युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३२

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
16 Aug 2019 - 2:06 pm

भाग ३२

"काय झाले गुरु द्रोण?"
"कृपाचार्य, तुम्ही?"
"इतक्या रात्री तुम्ही जागे का ?"
काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने द्रोणाचार्यांनीच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही या प्रहराला इथे?"
"एक निर्णय घेतला गेलाय आज राज्यसभेत.... त्यामुळे जरा अस्वस्थ आहे."
"कसला निर्णय?"
"होणारे महाराज ठरवणार आहेत येत्या सप्ताहामध्ये."
"त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे, कृपाचार्य? ही तर आनंदाची बाब आहे."
"ते सर्वांचे युद्धकौशल्यावर मापन करणार आहेत गुरुवर!"
"ह्मम. मग कोण निवडला जाण्याची भिती वाटते आपणास?"
"आपल्या पासून काहीच लपून नाही. नव्याने नाव घेणार नाही मी आचार्य, पण मनात द्वेष आणि राग असलेला राजकुमार राजा बनायला नको असे वाटते मला."
द्रोणाचार्य हसले.
"दुर्योधन योग्य आहे पण. त्याच्यात भरपूर ताकद आहे."
"आणि मित्र जमवण्याची कला पण!" नजर रोखत कृपाचार्य म्हणाले.
"काय म्हणायचे आहे तुम्हाला कृपाचार्य?"
"अश्वत्थामा आणि अर्जुन जरी एकत्र धनुर्विद्या शिकत असले, तरी अश्वत्थामा मित्र मात्र दुर्योधनचा आहे, हे माहित आहे सर्वांना."
"स्पष्ट बोला, कृपाचार्य."
"द्रोणाचार्य, आम्ही तुमचा तुमच्या पुत्राबद्दलचा स्नेह जाणतो. पण गुरु पुत्राचा घनिष्ट मित्र आहे, म्हणून दुर्योधन योग्य बनत नाही राज्य चालवायला."
द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले.
"चिंता नसावी, कृपाचार्य. दुर्योधन योग्य आहे असे जरी मला वाटत असले तरी बाकीचे नाहीत, असे म्हणालो नाही मी. दुर्योधना पुढे असलेले प्रतिस्पर्धी अलौकिक आहेत. जर सामर्थ्यबलाची परीक्षा असेल तर भीमच्या गदेपुढे दुर्योधनाचा निभाव लागू शकेल असे मला वाटत नाही. आणि संपूर्ण जगात अर्जुनास हरवेल असा योद्धाही आता नाही."
"आता नाही? म्हणजे आधी होता?"
द्रोणाचार्य चमकले. नंतर मुद्रा शांत करत म्हणाले,
"कृपाचार्य, मी एक श्वान पाहिला. कैक वर्षांपूर्वी. पण आठवण अजूनही आहे. मुखात बाण होते त्याच्या. पण रक्ताचा एक थेंबही बाहेर आलेला नव्हता."
"बाण मुखात? असेही कोणी करू शकतो?"
"हो कृपाचार्य.....एका धनुर्धाऱ्याने केले असे."
"पण का?"
"साधनेत व्यत्यय आला श्वानाच्या आवाजाने म्हणून!"
"काय ही क्रूरता, गुरुवर!"
'क्रूरता....' त्यांच्या मनात तो शब्द घोळला. धनुर्विद्येच कौशल्य बघताना त्यांनी श्वानाच्या वेदनांकडे नकळत दुर्लक्ष केल्याच त्यांच्या आत्ताच ध्यानी आलं होतं.
"कोण होता तो धनुर्धारी, गुरुवर?"
"तोच.....उत्तम धनुर्धारी! जो कदाचित अर्जुनाहूनही...."
"द्रोणाचार्य, अर्जुनापेक्षा उत्तम?? तुमच्या शिष्यापेक्षा उत्तम? कोण?"
"एकलव्य माझाच शिष्य आहे कृपाचार्य!"
"काय? ते कसे शक्य आहे?"
"कारण तो गुरु मानतो मला."
"तुमची अनुमती नसताना?" द्रोणाचार्य शांत राहिले. "द्रोणाचार्य, तुम्ही त्याला दंड द्यायला हवा होता."
"दिला असचं समजा कृपाचार्य.... "
"काय दिलात?"
"त्याला धनुर्विद्या वापरता येऊ नये असा दंड..... त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागून घेतला मी कृपाचार्य! " अपराधी असल्या सारखे द्रोणाचार्य म्हणाले.
"योग्यच केलंत."
"कृपाचार्य?" द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छटा पसरली. "तो स्वअध्यापनावर सर्वोत्तम बनला होता. त्याला धनुष्य उचलायला मी शिकवले नाही. बाण निवडायला आणि प्रत्यंचा ताणायलाही नाही. तरीही गुरुदक्षिणा मागणे योग्य? कसे, कृपाचार्य? कसे?"
"जर साधनेत व्यत्यय आला म्हणून त्या श्वानाला घायाळ केले तर मोठेपणी तो कोणाचीच तमा बाळगणार नाही, गुरुवर. तुम्ही आत्मक्लेषात का आहात, मी समजू शकतो. पण तुमच्या त्या सर्वोत्कृष्ट धनुर्धाऱ्याने श्वानाला दिलेल्या वेदनांपुढे तुम्ही दिलेला दंड काहीच नाही. द्रोणाचार्य, त्या श्वानाला मुखात लागलेल्या बाणांमुळे वेदना होत राहतीलच, परंतु तो ना काही खाऊ शकेल, ना पाणी पिण्या योग्य त्याला धनुर्धाऱ्याने सोडले. बाणांचा आघात होऊनही रक्तस्त्राव बाहेर झाला नाही पण आत झाला नसेल? वेदना झाल्या नसतील? होणाऱ्या यातना सहन करायला जिवंत ठेवलेल्या त्या श्वानाच्या मुकपणाची ही चेष्टा आहे. ही क्रूरता नाही तर दुसरे काय आहे द्रोणाचार्य? तो अर्जुनाहून अधिक उत्तम धनुर्धारी असेलही..... एक सर्वोत्कृष्ट शिष्यही असेल.... पण योद्धा? नाही गुरुवर! ज्याला भूतदया नाही, ज्याच्या शस्त्रावर दयेचे, करुणेचे बंधन नाही, तो सर्वोत्कृष्ट योद्धा असूच शकत नाही."
