त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव

हर्मायनी's picture
हर्मायनी in जनातलं, मनातलं
15 Aug 2019 - 5:01 pm

मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या. हाय अल्टीट्युड मुळे तेथील वातावरणाशी जुळवून घेता यावे यादृष्टीने पहिले दोन दिवस लेह व आसपासचा प्रदेश फिरून तिसऱ्या दिवशी तुर्तुकला पोचलो. तुर्तुक हा बाल्टीस्थानचा भाग असल्याने तेथील निसर्ग आणि संस्कृती लडाखपेक्षा फार भिन्न आहे. तेथे एक दिवस राहून आम्ही नुब्रा - पॅंगॉन्ग करून आमच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो.

प्रवासाचा शेवटचा टप्पा होता ते म्हणजे समुद्रसपाटीपासून साडेचौदा हजार फूट उंचीवर वसलेलं त्सो मोरिरी लेक.. पँगॉग ते त्सो मोरिरी हा सर्वात मोठा टप्पा पार करून आम्ही सायंकाळी चारच्या सुमारास तेथे पोचलो. बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेलं निळशार मोरिरी डोळ्यांचं पारणं फिटवणारं होतं. तळ्याच्या जवळच एक सैन्याची छावणी होती. आणि त्याच्या पलीकडच्याच बर्फाच्छादित टेकडीवर आमचे तंबू. थंडी अंगाला झोंबत होती आणि वाराही तितकाच. ऑगस्ट महिना असल्यामुळे लडाख मध्ये अशी थंडी अनुभवायला मिळाली नव्हती. थोडं फ्रेश होऊन तळ्याकडे चक्कर टाकून कुडकुडत आणि धापा टाकतच तंबूत परतलो. दिवसभराच्या प्रवासाचा शीण आणि थंडी यामुळे लवकरच जेवण करून झोपी जाण्याचे ठरवले. पण झोप कसली लागायला. वाऱ्यामुळे तंबू हलत होते. उडून जातात की काय अशी भीती वाटत होती. यात भर म्हणून अचानक गाढवं आणि कुत्र्यांचं ओरडणं सुरू झालं. नाना शंका-कुशंकांनी सारखं या कुशीवरून त्या कुशीवर चालू होतं. जवळच सैन्याची छावणी होती हाच काय तो आधार! शेवटी झोप कधी लागली ते कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत निघायचं होतं. कनक (माझा नवरा) आणि त्याचा मित्र पुष्कर हे दोघं सर्वांच्या आधी सकाळी लवकर उठून तयार होऊन बसले होते. तेव्हा त्यांना छावणीतल्या सैनिकांच्या एका तुकडीचा सराव चालू असलेला दिसला. २६ ऑगस्टला रक्षाबंधन होते म्हणून आम्ही (आम्ही दोघे सहा मित्र-मैत्रिणी) सीमेवरील सैनिक बंधूंना बांधण्यासाठी राख्या आणि सुका खाऊ न्यायचे ठरवले होते. त्यानुसार पन्नासेक राख्या आणि आईनी बनवलेले लाडू, गुडदाणी आणि पुण्याचे असल्यामुळे अर्थातच बाकरवडी इत्यादी खाऊ बरोबर घेतला होता. कनकच्या अचानक डोक्यात आलं कि आपल्याकडच्या राख्या आणि खाऊ आपण या सैनिकांना देऊ शकतो. सराव संपण्याच्या आधी तेथे जाणे महत्त्वाचे असल्यामुळे आणि आमची तयारी अजून व्हायचे असल्यामुळे तुम्ही दोघ हे घेऊन जा असे म्हणून राख्या आणि खाऊ त्यांच्याकडे दिला. हे घेऊन पळत तिकडे जातात तोच तिथला सराव संपून ती तुकडी परत जात असल्याचे दिसले. त्यांच्यातील एका जवानाला या दोघांनीगाठून या राख्या आणि खाऊ आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत असे सांगितले. योगायोगाने ते मराठी होते. जुजबी चौकशी केल्यावर त्यांनी या दोघांना त्यांच्यासोबत छावणीत चलण्याची विनंती केली आणि तेथे त्यांच्या वरिष्ठांची गाठ घालून दिली. त्यांचे वरिष्ठ आभार मानून म्हणाले "इस साल जवानोंके घरसे भेजी हुई राखिया अभीतक पहुँची नहीं हैं. अगर आपके साथ कोई लेडीज लोग हैं और वे यहा आ सकती हैं, तो हम रक्षाबंधन का कार्यक्रम कर सकते हैं. आप लोग नाश्तेके लिये हि आ जाओ.. " कनक-पुष्कर एका पायावर तयार झाले आणि आम्हाला सांगताच आम्हीही लगेच तयार झालो.

