तत्त्वमसि ।

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
11 Aug 2019 - 7:08 pm

" तत्त्वमसि"

पहिल्या घटक चाचणीचा शेवटचा पेपर देऊन शाळेच्या बसमधून येताना गार्गी आणि व्योम मनातल्या मनात कोकणातल्या आजी-आजोबांकडेच जातोय असं समजत होते. आता चतुर्दशीपर्यंत सुट्टी. आज पॅकिंग, उद्या भल्या पहाटे प्रयाण, गावात पोचल्यावर सजावटीची धामधूम, विहिरीत व ओढ्यात डुंबणे, आजीकडून खायचे प्यायचे चोचले पुरवून घेणे, आजोबांकडून अमर्याद लाड करून घेणे आणि अनंत गोष्टी या दोघांच्या मनात कोवळ्या गवतासारख्या तरारून येत होत्या.
गार्गी ९वीत आणि व्योम ६ वीत, अभिषेक आणि अर्चना यांची गोंडस मुलं. नोकरी मुंबईत आणि गाव कोकणात या पठडीतील एक मध्यमवर्गीय कुटुंब. तसं आजकाल मध्यमवर्गीय कोण? हे ठरवणे साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा समजणार नाही. गाडी, घर , पैसे खर्च करायच्या सवयी यांनी काही स्पष्टपणे उलगडत नाही. पण ही दोन्ही मुले अर्ध इंग्रजी माध्यमात शिकत होती, त्याने समाजातल्या काही घटकांना वाटते की हे कुटुंब मध्यमवर्गीय. गावाला अभिषेकचे आईबाबा, मुख्य व्यवसाय शेती. आता वयानुसार झेपत नसल्याने जमिनीची थोडीफार निरवानीरव केलेली, काही भाग जुन्या मजुरांना हाताशी घेऊन कसणे एवढंच. आजीआजोबा कर्मठ म्हणता येतील ह्या प्रकारातले. कर्मठ कोणाला म्हणायचे? याची किमान अडीच लाख उत्तरे असतील. काहीही न पाळणाऱ्याला, आरतीच्या आधी आंघोळ करून घे, असे सांगितल्यावर तोही म्हणतो, " तुमच्याकडे बुवा फारच सोवळं ओवळं." तर ठराविक नियम , तत्व ते दोघे पाळायचेच असं काहीतरी. त्या चालीरितींचा अर्चनाला कधी त्रास वाटला नाही.
सकाळी 5 वाजता अभिषेकने गाडीला चावी मारल्यावर "गणपती बाप्पा.."अशी गर्जना केल्यावर अर्ध्या झोपेतून मुलांनी "मोरया" असा प्रतिसाद दिला आणि निघाले बिऱ्हाड गणपतीला...
'चाकरमानी' या शब्दाच्या व्याख्येत मावणारे व न मावणारे सर्वच वेगवेगळ्या साधनांनी, वाहनांनी कोकणात जाऊ घातले होते. रस्ता वगैरे असं काही नसतं, तो फक्त भ्रम असतो, असतात खड्डे, विहिरी, तलाव म्हणजे गवत, झाडे सोडून जात रहायचं एक दिवस मुक्कामाला पोचणारच. बाकी गणरायाची मूर्ती गाडीत होतीच स्वतः त्रास सहन करत.सात वाजेपर्यंत अभिषेक सोडून सगळ्यांची झोप झालेली, एक छोटासा विसावा घेऊन मंडळी ताजीतवानी होऊन पुन्हा मार्गस्थ.
थोडी अंताक्षरी झाली, त्यात मधेच सोनू, भरवसा अशी गाणी येऊ लागल्याने अभिषेक आणि अर्चना वैतागले व "अरे, आपण गणपतीला चाललोय भान आहे का? काय बरंळताय?" अशा सात्विक राहवण्याने, बाप्पाची गाणी लावली गेली. काही संस्कृत स्तोत्रे गायली गेली. मुलांचं पाठांतरही होतं
कारण रोज संध्याकाळी घरात पठणही व्हायचं. विषय अथर्वशीर्षावर आला, सगळ्यांचे छान म्हणून झाले, अर्थावर चर्चा होऊ लागली. "आई बाबा ,'तत्त्वमसि..त्वमेव केवलं..त्वम ब्रह्म: ' हे आपण गणपतीलाच सांगतो? तो कोण आहे हे त्याला माहिती असणारच. 'ते तूच आहेस, तूच ब्रह्म आहेस' आणि काय काय.." गार्गीची क्षेपणास्त्र सुटू लागली. अफाट वाचन, उपजत सूक्ष्मपणे विचार करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे पालकांनी मुक्तपणे विचार करायला दिलेली मोकळीक यामुळे घरी नेहमीच साधकबाधक चर्चा घडत क्वचित रणांगणाचे रुपही होई पण ते तात्पुरतंच.