कृपाचार्यांचा शब्द न शब्द खरा होता. विनय, विवेक, उदात्त हेतू आणि भूतदया नसेल तर मिळालेले ज्ञान सर्वनाश करते. द्रोणाचार्यांना मोकळे झाल्यासारखे वाटले. मनावरचा भार हलका झाला होता. त्यांना जाणवत होते..... त्यांनी जे केले ते केवळ हस्तिनापुर, त्यांचा शब्द राखण्यासाठी नव्हते... तर ते आवश्यक होते....भविष्यातल्या विनाशाला टाळण्याकरता!
"द्रोणाचार्य, मी निघतो. आज्ञा असावी."
------------
ऱाजपटांगण सजले होते. शस्त्रांचे सर्वोत्तम नमुने ठेवलेले होते. नगरवासीयांनी तुंबळ गर्दी केली होती. हस्तिनापुरचे भविष्य ठरणार होते. राजपरिवार आसनस्थ झाला होता.
"महाराज, भीष्माचार्य, कृपाचार्य, महामंत्री विदूर आणि द्रोणाचार्य यांच्या उपस्थितीत आज कौशल्यदर्शन सुरु करण्यात येत आहे."
"यात सर्वोत्तम योद्धा निवडला जाणार आहे. प्रत्येकाने आवडते शस्त्र निवडून हातात घ्या."
सगळ्यांनी आपापल्या वेधवून घेणाऱ्या शस्त्रांची निवड केली. अर्जुनाने दूरवरचे लक्षही भेदू शकेल अश्या धनुष्यबाणाची निवड केली. युधिष्ठिराने त्याच्याच सारख्या सरळ एकरेषीय भाला घेतला. दुर्योधन आणि भीमने स्वतःसारखी भक्कम गदा निवडली.
द्वंद्वयुद्धासाठी नावे पुकारली जाऊ लागली. प्रत्येक वीर साऱ्या शक्तीनिशी जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला. जमलेली मंडळी आवडत्या वीराचे नाव घेत विजय घोषणा देत होते.
जिंकलेल्या योद्ध्यांचे एकमेकांशी द्वंद्व सुरु झाले.
भीम आणि दुर्योधन एकमेकांपुढे उभे ठाकले. दुर्योधन अगदी आरामात आपण भीमाला हरवू अश्या विश्वासाने समोर आला. कक्षातल्या एका पुतळ्याला भीम समजून त्यावर नियमित गदेचा सराव करणारा दुर्योधन ! त्या पुतळ्यावर गदा प्रहार करून त्याने पुतळ्याचा चेंदामेंदा करून टाकला होता.
भीमाने गदा उचलली आणि थेट दुर्योधनावर फेकली. त्या अनपेक्षित वाराने तो पडता पडता वाचला. बुचकळ्यात पडून त्याने भीम कडे पाहिले. पुतळा निर्जीव होता... प्रतिकार करत नव्हता. पण भीम सचेतन होता आणि ताकदवर पण. जमेल तसा वार करत आणि हरू नये याची काळजी घेत दुर्योधन भीमाचे प्रहार चुकवत होता. ऱागारागाने तो भीमला गदेने मारण्याचा प्रयत्न करत होता. भीम सहजपणे त्याचे प्रत्युत्तर देत होता.
"हे कौशल्य दर्शन नाही. काही वेगळेच सुरु आहे.....महाराज, थांबवा हे!" शकुनीने धृतराष्ट्राच्या कानात कुजबुज केली.
"गुरु द्रोणाचार्य, थांबवा हे द्वंद्व."
द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाला सांगून दोघांना बाजूला केले.
आणि अर्जुननाने धनुष्य उचलले. युधिष्ठिराच्या हातातला भाला त्याने पहिल्याच बाणाने पाडून त्याला पराजित केले. एकामागून एक बाण सोडत त्याने कधी दुर्योधनाभोवती बाणांची भिंत बांधली, कधी भीमाचा मार्ग बाणांनी व्यापून टाकला. सगळ्यांनी हार मान्य केली. अर्जुनही नम्रपणे सर्वांना नमन करत होता.
"पहा गुरुद्रोण! समोरच्या व्यक्तीला किंचितही जखम न करता पराजित करण्याची कला!" कृपाचार्य आनंदाने म्हणाले.
"पण युद्धात ही कला काय कामाची? तिथे नरसंहार करावा लागतो." शकुनी चिडून म्हणाला.
"गांधार नरेश शकुनी, युद्धात शत्रू समाप्त करावे लागतात, पण योद्ध्याचा हेतू विजय मिळवणे असावा. कोणाला हानी व्हावी हा नाही. जर एखादा शत्रू शरणागती पत्करत असेल तर त्याचा वध करणे धर्मसंगत नाही."
पुढच्या हरेक द्वंद्वातही अर्जुनाने बाणांचे पथ बांधत विजयश्री चे स्वागत केले.
द्रोणाचार्य, कृपाचार्य, कुंती आणि भीष्माचार्य अर्जुनाकडे अभिमानाने, कौतुकाने पाहत होते.
"हे योग्य नाही महाराज. ज्याच्या हातात गदा आहे, त्याला धनुर्धारीशी द्वंद्व करायला लावून पराजित मानणे कोणत्या नियमाला अनुसरून आहे?"
धृतराष्ट्र निकाल ऐकून अस्वस्थ झाला होता. पण काही पर्याय नव्हता. "शकुनी, पण अर्जुनासमोर कोण धनुर्धारी टिकेल? आणि भीम सोबतच्या युद्धात काय झाले हे पाहिले आपण."
द्रोणाचार्यांनी आनंदाने घोषणा केली, "अर्जुन हा सर्वोत्कृष्ट धनुर्धर आहे."
"नाही द्रोणाचार्य. अजून एक द्वंद्व बाकी आहे....." एक कणखर आवाज गर्दीतून ऐकू आला आणि सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने गेले.

