स्ट्रेंजर थिंग्ज

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
4 Aug 2019 - 6:07 pm

स्ट्रेंजर थिंग्ज - लेखक आशुतोष जरंडीकर

स्ट्रेंजर थिंग्ज या मालिकेबद्दल लिहावं असं खूप दिवस वाटत होतं पण त्याला न्याय देणं आपल्या लेखणीला झेपेल असं वाटत नव्हतं . आशुतोष जरंडीकर हे या प्रकारचं उत्तम समीक्षण लिहिणारे समीक्षक आहेत .. त्यांचा स्ट्रेंजर थिंग्जचं रसग्रहण करणारा हा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे ... त्यांची परवानगी घेऊन इथे शेअर करत आहे .

विज्ञान-फॅन्टसी यांचा सुरेख मिलाफ...

लेखक - आशुतोष निरंजन जरंडीकर

...

मैत्री आणि प्रेम हा समान गाभा असलेल्या हॅरी पॉटरने एक दशक गाजवलं होतं. पॉटर सोबत एक पिढी मोठी झाली होती. अशाच पुनरावृत्तीची अपेक्षा 'स्ट्रेंजर थिंग्ज'कडून ठेवायला काहीच हरकत नाही!

...

हॅरोल्ड ब्लूम या अमेरिकन समीक्षकाचे 'द एन्झायटी ऑफ इन्फ्ल्युअन्स' नावाचे एक पुस्तक आहे. १९७३ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये लेखक तत्कालीन कवींबद्दल एक निरीक्षण मांडतो. तत्कालीन कवींच्या कवितेची प्रेरणा जुन्या कवितांमधून येते. या कविता जुन्या कवितांना एक प्रतिसाद असतात, प्रतिक्रिया असतात. त्यांना स्वतःची अशी नवीन प्रेरणा नसते. हे त्याचे निरीक्षण. १९७३ मध्ये मांडलेल्या निरीक्षणाला सद्यस्थितीत कोणताच साहित्य प्रकार अपवाद नाही.

लिखित, मौखिक साहित्यामध्ये भारतीय आणि ग्रीक पुराण, ललित कलांमध्ये अगदी शेक्सपिअर, लुडविग बिथओव्हन पासून कुब्रिक, स्पिलबर्ग पर्यंत खूप काही अभिजात असं अस्तित्वात आहे. प्रेम, युद्ध आणि मृत्यू या तीन आधारस्तंभाच्या पलीकडे कोणत्याच कथेला वास्तव्य नाही. कला आणि कलाकार ही कोणत्याच निर्वातात जन्माला येत नाही. या सगळ्यामुळे नवनिर्मितीच्या प्रक्रियेला एक स्थगिती प्राप्त झाली आहे.

आपण इथे चित्रपट या माध्यमाचा विचार करू. चित्रपट या माध्यमाचा उदय, मुकपट ते 3D अशी झालेली क्रांती, त्याचा सुवर्णकाळ, चित्रपटाचे विस्तृत रूप म्हणून उदयाला आलेले मालिका हे नवीन माध्यम आणि सध्याचं दशक. ही सर्व स्थित्यंतरे तुलनेने इतर कलांपेक्षा जलद गतीने झाली आहेत. त्यामुळे अलीकडच्या काही दशकांमध्ये या माध्यमामध्ये आलेली स्थगिती ही जाणवणारी आहे. चित्रपटांचे रिमेक, गाण्यांची रिमिक्स, तंत्रज्ञान बाजूला केलं तर कथेचा गाभा सारखाच असणं हे सगळे त्यातील प्रकार.

या समस्येवर मात करण्यासाठी कित्येक प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी नवनिर्मिती होते आहे. काही ठिकाणी नुसताच आव आणला जातो आहे. काही ठिकाणी या अभिजात कलाकृतींचे विडंबन केले जात आहे. तर काही ठिकाणी या अभिजात कलाकृतींमधून प्रेरित होऊन त्यांचेच महत्त्व अधोरेखित केले जात आहे आणि हा शेवटचा प्रकार करण्यात फार कमी यश प्राप्त होतं. कारण त्याचा गाभा हा उसना आणलेला असतो. पण मूळ कलाकृतीचा अभ्यास चांगला असेल आणि स्वतःला असं काहीतरी वेगळं मांडायचं असेल तर हे छान जमू शकतं आणि हे जमून आणणारी नेटफ्लिक्सची सगळ्यात जास्त लोकप्रिय सिरीज म्हणजे 'स्ट्रेंजर थिंग्ज'.