"अगं, गणपतीला माहितेय त्याचे रूप, मला वाटतं की हे आपल्याला लागू पडत असावे. जे तत्त्व त्याच्यात तेच आपल्यात, सर्वव्यापी अश्या मूळ रूपातून आपण तयार झालो असलो तर आपण त्याच्या सर्व प्रकट अथवा अप्रकट स्वरूपात आहोतंच ना?" अभिषेकचा प्रयत्न. "आणि गार्गीताई, हे बघ, गणपती मातीचा ,तसेच आपणही, माती नश्वर असल्याने तिची सगुण रूपही नश्वरच नाही का? त्याची पूजा करत करत आपणही त्याच्या तत्त्वात मिसळून जायचे, द्वैताकडून अद्वैताकडे, समजतंय का लाडोबा? संस्कृत पदवीधर
अर्चना यांचे निरूपण. पण लाडू शब्द ऐकल्याने व्योमची तत्वज्ञानातून भुकेकडे उडी पडली व लाडूंची मागणी होऊ लागली. " बाळांनो , लाडू आधी नैवेद्याला दाखवायचे मगच खायचे." नाराजीने समंजसपणा दाखवत मुलांनी दुसऱ्या गोष्टींवर ताव मारला. तसाही जेवायला एक ब्रेक होणार होताच.निसर्गाच्या हाकेलाही ओ द्यायच्या होत्या. योग्य ठिकाण मिळताच गाडी थांबली. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे आणि खूप वेळ बसून शीणलेले पाय असा अवतार घेऊन गणेशभक्त खुर्च्यांवर विराजमान झाले.
पटापट मेनू ठरला, अभिषेक व व्योम फ्रेश होऊन आले आणि मायलेकी गेल्या. त्या येईपर्यंत व्योमला चिखलाने माखलेल्या गाडीवर चित्र रेखाटायची होती किंवा आईस्क्रीम खायचे होते. अभिषेक त्याची सर्व बुध्दी पणाला लावून, सरस्वतीची आराधना करून त्याला इतर पर्याय सुचवत होता. शेवटी लस्सीवर तोडपाणी झाले.लवकरच जेवण पण आले पण मायलेकींचा अजून पत्ता नाही. हळूहळू दोघे जेवू लागले, तेवढ्यात अर्चना लगबगीने गाडीकडे गेली व अभिषेकला उघडून द्यायला सांगितली. काय हवंय ? सांगायच्या आधीच गाडीचे दार धाडकन बंद करत धावत परत गेली. आता अभिषेक पुरता चक्रावला , मागे गेला तर अर्चनाने त्याला परत पाठवले.
इकडे ह्या दोघांचे खाणे पिणे आटपले. व्योम खुर्चीवरच झोपीसुद्धा गेला. तेवढ्यात दोघीजणी आल्या, पावसाच्या रिपरिपीने थोडया भिजल्या होत्या, दोघींचा चेहरा थोडासा ताणलेला होता. "अगं, किती वेळ? काय झोपलेलात की काय? काय पळापळ गाडी उघडून चाललेली? आणि..." अभिषेकच्या प्रश्नफैरींना थांबवत गार्गीने हाताने थांबवलं आणि डावी भुवई अवकाशात भिरकावीत सांगू लागली,"बाबा, मला निसर्गाने प्रमोशन दिलं आहे. त्यामुळे थोडी गडबड होती." शांतपणे ती जेवू लागली.दोन क्षण अभिषेक ध्यानातच गेला. अर्चना आणि अभिषेकची नजरानजर झाली तेव्हा अर्चनाने 'सगळं काही ठीक आहे' असे खुणावले. नवीन काळानुसार अर्चना व अभिषेक दोघांनी गार्गीशी या विषयावर चर्चा केली होती, तिच्या सर्व शंका फॅमिली डॉक्टरकडूनही निरसन झाल्या होत्या. ती फारच नॉर्मल होती किंवा जास्तच उत्साही झाली होती. पालक म्हणून या दोघांनाच थोडे दडपण आले होते जे ते दाखवत नव्हते.
