सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ९: काज़ा ते लोसर. . .

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
4 Oct 2019 - 6:34 pm

९: काज़ा ते लोसर. . .

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ७: नाको ते ताबो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: ताबो ते काज़ा

५ ऑगस्टची सकाळ! काज़ामध्ये चांगला आराम झाला. जम्मू- कश्मीर अभूतपूर्व प्रकारे शट डाउन झाल्यामुळे मी लदाख़कडे जाऊ शकणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मनात आता दोन पर्याय आहेत. एक मन म्हणतंय की, कमीत कमी केलाँगपर्यंत तरी जा. केलाँग हिमाचलमध्येच आहे. आणि माझ्या योजनेनुसार तिथे पोहचायला अजून चार दिवस लागतील. पण त्यात अडचण अशी आहे की, तब्येतीचा तितका भरवसा वाटत नाहीय. आणि केलाँगकडे जाण्यासाठी मला आधी लोसर- बातल- ग्राम्फू ह्या भागातून जावं लागेल. इथे रस्ताच नाहीय. म्हणजे मध्ये मध्ये फक्त अशी थोडी जागा आहे जी ग्लॅशियर्स, झरे, धबधबे, नदी, पर्वत, दरी ह्यांच्यापासून कशीबशी वाचलेली आहे. आणि म्हणण्यापुरते वाहनं "इथून" निघतात आणि कसे काय पण "तिकडे" पोहचतात. त्या ट्रॅकची खूप भिती वाटतेय. तसं‌ तर मी जगातल्या तथाकथित सर्वांत दुर्गम रस्त्यावरच सायकल चालवत इथपर्यंत आलो आहे, पण इथून पुढे असा 'रस्ता'सुद्धा नसणार. आणि दुसरी गोष्ट असंपण वाटतंय की, जर लदाख़ला जाणं होणार नसेल, तर फक्त केलाँगपर्यंत जाऊनही काही विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे फक्त केलाँगपर्यंत जाण्यासाठीच त्या ट्रॅकवरून जावं, असंही इतकं ठीक वाटत नाहीय. असा निर्णय किंवा असा विचार करण्यामागे खूप मोठा बेस अंतर्प्रेरणा हा असतो. आपण सगळी परिस्थिती विचारात घेतो- जसं रस्त्याची स्थिती, हवामान, शरीराचे मॅसेजेस आणि ह्या सर्व बाबींवर निर्णय घेण्याचं काम मात्र आतल्या आवाजाचं असतं. आणि तो आवाज आता मला थांबायला सांगतो आहे. आतला आवाज फार महत्त्वाचा असतो. कारण मी इथवर येऊ शकलो, तेही त्या आवाजाच्या सांगण्यावरूनच! सगळी तयारी केले, सगळे जुगाड केले, तेही त्या आवाजाने सांगितलं म्हणूनच. आज तोच आवाज मला पुढे जाण्यापासून थांबवत असेल तर थांबावं लागेल... शेवटी काज़ामधून निघताना हाच विचार मनात आहे की, काज़ावरून लोसरपर्यंत जाईन आणि लोसरवरून कुंजुमला टॉपला जाईन आणि तिथूनच परत फिरेन. माझी आधीची योजना २०- २१ दिवसांची होती आणि आणखी तीन दिवस सायकल चालवली तर निदान प्लॅनच्या अर्धा टप्पा तरी पूर्ण होईल. म्हणजे १० दिवस सायकलिंग होईल आणि आकड्यांच्या बाबतीत ६०० किलोमीटरही पूर्ण होतील. अर्थात् आता फक्त तीन दिवसांचं सायकलिंग बाकी आहे.

