गावची हवा...

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Aug 2019 - 3:43 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

अहिराणी पट्ट्यात (आणि इतरत्रही) पूर्वी खूप झाडं होती. जंगलं होती. नद्यांच्या थड्यांवर आमराया होत्या. भरपूर पाण्यामुळे शेती बागायती होत्या. म्हणून गावातल्या हवेत कायम थंडावा असायचा. हवा शुध्द असायची. वाहनांची आताच्या इतकी प्रचंड संख्या नव्हती. प्रदुषण नव्हतं. घरं सिंमेटची नव्हती. मातीची होती. गावातल्या गल्ल्या मातीच्या. गावाच्या आजूबाजूच्या पांद्या मातीच्या.
घराघरात रेडीओ, टीव्ही, फॅन नव्हते. कुठं कुठं रेडिओ येऊ लागले होते. गावात खूप झाडं नसली तरी गावाच्या आजूबाजूला आमराया असत. इतर झाडी असत. गावाला लागून असलेल्या पाट थळाच्या पिकांना कायम पाणी सुरू असायचं. गावाजवळची शेती हिरवीगार बहरलेली असायची. गावाजवळील नदीतून पाणी वहायचं. गावातल्या आडांना पाणी असायचं. म्हणून भर उन्हाळ्यातही गावातल्या हवेत थंडावा असायचा.
गावातल्या घरात वा घराबाहेर झाडाखाली बसलेल्या माणसाला कधी घाम आलेला दिसला नाही. उन्हातून चालत येणार्याा वा काम करत असलेल्या माणसाला घाम यायचा. घरभर हवेच्या थंडगार झुळका सुरू असायच्या. म्हणून त्याकाळी कोणाच्या घराच्या छताला गार हवेसाठी टांगलेला पंखा दिसला, असं आठवत नाही. (तेव्हा गावात वीजही नव्हती, हा मुद्दा अजून वेगळाच.)
आमच्या गावात आमच्या लहानपणी एकुलतं एक हॉटेल दिसायचं. त्याच्या फळकुटावर ‘चहा पंधरा पैसे’, ‘भजी पंचवीस पैसे’ असं खडूने लिहिलेलं आठवतं. चहा, भजी शिवाय नंतर नंतर त्या हॉटेलीत भेळ, भत्ता, पापडी, शेव, पेढे, बुंदीचे लाडू सुध्दा मिळू लागले होते. दुरून हॉटेलीत बसलेल्या माणसांकडे पाहून आम्हा मराठी शाळेतल्या (प्राथमिक शाळा) लहान मुलांना त्यांचा हेवा वाटायचा.
हॉटेलच्या मालकाने एकदा अचानक नवा कोरा पंखा आणला. आमच्या गावातला हा पहिला पंखा. तो पंखा टेबलावर ठेवण्याचा पंखा होता. हॉटेल मालकाच्या टेबलावर तो पंखा दिमाखाने विराजमान झाला. पंखा टेबलावरून इकडे तिकडे माणसासारखी मान फिरवून कसा हवा सोडतो, म्हणून तो पहायला आम्ही मुलं हॉटेलबाहेर गर्दी करायचो. त्या हॉटेलीत आलेला फॅन हे गावाच्या दृष्टीने एक नवल होतं. तशी गरज नसून सुध्दा फॅनची हवा शरीरावर खेळवण्यासाठी गावातले काही लोक मुद्दाम त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊन बसत. आणि चहा पिऊन झाल्यावरही फॅनसमोर घटकाभर बसून रहात.
अलीकडे गावातही भयान उकडू लागलं. आज गावात इतकी उष्णता आली कुठून? गावातली सगळी घरं आता काँक्रीटची होऊ लागली. गल्ल्या काँक्रीटच्या झाल्या. रस्ते काँक्रीटचे झाले. घराजवळ, गावात आणि शिवारातही झाडं‍ दिसत नाहीत. आमच्या पिढीने दिसेल ती झाडं तोडली. डोंगरं उघडी बोडकी केली. शेताच्या मेरेवर, बांधावर, बंधणींवर असणारी झाडं पिकांना वझाडा होतात म्हणून तोडली. नद्यांच्या काठावरील झाडं तोडली. पांदीतली झाडं तोडली. डोंगरांवरील झाडं तोडली.
गावात नको इतकी वाहनं झाली. घरोघरी चारचाक्या नसल्या तरी दोन चाकी मोटरसायकली आल्या. आजूबाजूला कारखाने वाढले. दुषित वायु, सिमेंट, ध्वनी, प्लॅष्टीक आदी प्रदुषणाने गावातली हवाही तापली. म्हणून आम्हाला आता पंख्यांची हवाही अपुरी पडू लागली. शहरांचंच नाही तर गावांचंही तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढलं. सर्वत्र प्रदुषण झालं.
गावात वीज आली. म्हणून घरोघरी पंखे सुरू झाले. फॅन शिवाय घरात आज थांबवत नाही. पंख्यांनी गार वाटत नाही. पंखे गरम हवा सोडतात म्हणे. म्हणून आता ऑफिसात आणि घरातही एसी बसवल्या जाऊ लागल्या. गावातल्या घरातला सकाळी शिजवलेला सैंपाक संध्याकाळी बाशी होत नव्हता. तेव्हा घरोघरी फ्रिज नव्हते. तशी गरजही नव्हती. आता अतिरिक्ते उष्णतेमुळे सैंपाक नासतो. म्हणून फ्रिज घरोघरी आले. एसी- फ्रिज मधून क्लोरोफ्ल्यूरा कार्बन्स (सी एफसी 5) वायू बाहेर पडतो. त्याच्याने हवेचं तापमान अजून वाढलं. सिमेंटमुळेही आज तापमान वाढलं आणि प्रदुषणही.
गावं आता झपाट्याने शहरीकरणाच्या अनुकरणाने मातीची कात टाकू लागली. म्हणून पडलेला पाऊस आता जमिनीत मुरत नाही. वाट सापडेल तिकडे पाणी वाहून जातं. झाडं नसल्याने पाऊस येत नाही, आलाच तर सखल भागात पुराचा कहर माजवतो. गावं आपल्या सुखसोईंसोबत प्रदुषणाच्याही आहारी जाऊ लागली. कोणाला गरज असेल तर लावा म्हणा झाडं! आज आपण सुख ओरबाडत मोकळे होऊ या.
(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© – डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 Aug 2019 - 3:56 pm | यशोधरा