व्योम झोपलेला असताना आईने लेकीला काही सूचना दिल्या ज्या लेकीला अर्थात माहीत होत्या आणि शेवटी " आई, come on तू जगातली पहिली आई आणि मी पहिली लेक नाही. मासिकधर्माचे नियम आता काही विशेष नाही राहिलेत.आमच्या वर्गातील मी धरून फक्त पाचच मुलींना यायची होती बाकी सगळ्यांची आली आहे. " तोच व्योम उठल्याने विषय बदलला आणि गिअरही.
संध्याकाळी साडेसातला मंडळी आजीआजोबांसह जेवण घेत घेत, मुंबईतल्या गमती जमती सांगत होती. नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या खोलीत गणपतीची थोडीफार तयारी करून ठेवली होती. उरलेली उद्यापासून उद्यापर्यंतच कारण संध्याकाळी गणपती आणायचा आणि परवा भल्या पहाटे 5 वाजता पूजा. जेवून दमलेली मुलं गोष्ट ऐकत झोपी गेली. अभिषेक बाहेर तात्यांसह झोपल्यावर व अर्चना व आजी आत स्वयंपाकघरात. भांडी लावता लावता आजीला गार्गीबद्दल अर्चनाने सांगितले. "अगो बाई, आजच का आली? उद्या तयारी आणि परवा गणपती. आता तिची लुडबूड त्यात व्योम तिच्याजवळ जाणार ...असं करू वरची खोली रिकामी करू त्यात असू दे तिला. आणि हो व्योमलाही सांगून ठेव तुझ्या भाषेत." अर्चनासमोर तारे चमकू लागले . काही न बोलताच ती आवराआवर करून बाहेर पडली. अभिषेकला सर्व सांगून झाल्यावर गार्गी व व्योमच्या केसांमधून हात फिरवत दोघे झोपी गेले.
सकाळी लवकर उठून अभिषेक व अर्चनाने तात्या व आजी यांसमोर विषय काढला. त्यांच्या कपाळाची आठी काही कमी होत नव्हती.तात्या गंभीर आवाजात बोलू लागले" हे बघा, अगदी शास्त्रोक्त नको पण काही गोष्टी टाळाव्यातच. एरव्ही नाही पण देवाला, नैवेद्याला काही नियम असावेत. 4 दिवसांनी गणपती कुठे पळतायत? घेईल दर्शन सावकाशीने, आता हा विषय नको, कामाला लागू या, 4 वाजता मूर्ती आणायची आहे."
गणपतीच्या आधी गार्गीची खोली तयार झालेली. तिला आईने सर्व कमालीच्या संयमाने प्रेमाने सांगितले. पुस्तके, हेडफोन व मोबाईल घेऊन बाईसाहेबांची प्रतिष्ठापना झाली. नाश्ता झालेलाच होता, आणि तशीही तिची भूक मेलेलीच होती. व्योमवर खोट्या कारणांचा भडीमार करताना अवघे कुटुंब शिणले. तरीही तो दोन चारदा डोकावून गेलाच. दिवसभर सगळी माणसे कामात होती, रात्री सगळीजण जेवायला वरच आली. आजीआजोबा नातीची समजूत काढून गेले. अर्चना झोपायला थांबली." आई, मी देवघरात आले तर काय होईल?" या अपेक्षित प्रश्नाने दचकून अर्चना म्हणाली" विटाळ होतो गं,असं मानतात.मी नाही, ही जुनी माणसे..." पावसाच्या पागोळ्यांनी ताबा घेतल्याने उरलेले शब्द ऐकूच नाही आले. सगळेच अस्वस्थ होते, परंपरा, रूढी एका क्षणांत तयार नाही होत म्हणून तुटत पण नाहीत तेवढ्याच लवकर.
सकाळी गुरुजी येऊन गेले, पूजा आवरली, चारदोन गावकरी येऊन गेले, 'नात नाही का आली?' असे प्रश्न फेकून गेले, आवर्तने झाली, मोदक झाले, नैवेद्य दाखवून झाला, झान्जा खणखणल्या. खालतीवरती जेवणे संपन्न झाली आणि मग निजानीज .कसल्यातरी चाहुलीने अभिषेकला जाग आली. अंगावर आलेले मोदक बाजूला सारत तो कसाबसा उठून बसला तेव्हा उशाशी एक कागद मिळाला

