2020 - 3:54 pm | नूतन

श्री .अ.का.प्रियोळकर यांनी संपादित केलेल्या दमयंती स्वयंवर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत रघुनाथपंडित नक्की कोण? कुठल्या प्रांतातला किंवा काळातला?याविषयी बराच उहापोह केला आहे. पण निश्चित उत्तर नाही. पण अखेरीस ते म्हणतात की, तो नक्की कोण हे समजलं नाही तरी त्याच्या काव्यापासून प्राप्त होणा-या आनंदात मुळीच फरक पडणार नाही.
तूर्तास आपण तो आनंद घेऊ.