काज़ा! आता वाटतंय इथून परत का- जा? काज़ाच्या हॉटेलवाल्याकडे लोसरपर्यंतच्या रस्त्याविषयी विचारलं. बहुतेक काज़ा आणि लोसरच्या मध्ये मोठं गाव नाही आहे. अंतर तसं फक्त ५८ किलोमीटरच आहे. पण मध्ये हॉटेल मिळणं कठीण जाईल असं वाटतंय. परवा काज़ाला परत येईन, असं सांगून निघालो. परत काज़ाला आल्यावर रिकाँग पिओ/ शिमलाची बस मिळेल, असं वाटतंय. पण आपल्याला जे वाटतं, ते तसं होत नाही! सकाळी आलू पराठा खाऊन काज़ावरून निघालो. हे स्पीतिचं केंद्र असल्यामुळे मोठं गाव आहे. रस्त्यालगत अनेक दुकानं आहेत. आता रस्त्यावर मनालीचेही उल्लेख दिसत आहेत. काज़ाच्या पुढचा रस्ता चांगला आहे, थोडा उतारही आहे. पुढे एका जागी रस्ता डावीकडे वळाला आणि रस्त्याने स्पीति ओलांदली. इथून किंचित चढ सुरू झाला. नदीच्या दुस-या बाजूला किब्बर गांव आणि नंतर किब्बर गोंपाही खूप चांगली दिसली. अर्थात्, अंतर बरंच होतं. पण गोंपा आणि ते गांव खूप वेळ दिसत आहे. तिथूनही एक रस्ता चिचमवरून लोसरकडे जातो, असं कळालं होतं. पण त्या रस्त्यावर चढ जास्त असल्यामुळे मी तिकडून गेलो नाही.


स्पीतिच्या पलीकडे किब्बर गोंपा

काज़ाच्या वीस किलोमीटर पुढे कुठलं हॉटेल नाही आलं. तेव्हा भूक जाणवल्यामुळे रस्त्यावर उभं राहूनच बिस्कीट खाल्ले. कडक ऊन आहे आणि कुठेही सावली नाही आहे. इथे दृश्ये बदलत आहेत! आत्तपर्यंत डोंगरांची रांग दिसत होती, पण इथे आता पुढे मोकळं आकाश दिसत आहे. हवामान आत्ता छान आहे. बिस्कीटं खात असताना एक बुलेटवाला आला. तो थांबल्यामुळे थोडं बोलणं झालं. तेव्हा कळालं की, तो सोलो बाईकिंग करतोय आणि इस्राएलवरून आला आहे. तो मनालीला जातोय. आधी तर त्याने मला विचारलं तुला इस्राएल माहिती आहे? मग मी त्याला इस्राएलच्या शेतीबद्दल आणि इस्राएलची गुप्तहेर संस्था मोसादबद्दल बोललो. त्याला खूप आश्चर्य वाटलं! मी त्याला त्याचे फोटो घेऊन दिले. थोडा वेळ बोलणं झालं. त्याने सांगितलं की, त्याची गर्लफ्रेंड मनालीत आहे! त्याला मी लोसरपासून पुढच्या रस्त्याची माहिती दिली! तो निघाल्यावर मीसुद्धा निघालो. पुढे रस्ता तिरपा वळून खाली उतरताना आणि परत तिरपा वर चढताना दिसतोय. इथपासून अगदी उखडलेला कच्चा रस्ता सुरू झाला! इथे नक्कीच रस्ता एक धबधबा ओलांडत असणार! तो ओलांडण्यासाठी रस्ता बराच खाली जातोय आणि परत वर चढतोय. इंग्लिशमधल्या ‌C सारखं हे वळण आहे. पण त्यासाठी बरंच खाली उतरून वर चढावं लागलं. आधी हाच रस्ता कदाचित सरळ असावा, आत्ताही खाली मातीमध्ये ट्रकच्या चाकांच्या खुणा आहेत. स्थानिक लोक अजूनही खालच्या बाजूने झरना असाच ओलांडत जात असावेत.