विघ्नहर्त्या गणराया,
साष्टांग दंडवत,
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी तुझ्या दर्शनाला आले आहे. परंतु या वेळेस थोडी वेगळी रचना आहे, देखावा वर आहे आणि आपण खाली. लोक फक्त तुलाच पाहणार आणि जाणार, मखरात तर मीच आहे .तुझ्यापेक्षा माझीच बडदास्त जास्त ठेवली आहे. थोडक्यात तुला माझे दर्शन होणार नाही. त्याबद्दल क्ष्यम्यताम्। काल खूप रडू आले,राग आला. अथर्वशीर्ष म्हणाले अनेक वेळा, वाटले कोणीतरी येऊन म्हणेल 'चल खाली आता ..बस्स झाले हे ढोंग.'पण तसे नाही झाले. वाटले तू पण सामिल आहेस ह्यांच्या कटात. तुझ्या जपाची माळ धरली, खूप खूप तडफडले, मनाने खाली आले तुझ्यापुढे उभे राहून तांडव केले, गौरींना बोलावले वेळेच्या आधीच त्यांना गाऱ्हाणे घातले, पण कोणीही ढिम्म हलले नाही, शेवटी देहात येऊन सामावले. भल्या पहाटे गुरुजींचे मंत्र अस्पष्ट ऐकायला येत होते, कपाळावर हात ठेवून कल्पना करा की येथे प्राण संक्रमित झाला आहे असं काहीतरी सुरू होते आणि माझ्या कपाळावर हा कसला स्पर्श? ही तर तुझी सोंड.., डोळ्यातून पाणी का बरं वाहत आहे आणि कानात कोण बोलतंय " तत्त्वमसि, तत्त्वमसि..।" हे काय सूप कोण पाखडतंय? का हे शूर्पकर्ण? अथर्वशीर्ष कोण म्हणतंय? का जे कोणी म्हणतंय ते मीच आहे का? मग झोपेत कोण आहे? का एकंच आहे हे द्वैतरुपी अद्वैत. तुझ्या माझ्यात खेळणारं तेच ते तूच आहेस आणि मीही एकाच वेळा.
जाग आली तेव्हा 'श्री वरदमूर्तये नम:'असंच म्हणत उठले. आता स्वस्थपणा आहे, तू इथेही आहेस आणि तिथेही, हा अर्थ स्तोत्रातही होता,पण भाषेचा अडसर होता तो समजायला. पुढील वर्षी इथे यायचीही गरज नाही किंवा स्थापना करायचीही असे वाटते. अशी 'पाळी' कोणावरही आली नसेल, नाही का? ह्या पत्राचीही तशी गरज नव्हती पण शब्दांकन केल्याने द्वैतात राहता येते.
आई ,बाबा ,आजी व आजोबा तुमच्यावर अजिबात राग नाही, रुढींच्या पताका आपण सगळेच कधी न कधी अंगावर घेतोच.
गार्गी