'स्ट्रेंजर थिंग्ज'चे कथानक ८०च्या दशकात नॉर्थ अमेरिकेतील हॉकिन्स या छोट्याशा गावामध्ये घडते. हॉकिन्समध्ये असलेल्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये अमेरिकेच्या ऊर्जा खात्यांतर्गत एक प्रयोग केला जातो आणि त्या प्रयोगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करून एक दरवाजा तयार केला जातो. हा दरवाजा आपल्या विश्वाला एका समांतर प्रतलाशी जोडतो. हे सगळं एका बाजूला घडत असताना त्या प्रयोगशाळेतून 'एलेव्हन' ऊर्फ 'एल' नावाची एक मुलगी पळ काढते. प्रयोगशाळेतून पळ काढलेल्या 'एल'ची माईक, लुकास, डस्टिन आणि विल या चार मित्रांशी भेट होते. एलकडे सुपरनॅचरल पॉवर आहेत, असं या मित्रांच्या लक्षात येतं. पण दरम्यान त्यांचा मित्र विल हरवतो आणि मग या तीन मित्रांचा एलच्या मदतीने विलला शोधण्याचा प्रवास सुरू होतो.

या प्रवासाचे अनेक पदर आहेत. ८०च्या दशकातील नॉस्टॅल्जिया, विज्ञान-फॅन्टसी यांचा सुरेख मिलाफ, मैत्री, धाडस, कुतूहल, प्रेम याच्या वयानुरूप बदलत जाणाऱ्या संकल्पना, किशोरवयीन मानसिकता, शिक्षक-पालक यांचे मुलांसोबत असणारे संबंध आणि या सर्व गोष्टींची हॉरर, थ्रिलर, कॉमेडी, अॅक्शन अशी बहुविधांमधील हाताळणी.

'स्ट्रेंजर थिंग्ज'च्या यशामध्ये १९८०च्या नॉस्टॅल्जियाचा खूप मोठा हात आहे. डफर ब्रदर्स यांनी स्पिलबर्ग, स्टीव्हन किंग, टोल्कीन यांच्या साहित्याचा सुंदर वापर करून घेतला आहे. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज', 'हॉबीट', 'डंजन्स अँड ड्रॅगन्स', 'स्टार वॉर्स', 'ई.टी.', 'पोल्टरगाईस्ट' अशा अनेक अभिजात कलाकृतींचे संदर्भ यामध्ये आहेत. यातील प्रसंग आणि पात्रांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून ते नव्याने उभारले आहेत. या सर्व साहित्याचा वापर लहान मुलांच्या खेळामध्ये येतो. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित राहत नाही. या साहित्यामुळे त्या मुलांचे बालपण समृद्ध झालं आहे, व्यापून गेलं आहे. त्यांच्या मानसिकतेमध्ये या सर्व अद्भुतिका खऱ्या आहेत. त्यामुळे आपल्या गावामध्ये काहीतरी वेगळं घडतंय असं त्यांना वाटतंच नाही. ती त्यांना तेवढी मोठी समस्या वाटतच नाही. कारण ती कशी सोडवायची याची उत्तरे त्यांना या कलाकृतींमधून मिळालेली आहेत. प्रत्येक लहान मुलाप्रमाणे त्यांच्यासमोर सुद्धा त्यांचे पालक हीच एक मोठी समस्या आहे. कारण त्या समस्येचं उत्तर ते बघत आणि वाचत असलेल्या गोष्टींमधील लहान मुलांना देखील मिळालेलं नाहीये.

या सर्व गोष्टी जुन्या कलाकृतींमधून उसन्या आणलेल्या आहेत. पण त्याचा केलेला वापर नवीन पद्धतीचा आहे. त्यामुळेच हे सगळं बघणं सुखकर होतं. यासोबतच 'स्ट्रेंजर थिंग्ज'ची आणखी एक मोठी जमेची बाजू आहे, ती म्हणजे या मालिकेतील प्रमुख आणि साहायक पात्रे आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध. माईक, विल, लुकास, डस्टीन या चार मुलांची घट्ट मैत्री आहे. ते एकत्र सायकल वरून शाळेला जातात. रोज रात्री एकत्र बसून खेळ खेळतात. पण त्यातील प्रत्येकाचा एक जवळचा मित्र ठरलेला आहे. मैत्री म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, वचन म्हणजे काय याची साधी सोपी पण महत्त्वाची उत्तरे त्यांच्याकडे आहेत. यांना मुलींबद्दल एक विशेष कुतूहल आहे. यातील प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा प्रेमाच्या भाबड्या संकल्पना आहेत. पुढे त्यांच्या ग्रुपमध्ये एल आणि मॅक्स नावाच्या दोन मुली येतात. मग त्यांच्या मैत्रीची समीकरणे थोडीशी बदलतात. छोटेमोठे वाद होतात. मग एका छोट्याशा मिठीमध्ये ते वाद लगेच विरघळतात. पण वय वाढत जाईल तशी ही सगळी समीकरणे थोडी थोडी बदलत जातात आणि हे सगळं इथं छान जमून येतं.