जेव्हा C आकार पूर्ण झाला, तेव्हा एक मंत्र पताका असलेला मोठा खडक आला. इथे काही चिह्नही आहेत. नक्कीच हा पूर्वीच्या काळात कोणता तरी "ला" असला पाहिजे! इथून थोडं अंतर ठीक रस्ता मिळाला, पण नंतर रस्ता अगदी मातीचा कच्चा रस्ता म्हणून उरला. इथे एक गाव लागलं, काही घरंही आहेत. एक बौद्ध नन्सचं महाविद्यालयही आहे. पण हॉटेल नाही मिळालं. थोडं पुढे गेल्यावर एका घरामध्ये पाणी मागून घेतलं. आता फार ऊन लागतंय आणि सकाळचे ११ वाजले आहेत आणि फक्त २६ किलोमीटर झाले आहेत. एका मुलाने पाणी देताना सांगितलं की, पुढे हॉटेलही आहे. आणि एकदाचं हॉटेल मिळालं! अगदी हायसं वाटलं. कारण ऊर्जा अगदीच कमी झाली होती. पराठा खाण्याचा कंटाळा आल्यामुळे डबल आमलेट सांगितलं. तोपर्यंत चहाही आला. मी चहा पीत असतानाच माझी सायकल बघून तीन सायकलिस्ट आले! ते लोसरवरून काज़ाला जात आहेत! त्यातील दोन सायकलिस्ट न्युजीलंडचं सिनियर सिटीजन कपल होतं आणि एक मुंबईची मुलगी होती! मी त्यांना विचारलं की, तुम्ही मनालीवरून येताय का लेहवरून? त्यावर ते म्हणाले श्रीनगरवरून!! मी अवाक्! मग त्यांनी सांगितलं की, ते तिबेट, युरोप, नेपाळ अशा ठिकाणीही सायकलवर फिरले आहेत! त्या मुलीसोबत हिंदीत बोललो. ती म्हणाली की, ती कोणी सायकलिस्ट नाहीय, पण तिला स्पीति फार आवडतं, स्पीतिमध्ये फिरायला फार आवडतं. म्हणून ह्यावेळी सायकलवर स्पीति बघते आहे. तिने रोहतांगपासून सायकलिंग सुरू केलं होतं. ती म्हणाली मुंबईची आहे, तेव्हा वाटलं की, मराठीत बोलायला मिळेल! पण तिला मराठी येत नाही! त्यामुळे ते राहून गेली. पण ह्या तीन सायकलिस्टला भेटून मस्त वाटलं. न्युझीलंडच्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याची तर गोष्टच वेगळी!

डबल आमलेट खाऊन आणि थोडा आराम करून निघालो. पुढे तरी चांगला रस्ता मिळेल अशी आशा आहे. त्यांनी मला सांगितलं की, पुढेही असाच रस्ता आहे. दुपारचं कडक ऊन आणि उंची कमीत कमी ३८०० मीटर्स. फारच गरम होतंय. मध्ये मध्ये जेव्हा ढग येतात, तेव्हा थंडीही तितकीच वाजतेय. कारण मी आता जसा लोसर आणि कुंजुमलाच्या जवळ येतोय, तसे मोठे पर्वत कमी होत आहेत. त्यामुळे खूप दूरवरून तीव्र वारे येत आहेत. आणि आज हे सर्व वारे माझ्या विरुद्ध दिशेला आहेत- हेड विंड आहेत. म्हणजे ते माझ्या सायकलला मागे ढकलत आहेत. इथून सुरू झाला ह्या सायकल मोहीमेतला सर्वांत बिकट‌‌ टप्पा. रस्ता आता अगदी मातीची व दगडांची रेष इतकाच उरला. सगळीकडे अभूतपूर्व नजारे आहेत, पण आता मला ते बघणं कठीण होत आहे. मध्ये मध्ये रस्ता काहीसा सपाट भागातून जातो, परत थोडा वर चढतो व वळत जातो. इथे गाव तर नाहीच, पण रस्त्याला अनेक किलोमीटर वाहनही मिळत नाहीय. आणि एका जागी तर रस्ता म्हणजे फक्त दगडांना झाकणारी माती इतकाच उरला. रस्त्याच्या बांधकामामध्ये काही तरी गडबड झालेली दिसते आहे. बाहेरून बघताना वाटतंय की, मातीचा रस्ता आहे. पण त्याच्या खाली दगडच दगड आहेत. म्हणजेच दगडांना माती लावून लपवलंय फक्त. सायकलीची फारच काळजी वाटतेय आता. आज वाटतंय की, सगळीच परिस्थिती विपरित आहे. विपरित दिशेचा तीव्र वारा, मध्ये मध्ये गरम आणि थंड वातावरण आणि अशी खडकाळ वाट! त्यामुळे वेग अगदी कमी झाला. तितक्याच कसं कुठून माहिती नाही, पण माझ्या फोनला नेटवर्क आलं आणि माझ्या जवळच्या मित्रांचा मला फोन आला. त्यांनी मला इतकंच सांगितलं की, जम्मू- कश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं आहे!!