अभिषेक गणपतीपुढे उभा राहून मोठ्ठ्याने वाचत होता, सगळ्यांच्याच अश्रूंनी देवघर भिजत होते. मधेच आजीने वर जाऊन गार्गीला हात धरून कधी आणले हे पण कोणाला कळले नव्हते. बावरलेला व्योम गार्गीला विचारत होता, " ताई, तत्त्वमसि म्हणजे गं काय?" का कोणास ठाऊक सगळ्यांच्या हसण्यातून गणपती पण हसत होता असे वाटले.

-अभिजीत श्रीहरी जोगळेकर

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

nishapari's picture

11 Aug 2019 - 9:50 pm | nishapari

छान ....

मायमराठी's picture

11 Aug 2019 - 10:01 pm | मायमराठी

__/\__धन्यवाद.

सोत्रि's picture

12 Aug 2019 - 4:40 am | सोत्रि

परखड आणि समयोचित!

- (पुरोगामी) सोकाजी

उत्तम व उद्बोधक लेख आवडला.

अभ्या..'s picture

12 Aug 2019 - 8:40 am | अभ्या..

अरे वा जोगळेकरानु,
अप्रतिम लिहिताय बरं का तुम्ही.
सुरेख

मायमराठी's picture

12 Aug 2019 - 10:22 am | मायमराठी

एक छोटासा प्रयत्न केला होता...

राजाभाउ's picture

12 Aug 2019 - 11:07 am | राजाभाउ

प्रत्येक वेळी आमचे डोळे पाणवायचेच अस ठरवलय का तुम्ही. :)
खुप मस्त लिहीता तुम्ही !! असच लीहीत रहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2019 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

छान लिहिलेय. जुन्या काळातल्या कल्पना बदलत्या काळाबरोबर असंबद्ध झाल्या की त्यांना मोडीत काढणे / बदलणे म्हणजेच प्रगल्भता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2019 - 11:32 am | डॉ सुहास म्हात्रे

छान लिहिलेय. जुन्या काळातल्या कल्पना, बदलत्या काळाबरोबर असंबद्ध झाल्या की, त्यांना मोडीत बदलणे /काढणे म्हणजेच प्रगल्भता.

जॉनविक्क's picture

12 Aug 2019 - 11:57 am | जॉनविक्क

खिलजि's picture

12 Aug 2019 - 2:02 pm | खिलजि

आईची आन , रामबाण लिखाण ,, बोल्ले तो सुप्परडुप्पर हिट ... चिंधड्या चिंधड्या उडाल्या ..

नावातकायआहे's picture

12 Aug 2019 - 2:29 pm | नावातकायआहे

चान चान!

पद्मावति's picture

12 Aug 2019 - 3:11 pm | पद्मावति

सुरेख लिहिलंय.

नाखु's picture

12 Aug 2019 - 6:55 pm | नाखु

परंपरा वाहत्या ( कालानुरूप बदल) असल्या तरच निर्मळ राहतात,नाहीतर त्यात साचलेपण येते..

मध्यमवर्गीय मिपाकर वाचकांची पत्रेवाला पांढरपेशा नाखु

छान! मांडणीतलं वेगळेपण भावतंय!

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Aug 2019 - 2:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

एक संवेदनशिल विषय तेवढ्याच संवेदनशिलतेने हाताळला आहे.
पैजारबुवा,

प्रमोद देर्देकर's picture

16 Aug 2019 - 6:27 pm | प्रमोद देर्देकर

+११ हेच म्हणतो.

साबु's picture

16 Aug 2019 - 3:11 pm | साबु

अरे वा जोगळेकरानु,
अप्रतिम लिहिताय बरं का तुम्ही.
सुरेख +१

सदस्य११'s picture

16 Aug 2019 - 3:42 pm | सदस्य११

सुरेख लिहिलय ...आवडलं आणी पटलंही.

मायमराठी's picture

16 Aug 2019 - 6:14 pm | मायमराठी

अजून मिपावर सदस्य हा लेख वाचतायंत आणि प्रतिक्रिया नोंदवत आहेत हे जाणून आजच्या संध्याकाळी मनांत केशर डोकावून गेलं, सर्वांचे धन्यवाद.

छान. सोवळंओवळं पाळणाऱ्यांना काही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं.

शित्रेउमेश's picture

19 Aug 2019 - 3:14 pm | शित्रेउमेश

खूप सुंदर.... मस्त लिहिलिये कथा...
गार्गी च पत्र तर उच्चांक....

मायमराठी's picture

20 Aug 2019 - 12:00 am | मायमराठी

अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप आभार