©मधुरा

इतिहासलेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

16 Aug 2019 - 7:47 pm | ज्योति अळवणी

छान लिहिता आहात. थोड्या लेखन चुका टाळता आल्या तर बघा. वाचताना अजून मजा येईल.

महाभारत तसं म्हंटल तर ढोबळ मानाने सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र काही लहान सहान कथानकं त्यात आहेत जी सर्वांनाच माहीत असतात असं नाही. तुम्ही फार लांबड न लावता घटनाक्रम छान मांडता आहात

मृणालिनी's picture

16 Aug 2019 - 10:57 pm | मृणालिनी

धन्यवाद! लेखनचूका टाळण्याचा प्रयत्न करेन :)

ज्योति अळवणी's picture

16 Aug 2019 - 7:47 pm | ज्योति अळवणी

छान लिहिता आहात. थोड्या लेखन चुका टाळता आल्या तर बघा. वाचताना अजून मजा येईल.

महाभारत तसं म्हंटल तर ढोबळ मानाने सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र काही लहान सहान कथानकं त्यात आहेत जी सर्वांनाच माहीत असतात असं नाही. तुम्ही फार लांबड न लावता घटनाक्रम छान मांडता आहात

जॉनविक्क's picture

16 Aug 2019 - 8:31 pm | जॉनविक्क

घटनांचे विविध पदर उघडत घटनाक्रम व्यवस्थित पुढे सरकत आहे. आणि विशेषतः लहान मुले अतिशय आवडीने ही गोष्ट पसंत करत आहेत. व पुढील भाग केंव्हा याची आवर्जून चौकशीही करत आहेत.

अर्थात वाचून दाखवताना थोडी लिबर्टी नाट्यमयतेसाठी मी घेतो पण एकूणच मुलांना या कथेची आता गोडी लागली आहे.

धन्यवाद.

मृणालिनी's picture

18 Aug 2019 - 12:07 pm | मृणालिनी

धन्यवाद! :)