जम्मू- कश्मीरकडे लक्ष वळवून शरीराच्या थकव्यावरचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. सायकल चालवताना नेहमीच मनात येणारे काही विचार हे अडसर ठरू शकतात. त्यामुळे मनाला व्यस्त ठेवायचं असतं. अनेकदा मी त्यासाठी मनातल्या मनात गाणी ऐकत राहतो. आज जम्मू- कश्मीरबद्दल मनात विचार सुरू केला. जम्मू- कश्मीरमध्ये अगदी आतल्या गावांपर्यंत फिरलो आहे, तिथल्या स्थानिकांनाही भेटलो आहे. त्यामुळे तिथे कशी परिस्थिती असेल, ह्याची थोडी कल्पना आहे. तिथले काही जण भारताचा किती तिरस्कार करतात, हेही बघितलं आहे. त्यामुळे तिकडचं चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट आहे- नक्कीच पूर्ण राज्य जाम केलं जाईल. सगळी व्यवस्था ठप्प होईल. कारण तिथले लोक हे सहनच करू शकणार नाहीत. आता तर मला तिकडे अजिबातच जाता येणार नाही. पण आजची वाट अशी आहे की, काही केलं तरी रस्त्यावरचं ध्यान बाहेर काढता येत नाहीय. एका बाजूला स्पीति नदी थोडी दूर दरीतून वाहतेय, बाजूलाच बर्फ असलेले डोंगर आहेत. पण रस्ता म्हणजे एक असत्य आहे! रस्ता असा काहीही नाहीय. फक्त सायकल ओढत न्यायची! काही तास अगदीच निर्जन भागात गेले. इथे रस्ता तर लांबच, मैलाचा दगडही नाही मिळाला. फक्त मनातल्या मनात अंदाज करतोय की, त्या आमलेटच्या हॉटेलपासून दहा किलोमीटर पुढे आलो असेन, म्हणजे आजच्या ५६ पैकी २६ किलोमीटर झाले असतील. असं करत करत एक एक पेडल चालवत राहिलो. सायकलीची फार दया येते आहे. किती दगडांमधून, भितीदायक वाटांवरून तिला जावं लागतंय! जणू वाटतंय की, सायकल माझाच भाग बनली आहे आणि मी आणि सायकलीच्या मध्ये हे गाणं सुरू आहे-

समय का ये पल थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो

कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
तुमको पता है, मुझको पता है...

कितने गहरे हल्के, शाम के रंग हैं छलके
पर्वत से यूँ उतरे बादल जैसे आँचल ढलके

सुलगी सुलगी साँसें बहकी बहकी धड़कन
महके महके शाम के साये, पिघले पिघले तन मन...

कोई सब पहचाने खोए सारे अपने
समय की छलनी से गिर गिरके, खोए सारे सपने
हमने जब देखे थे, सुन्दर कोमल सपने
फूल सितारे पर्वत बादल सब लगते थे अपने