नऊ वाजता टेकडी उतरून छावणीत पोहोचलो. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनापासून स्वागत केलं. काय करता इत्यादी चौकशी अगदी अगत्याने केली. त्यांच्या पुण्यातील वास्तव्याबद्दल ही आवर्जून सांगितले. इतक्यात प्लेट्स भरून सुकामेवा आणि चॉकलेट घेऊन एक जण आला. नाश्ता होईपर्यंत हे घ्या असा आग्रह सरांनी केला. आम्हाला थोडं ऑकवर्ड झालं आणि मनात आलं की अरे आपण असं काय केलंय की आपल्याला यांचंएवढं आदरातिथ्य लाभतंय.. हे जे देशासाठी करत आहेत त्या पुढे आपण काहीच नाही. आणि सैन्याच्या रसदीतल्या कोणत्याही गोष्टीला हात लावणं आमच्यासाठी अशक्यच होतं. कोणीच काहीच घेत नाही म्हटल्यावर " पर आपको गुलाब जामुन तो लेनाही पडेगा.. ये हमारी ऑर्डर समझो" अशी प्रेमळ दटावणी करत आम्हाला गुलाबजाम घेण्यास भाग पाडले. त्यांनाही आमच्या मनातील चलबिचल कळली असावी.

हे सर्व होताच तयारी झाली असल्याची खबर प्रमुखांना दिली आणि आम्ही प्रमुखांच्या मागे तळावरच्या मंदिरापाशी पोचलो. रक्षाबंधनासाठी १५-२० जवान रांगेत उभे होते आणि ओवाळणीचं तबक देखील तयार केलं होतं. आमच्या तर डोळ्यात पाणी यायचेच शिल्लक राहिले होते. सर्वप्रथम प्रमुखांना राखी बांधून ओवाळले तेव्हा त्यांनी आम्हा प्रत्येकीचं नाव असलेलं आणि "कारगिल विजय दिवस" असा छापलेलं पाकीट ओवाळणी म्हणून दिलं. यावेळी आम्हा सर्वांचेच डोळे पाणावले. यानंतर एकेक करून सर्वांना राख्या बांधल्या. तेव्हा त्यातील एका डेहराडूनच्या जवानाने ओवाळल्यावर ओवाळणी दिली तेव्हा मी ती नम्रपणे नाकारली असता म्हणाला, "इस साल अभी तक राखी नही आयी है।मेरे बहन होती तो मैने उसे दी होती ना.. ". रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांच्या चेहऱयावर काही क्षण तरी आपण आनंद पाहू शकलो याचे समाधान वाटले. यानंतर त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या आणि ग्रुप फोटोही घेतले. फोटो झाल्यावर सर्वांनी आम्हाला जेवणाचं आमंत्रण दिलं आणि आग्रहही केला. पण आता वेळ आली होती निरोप घेण्याची. हा वेळ कधी संपूच नये असा वाटत होतं पण पुढच्या मुक्कामी पोहोचायचं असल्याने निघणे भाग होते.

त्सो मोरिरी आमच्या मनात जेवढं त्याच्या सौन्दर्यासाठी घर करून राहिलं आहे, त्यापेक्षाही जास्त ते रक्षाबंधनाच्या हृद्य आणि कधीही ना विसरता येणाऱ्या भावुक मनात कोरलं गेलं आहे. हा अनुभव केवळ शब्दात मांडणं अशक्यच.. तो प्रत्येकानी प्रत्यक्षच घ्यावा, जगावा आणि मनात साठवून पुन्हा पुन्हा आठवावा..

इथे थांबते.. वर्णन कितीही केलं तरी अपूर्णच..

समाजजीवनमानप्रवासप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

किती हृद्य! पीर पांजाल रांगात सैनिकांबरोबरच्या घालवलेल्या क्षणांची आठवण जागी झाली. धन्यवाद!