लिखाण आवडलं.

पूर्वी खूप झाडं होती. जंगलं होती. नद्यांच्या थड्यांवर आमराया होत्या. भरपूर पाण्यामुळे शेती बागायती होत्या. म्हणून गावातल्या हवेत कायम थंडावा असायचा. हवा शुध्द असायची

हे डोळ्यासमोर उभं राहिलं.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2019 - 1:54 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

जॉनविक्क's picture

15 Aug 2019 - 4:38 pm | जॉनविक्क

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2019 - 1:56 pm | डॉ. सुधीर राजार...

ओके

प्रमोद देर्देकर's picture

15 Aug 2019 - 6:25 pm | प्रमोद देर्देकर

हम्म कठिण आहे सगळं .

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2019 - 1:55 pm | डॉ. सुधीर राजार...

हो

जालिम लोशन's picture

15 Aug 2019 - 11:27 pm | जालिम लोशन

सुरेख

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2019 - 1:55 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

Rajesh188's picture

19 Aug 2019 - 8:26 pm | Rajesh188

लहानपणी माझ्या गावचे जे सुंदर रूप होते ते आठवलं लेख वाचून .
पावसाळ्यात खूप पावूस पडायचा किती तरी दिवस रोज पावूस बाहेर सुधा जाता येत नसे .
नदी ,ओढ्ये पाण्यानी ओसंडून जायचे .
शाळा गावातच होती शाळेत जातानी छत्री खूप कमी लोकांकडे असायची .
पोत घ्यावे लागायचे अंगावर खोळ करून .
तेव्हा पिकांच्या जाती सुद्धा सर्व देशीच होत्या .
त्या मुळे त्यांची चव सुधा खूप चांगली होती .
त्या जाती आता अस्तित्वात नाहीत नष्ट झाल्या आता सर्व संकरित.
गहू, आणि भात ही ही पीक ओढ्याच्या पाण्यावर च यायची feb पर्यंत ओढ्याला वाहते पाणी असायचे .
पिण्याच्या पाण्यासाठी घरो घरी आड होते .
ते पाणी रस्सी chya साह्याने बाहेर काढावे lagayche.
संडास मात्र कोणाकडेच नव्हती त्या साठी ओढ्य chya बाजूला किंवा शेतात जावे लागायचे त्या साठी मात्र आम्ही सर्व मित्र मिळून जायचो .
गप्पा आणि प्रोग्राम एकसाथ चालू असायचा .
श्रावणात लोक ग्रंथ लावायचे धार्मिक वातावरण असायचे .
लोक पारावर बसून गप्पा मारायचे एकमेकाची सुख दुःख ऐकायची .
लोकांमध्ये संपर्क असायचा .
पैसे कमी होते पण लोक सुखी आणि समाधानी होती.
घर साधीच होती दर वर्षी शेखरावी लागायची साध्या कोलांची घरे होती .
जमीन महशीच्या शेनानी सारावयला लागायची .
प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी ,बैल असायचे .
आता पाळीव प्राणी सुद्धा कमी झाले आहेत.
बैल तर खूप कमी लोकांकडे च आहेत ट्रॅक्टर सर्व काम करतो .
पाहिले मच्छर नव्हते पण आता गावी सुद्धा मच्छर आहेत .
ओढ्याना आता पावसाळ्यात सुधा पाणी नसतं.
वातावरण सुद्धा गरम झाले आहे