और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो

हे गाणं आठवल्यानंतर तेच मनातल्या मनात वाजायला लागलं. आणि तेच ऐकत पुढे जात राहिलो! परवा नाकोमध्ये जेव्हा मोबाईल पूर्ण बंद होता, तेव्हा काही फोटो बघितले होते. स्टेशनवर मला सोडायला आलेले कुटुंबीय आणि मित्र! त्यांची आता आठवण येते आहे. सगळं डोळ्यांपुढे येतंय. फक्त लोसर मात्र जवळ येत नाहीय! काही वेळेनंतर रस्ता परत एकदा खूप खाली उतरताना दिसला. आणि तिथे परत स्पीति ओलांडून तो उजवीकडे वर चढतोय. आणि वर तिथे आणखी एक रस्ता येऊन मिळताना दिसतोय. कदाचित तिथून चांगला रस्ता मिळेल! पण त्या वरच्या रस्त्यापर्यंत पोहचणंही कठीण आहे. अगदी उखडलेला रस्ता. एका बाजूला दरी आणि जवळूनच नदी! इथे रस्त्यांवर धबधबे/ ब्रिज हे सेक्शन्स सोडून रस्त्याचं नियंत्रण बीआरओकडे नसावं‌ असं वाटतंय. कदाचित सीमेपासून बराच आत हा भाग आहे, त्यामुळे बीआरओ आणि मिलिटरी दोघांनाही त्यामध्ये इतका इंटरेस्ट नसावा. शिवाय राज्य सरकारही दुर्लक्ष किंवा भ्रष्टाचारामुळे इकडे लक्ष देत नसावं. किंवा असंही असू शकेल की, ह्या पर्वतांचीच तशी इच्छा असावी! कारण हिमालयात हिमालयाच्या इच्छेविरुद्ध काहीही होऊ शकत नाही! असो! बरेच कष्ट केल्यानंतर त्या ब्रिजच्या पुढे असलेले चार लूप्स क्रॉस केले. तिथे योगायोगाने दोन ट्रायव्हर भेटले! जवळजवळ दोन तासांनंतर पहिलंच वाहन दिसलं! त्यांना रस्ता विचारला. डावीकडचा रस्ता लोसरला जातो, असं कळालं. इथे चिचमवरून येणारा रस्ता मिळाला. रस्त्यामध्ये अगदीच थोडा फरक पडला.


वर चढणारा रस्ता आणि आणखी वर मिळणारा दुसरा रस्ता!

इथे "लोसर ग्राम आपका स्वागत करता है," असा फलक दिसला! पण लोसर अजून दूर असणार. पुढे दिसलंही- लोसर १६ किलोमीटर! दुपारचे जवळपास साडेतीन वाजले आहेत. एक गाव आलं, पण हॉटेल नव्हतं. एका ताईंना हॉटेलबद्दल विचारलं, तर मागेच आहे म्हणाल्या. पण ते बंद होतं. सोबतचं पाणीही संपलं आहे. तेव्हा एका घरामध्ये काम करणा-या काही मजूरांनी मला हाक मारली आणि सांगितलं की, इकडे असा पाईप आहे, पाईपमधून पाणी घे! ते नक्कीच बाहेरून आलेले मजूर असावेत. पण त्यांचं देव भलं करो, त्यांनी मला कमीत कमी पाणी तरी दाखवलं! रस्त्याच्या थोडं बाजूला जाऊन पाईपमधून बाटली भरून घेतली. पाणी पिऊनही घेतलं. हा पाईप नक्कीच एखाद्या झ-याला जोडलेला असला पाहिजे. असो! इंधन न भरताच पुढे निघावं लागलं. आता सायकल चालवणं कठीण झालं आहे. दुपारची आता संध्याकाळ होते आहे. एक तर थंडीमुळे हुडहुडी भरते आहे. आणि इतका तीव्र वारा आहे की, तो सायकल हलवतोय, इकडे तिकडे नेतोय. हळु हळु जात राहिलो आणि पुढे चार किलोमीटरवर आणखी एक गांव लागलं. त्याची उंची ३९९३ मीटर्स आहे! अर्थात् आता लोसरपर्यंत फार मोठे चढ लागणार नाहीत. पण तसा मला चढाचा त्रासही नाहीय. मला त्रास होतोय तो थकव्याचा आणि हेडविंडचा आहे. एकदा तर रस्त्याची सगळी फिकीर सोडून सायकल जोरात चालवणं सुरू केलं. होऊन जाऊ दे पंक्चर, होणार असेल तर! पण काहीच फरक पडला नाही. सायकल वेग घेत नाहीय. इथे एक हॉटेल मिळालं आणि होम स्टेचा बोर्डही‌ दिसला व तो मला अगदी आकर्षित करतोय! पण इथे फक्त चहा- बिस्कीट घेऊन निघालो. लोसर १२ किलोमीटर. फक्त १२! पण मला ते फार कठीण जात आहेत. आता तर ताप आल्यासारखं वाटतंय. कारण सारखंच थंड- गरम वातावरण सुरू आहे. त्यातच सायकल चालवताना शरीर गरम होतं, मध्ये मध्ये ऊन असेल तर गरम होतं आणि ढग आले आणि वारा आला तर थंडीही वाजते. त्यामुळे अगदी तापासारखं वाटतंय. तसंच पेडल चालवत राहिलो. पण हळु हळु शरीराने साथ सोडली. आणि अचानक जाणवलं की, अरे! सकाळी साडेआठला निघालो होतो, आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत. मध्ये काही वेळ ब्रेक/ आरामात गेला. म्हणजे मी ८ तासांमध्ये फक्त ४८ किलोमीटर आलो आहे. म्हणजे पायी चालण्याचा वेग आहे, सायकलचा वेगच नाहीय हा. आणि ह्या वेगाने तर पुढच्या १० किलोमीटरसाठी २ तासही लागतील. आणि अजून जास्त वारा लागेल, थंडी वाजेल आणि तापही वाढेल! जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा हेड विंडसमोर हार पत्करली आणि सरळ लिफ्ट मागण्यासाठी उभा राहिलो...