उपेक्षित's picture

15 Aug 2019 - 5:34 pm | उपेक्षित

साधे सरळ पण काळजाला भिडणारे वर्णन, नशीबवान आहात ताई इतकेच बोलतो.

पद्मावति's picture

15 Aug 2019 - 6:22 pm | पद्मावति

काय बोलु? केवळ सुरेख लिखाण आणि अनुभव __/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2019 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहलीचा आनंद अनेक पटींनी वाढवणारी अत्यंत हृद्य आठवण ! ही आयुष्यभर आठवणीत राहील अशी कमाई झाली.

ती आमच्याबरोबर वाटून घेतल्याबद्दल, धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

15 Aug 2019 - 6:32 pm | सुधीर कांदळकर

भिडणारे लेखन आवडले

हा अनुभव केवळ शब्दात मांडणं अशक्यच.. तो प्रत्येकानी प्रत्यक्षच घ्यावा, जगावा आणि मनात साठवून पुन्हा पुन्हा आठवावा..

अगदी समर्पक. आवडले, धन्यवाद, पुलेशु

कुमार१'s picture

15 Aug 2019 - 6:35 pm | कुमार१

सुरेख अनुभव !

जॉनविक्क's picture

15 Aug 2019 - 9:52 pm | जॉनविक्क

तुमच्या भाग्यचा थोड़ा हेवाही वाटला. शेअर केल्याबद्दल अत्यंत धन्यवाद.

शेखरमोघे's picture

15 Aug 2019 - 10:46 pm | शेखरमोघे

छान अनुभव! मान्डलायही सुन्दर!!

जालिम लोशन's picture

15 Aug 2019 - 11:22 pm | जालिम लोशन

अतिशय छान लिहले आहे.

राघव's picture

16 Aug 2019 - 10:34 am | राघव

मुक्त भटकंती आणि आनंद लुटण्याला, एक वेगळंच भावनिक परिमाण लाभल्यासारखं वाटलं!
थोडं अलंकारीक बोलायचं झालं तर, हे म्हणजे पाचूला सोन्याचं कोंदण घातल्यासारखं झालं! :-)

सुंदर अनुभव! _/\_

अवांतरः कुणीच विचारलं नाहीये अजून हा अनुभव वाचून.. आणि ते साहजिकही आहे.. पण काहीही असो, फोटू पाहिजेतच!

संजय पाटिल's picture

16 Aug 2019 - 11:39 am | संजय पाटिल

फोटू पाहिजेतच!

+१ सहमत..

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Aug 2019 - 11:48 am | ज्ञानोबाचे पैजार

कोणताही आव न आणता लिहिलेलं साध्या सरळ भाषेतले अनुभव कथन आवडले
फोटो हवे होते याला +१
पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

16 Aug 2019 - 1:20 pm | जेम्स वांड

ट्रिप उत्तम झाली तुमची त्यात लष्करी पाहुणचार म्हणजे काय बोलणेच नको. फौजी लोकांबद्दल असलेला आदर शब्दांत मांडणे अशक्य, ती माणसेच अलग असतात. एकदम हटके.

हर्मायनी's picture

19 Aug 2019 - 9:53 am | हर्मायनी

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद..! फोटो टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन..

सुबोध खरे's picture

19 Aug 2019 - 10:04 am | सुबोध खरे

सुंदर वर्णन
अशा सुदूर आडवळणी गावात आपल्या गावचा किंवा आपली भाषा बोलणारा माणूस पाहून किती आनंद होतो हे अशा ठिकाणी प्रत्यक्ष राहिल्याशिवाय समजून येणार नाही. या सैनिकांची मन:स्थिती काय असते त्याचा पुनः प्रत्यय आला.
एक निवृत्त सैनिक.
सुबोध

तमराज किल्विष's picture

19 Aug 2019 - 11:43 am | तमराज किल्विष

डोळे पाणावले.

लेमनानंद's picture

19 Aug 2019 - 11:53 am | लेमनानंद

अविस्मरणीय अनुभव

सस्नेह's picture

19 Aug 2019 - 4:17 pm | सस्नेह

छान लिहिलंय.
फोटो टाकू शकता का ?