स्ट्रेंजर थिंग्जमध्ये भौतिकशास्त्रातील ऊर्जा, प्रकाश, चुंबकत्व, विद्युत चुंबकत्व, वहन या मोठमोठ्या संकल्पनांचा साधा सोपा वापर केला आहे. या संकल्पनांचा फॅन्टसी सोबत जोडलेला संबंध ही माझी स्वतःची आवडती बाब आहे. यासाठी या मुलांना मार्गदर्शन करणारे त्यांचे विज्ञानाचे शिक्षक, या मुलांच्या मोहिमेला मदत करणारा हॉपर हा गावातील पोलीस अधिकारी, हरवलेल्या मुलाची आई आणि या लहान मित्रांची भावंडे ही साहायक पात्रे कथानकाला पूरक आहेत.

१९८३ मध्ये सुरू झालेलं 'स्ट्रेंजर थिंग्ज'चं कथानक येणाऱ्या प्रत्येक सिजन सोबत एक-एक वर्षाने पुढे सरकत आहे. मुलं मोठी होत आहेत. समस्या देखील मोठ्या होत आहेत. पण मैत्री, धाडस, उत्सुकता, जिद्द, जिज्ञासा, स्वतःवर आणि विज्ञानावर असलेला विश्वास आणि वडीलधाऱ्यांचं असलेलं प्रेम यांच्या जोरावर या मित्रांना नेहमीच यश मिळालेलं आहे. मैत्री आणि प्रेम या मूलभूत गोष्टी सोबत असतील तर कोणतीही समस्या मोठी नाही हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे. मैत्री आणि प्रेम हा समान गाभा असलेल्या हॅरी पॉटरने एक दशक गाजवलं होतं. पॉटर सोबत एक पिढी मोठी झाली होती. अशाच पुनरावृत्तीची अपेक्षा 'स्ट्रेंजर थिंग्ज'कडून ठेवायला काहीच हरकत नाही!

https://www.google.com/amp/s/m.maharashtratimes.com/c/s/m.maharashtratim...

फेसबुकवर त्यांनी गेम ऑफ थ्रोन्स मालिका व इतर अनेक मालिका व चित्रपटांवर समीक्षापर पोस्ट लिहिल्या आहेत , इच्छूकांनी त्यांच्या अकाऊंटला भेट देऊन वाचनाचा आस्वाद घेता येईल .

कलानाट्यआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

संपूर्ण कथेचा गाभा नितांत सुंदर मैत्री आणि कोवळ्या वयातील प्रेमाने भारलेला आहे.
हॅरी पाॅटरच्या जादूमयी विश्वातून मुलांना बाहेर खेचून विद्न्यानाच्या कुतूहलमयी विषयाकडे खेचण्याची ताकत ह्या मालिकेत आहे.
पण विशेषत: तिसऱया पर्वातील मुलांच्या ताेंडी असणाऱया शिव्या हा चिंतेचा विषय आहे...

एवढं काही लक्षात आलं नाही ... मोठे होत आहेत तशी भाषा बदलणं नैसर्गिकच वाटलं ...

महासंग्राम's picture

6 Aug 2019 - 10:31 am | महासंग्राम

सदर लेख पोस्ट करतांना लेखकाची परवानगी घेतली आहे का ? माझ्या माहितीप्रमाणे मिपावर कॉपी पेस्ट लेख चालत नाही, हा प्रताधिकार कायद्याचा भंग आहे

आशुतोष जरंडीकर हे या प्रकारचं उत्तम समीक्षण लिहिणारे समीक्षक आहेत .. त्यांचा स्ट्रेंजर थिंग्जचं रसग्रहण करणारा हा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे ... त्यांची परवानगी घेऊन इथे शेअर करत आहे .

nishapari's picture

6 Aug 2019 - 12:25 pm | nishapari

परवानगी घेतली आहे .