नशीबाने दुसरा रस्ता मिळालानंतर वाहतुक थोडी जास्त आहे. आणि संध्याकाळ झाल्यामुळे मधून मधून कार व टेंपो जात आहेत. रस्त्यावर सायकल आडवी पाडली. जर स्टँडला लावली असती, तर हवेने फेकली जाण्याची भिती आहे! वाहनांना हात करायला सुरुवात केली. आज बहुतेक लग्न समारंभ आहे. त्यामुळे अनेक लोक त्यासाठी जाताना दिसत आहेत. नंतर एक कार थांबली. पण कारमध्ये सायकल कशी बसणार? वर बांधताही येणार नाही. पण त्या कारमधून एक ताई थांबल्या आणि त्यांनी आणखी एक टेंपो थांबवला! टेंपोच्या मागे जागा आहे! तिथे सामान लोड केलेली सायकल कशीबशी उचलली, चालकानेही मदत केली! तेव्हा सायकल टेंपोत मागे ठेवाता आली! आणि सायकलला आधार देण्यासाठी मीही तिथेच बसलो! लोसरपर्यंत असाच १० किलोमीटरचा प्रवास केला! पुढचाही‌ रस्ता असाच ओबड धोबड आणि खाली- वर असलेला! मध्ये मध्ये दगड! त्यामुळे टेंपोतही‌ सायकल उडते आहे! कसं तरी तिला धरून ठेवलं आणि मीही बसून राहिलो! पण इथे एक चूक झाली की मी‌ सायकलचा स्टँड काढला नाही. त्यामुळे एकदा टेंपोचा धक्का बसून सायकल वर उडाली आणि सायकलच्या वजनाने दाबला जाऊन बिचारा स्टँड तुटून गेला! पण सायकल म्हणतच राहिली- कुछ ना कहो, कुछ भी ना कहो! लोसरला पोहचायला जवळपास एक तास लागला. तिथे हॉटेल बघितले. लग्न समारंभांमुळे हॉटेलात बरीच गर्दी आहे. थोडा वेळ शोधल्यानंतर एक शेअरिंग बेडची खोली मिळाली! तेव्हा जरा बरं वाटलं! आज ५८ किलोमीटर सायकल चालवायची होती, फक्त ४८ चालवू शकलो आणि जवळजवळ आजारीच पडलो. शरीर आणि मनातही पुढे जाण्याची ऊर्जाच शिल्लक नाही आहे. इथून कुंजुमला टॉप फक्त २९ किलोमीटर दूर आहे, पण 'रस्ता' असाच असणार, तितकेच तीव्र वारे असणार! आणि परत काज़ाला जायचं तर हाच रस्ता परत करावा लागेल. आजचा अनुभव पुरे झाला! त्यामुळे फार विचार न करता ठरवलं की, आता इथून बसनेच जाईन! माझी क्षमता आणि तयारी बहुतेक इतकीच असावी! प्रत्येक सायकल प्रवासामध्ये हा टप्पा येतोच येतो जिथे थांबण्याची इच्छा तर नसते, पण पुढे जाण्याची शक्तीही उरलेली नसते. टायटॅनिकमध्ये एक गाणं आहे- Unable to stay, unwilling to leave! माझी तशीच स्थिती झाली आहे! आणि अशा वेळेस हे सायकलिंग थांबवावं लागेल! निराशा तर आहेच, पण त्याबरोबर ह्या ८ दिवसांमध्ये सुमारे ४७५ किलोमीटर सायकल अशा भागात चालवू शकलो, नाकोचा दुर्गम चढ चढू शकलो, हेही दिलासादायक आहे! आणि ४००० मीटर उंचीवर सायकल चालवता आली आणि पहिल्यांदाच सुमारे ४०८० मीटरवर मुक्काम करतोय, हेही काही कमी नाही!


आजचा रूट (शेवटचे १० किलोमीटर टेंपोने)


आजचे चढ

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १०: एक भयाण बस प्रवास

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानप्रवासआरोग्य

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Oct 2019 - 6:48 pm | यशोधरा

हिमालयात हिमालयाच्या इच्छेविरुद्ध काहीही होऊ शकत नाही!

अगदी, अगदी.
सुरेख चालला आहे तुमचा प्रवास.

मार्गी's picture

5 Oct 2019 - 5:13 pm | मार्गी

धन्यवाद ताई! पण सायकल प्रवास तर संपला ह्या लेखात.

यशोधरा's picture

5 Oct 2019 - 5:19 pm | यशोधरा

आत्तापर्यँतचा प्रवास.

प्रभू-प्रसाद's picture

5 Oct 2019 - 10:08 pm | प्रभू-प्रसाद
जॉनविक्क's picture

5 Oct 2019 - 11:45 pm | जॉनविक्क

Making us proud. Keep it up.

फारच मस्त सुरू आहे लेखमाला.
फोटो, वर्णन सगळं जबरा.
इथे Terrain मधील फरक दिसून येत आहे.

तुम्ही गेलात त्याच दरम्यान काही दोस्त बुलेट वर गेलेले. त्यांचे अनुभव ऐकल्यावर सायकलने हे कव्हर करायचं म्हणजे ग्रेटच.

पुभाप्र

मार्गी's picture

7 Oct 2019 - 12:38 pm | मार्गी

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!

सुधीर कांदळकर's picture

10 Oct 2019 - 6:54 am | सुधीर कांदळकर

तसाच रौद्रसुंदर अनुभव वचतांना येतोय.


आता तर ताप आल्यासारखं वाटतंय. कारण सारखंच थंड- गरम वातावरण सुरू आहे. त्यातच सायकल चालवताना शरीर गरम होतं, मध्ये मध्ये ऊन असेल तर गरम होतं आणि ढग आले आणि वारा आला तर थंडीही वाजते. त्यामुळे अगदी तापासारखं वाटतंय. तसंच पेडल चालवत राहिलो. पण हळु हळु शरीराने साथ सोडली.

प्रत्ययकारी वर्णन. वाचकाला घरबसल्या सारे अनुभव देताय. रोहित शर्मा, विराट वगैरे फटकेबाजी करतांना चित्रवाणीवर पाहतांना आपणच गोलंदाजांना ठोकतोय असे वाटते. तसाच अनुभव दिलात. ते आठवून आता कठीण प्रसंगही नेटाने अनुभवतोय.

अनेक अनेक धन्यवाद.