आहे पिटुकली पण कामाला दमदार

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
2 Aug 2019 - 11:17 am

अ‍ॅड्रिनल ग्रंथी आणि तिची हॉर्मोन्स

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्स ही एक महत्वाची आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५० हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात.

या ग्रंथींपैकी थायरॉइड, स्वादुपिंड आणि जननेंद्रिये ह्या अगदी परिचित ग्रंथी. याव्यतिरिक्त ज्या ग्रंथी आहेत त्या सामान्यांना सहसा माहित नसतात. अशाच एका काहीशा अपरिचित पण महत्वाच्या ग्रंथीचा या लेखात परिचय करून देत आहे. त्या ग्रंथीचे नाव आहे अ‍ॅड्रिनल (adrenal) ग्रंथी. आपल्या प्रत्येक मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूस या ग्रंथी वसलेल्या आहेत. वैद्यकाच्या इतिहासात या ग्रंथींचा शोध तसा उशीराने लागला. वैज्ञानिकांचा सुरवातीस असा समज होता की ‘अ‍ॅड्रिनल’ हा मूत्रपिंडाचाच एक विशेष भाग आहे. अखेर १९व्या शतकात पुरेशा अभ्यासानंतर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झाले. मूत्रपिंडालगत (renal) त्यांचे वास्तव्य असल्यानेच त्यांना अ‍ॅड्रिनल (ad-renal) हे नाव मिळाले. जेमतेम ५ ग्राम वजन असलेली ही पिटुकली ग्रंथी आहे. मात्र तिच्यात अनेक महत्वाची हॉर्मोन्स तयार होतात. त्या सर्वांचेच कार्य मोलाचे आहे आणि त्यातील काही तर जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधाराने करतो:

१. ग्रंथीची रचना व भाग
२. ग्रंथीतील हॉर्मोन्स
३. हॉर्मोन्सचे कार्य
४. ग्रंथीचे आजार
५. हॉर्मोन्सचे औषधी उपयोग

ग्रंथीची रचना व भाग

ही लहानशी ग्रंथी प्रत्येक मूत्रापिंडाच्या वरच्या बाजूस असते. तिचा रंग पिवळसर असतो (चित्र पहा).

pict

या ग्रंथीत रक्तवाहिन्यांचे दाट जाळे असते. ग्रंथीचे दोन स्वतंत्र भाग असतात – बाह्यपटल (cortex) आणि गाभा (medulla). हे दोन्ही भाग जरी एकत्र नांदत असले तरी त्यांची हॉर्मोन्स ही पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची आहेत. त्यांची आता माहिती घेऊ.

ग्रंथीतील हॉर्मोन्स

१. बाह्यपटल भाग: इथे ३ प्रकारची हॉर्मोन्स तयार होतात:
अ) Glucocorticoids : यातले Cortisol हे मुख्य असते.
आ) Mineralocorticoids : यातले Aldosterone हे मुख्य.
इ) Androgens : ही लैंगिक हॉर्मोन्स आहेत पण ती इथे अत्यल्प प्रमाणात तयार होतात.

वरील सर्व हॉर्मोन्स कोलेस्टेरॉल या मेदापासून तयार होतात. त्या सर्वांना ‘स्टिरॉइड’ हॉर्मोन्स असे म्हणतात.

२. गाभा : इथे Catecholamines तयार होतात आणि त्यातले मुख्य असते Adrenaline. ही हॉर्मोन्स एका अमिनो आम्लापासून बनतात.

हॉर्मोन्सचे कार्य
१. Cortisol : हे हॉर्मोन मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीच्या नियंत्रणात असते. ती ग्रंथी ACTH हे हॉर्मोन सोडते आणि त्याच्या उत्तेजनातून अ‍ॅड्रिनल Cortisol तयार करते. याच्या उत्पादनाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचे प्रमाण रोज सकाळच्या वेळी (८ वाजता) सर्वाधिक असते तर मध्यरात्री सर्वात कमी. हे निसर्गनियमानुसार आहे कारण सकाळच्या वेळेत आपल्याला सर्वाधिक तरतरीची गरज असते. निसर्गातील दिवस-रात्र या चक्रानुसार शरीरात एक ‘वेळनिर्देशक’ यंत्रणा असते आणि ती काही जनुकांच्या नियंत्रणात असते. त्याद्वारा या हॉर्मोनचे प्रमाण वेळेनुसार ठरवले जाते. परिणामी आपल्याला सकाळच्या वेळेस सर्वाधिक कार्यक्षम राहण्याची प्रेरणा मिळते.

या हॉर्मोनची दोन महत्वाची कार्ये अशी आहेत:
अ) पेशींतील चयापचयात ते महत्वाची भूमिका बजावते. ते इन्सुलिनच्या विरोधी गुणधर्माचे हॉर्मोन आहे. जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होऊ लागते तेव्हा ते ती वाढवायला मदत करते. तसेच जेव्हा आपण अतिरिक्त ताणतणावांना सामोरे जातो तेव्हा त्याची पातळी बरीच वाढते. म्हणूनच त्याला ‘स्ट्रेस हॉर्मोन’ असे म्हणतात.

आ) दाह-प्रतिबंधक क्रिया: जेव्हा कुठल्याही कारणाने शरीरात दाह (inflammation) होतो तेव्हा ते त्या प्रक्रियेला नियंत्रणात ठेवते.

२. Aldosterone : याचा शरीरातील सोडियमच्या चयापचयाशी महत्वाचा संबध आहे. त्याच्या मूत्रपिंडातील कार्यामुळे रक्तातील सोडियम तसेच पोटॅशियम यांची पातळी योग्य राखली जाते. परिणामी रक्तातील पाण्याचे प्रमाण आणि रक्तदाब हे सर्व नियंत्रणात ठेवले जाते.

३. Adrenaline : ग्रंथीच्या गाभ्यात तयार होणारे हे प्रमुख हॉर्मोन. ते शरीरात जोश निर्माण करते. विशेषतः आपल्याला जेव्हा एखाद्या अवघड परिस्थितीला ‘जिंकू किंवा मरू’ या आवेशाने सामोरे जायचे असते तेव्हा हे हॉर्मोन महत्वाचे ठरते. त्याची विविध कार्ये अशी आहेत:

अ) हृदयाचे ठोके आणि त्याची आकुंचन क्षमताही वाढवणे, रक्तदाब वाढवणे
आ) श्वसनाचा वेग वाढवणे आणि श्वासनलिका रुंदावणे
इ) यकृतातील चयापचय क्रियांवर परिणाम करून रक्तातील ग्लुकोज पातळी वाढवणे. या बाबतीत ते इन्सुलिनच्या विरोधी गटातील हॉर्मोन आहे.

व्यायाम करणे, भावनिक आंदोलने, तीव्र भीती वाटणे, महत्वाच्या स्पर्धा अथवा परीक्षेला सामोरे जाणे यासारख्या परिस्थितींत Adrenalineचे प्रमाण वाढते. त्याच्या शरीरातील वरील क्रियांमुळे आपण त्या परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज होतो.
एखाद्या आणीबाणीच्या (crisis) परिस्थितीत तर ते खूप मोठ्या प्रमाणात उसळते (rush) आणि त्यातून एखाद्या माणसात अचाट ताकद निर्माण होते. अशा प्रसंगी एरवी ‘काडीपैलवान’ असलेली व्यक्ती प्रचंड मोठे वजन उचलणे किंवा अशक्यप्राय वाटणारी मारामारी करणे असली कृत्ये करू शकते !

Adrenaline मुळे शरीरात निर्माण होणारा जोश हा एक प्रकारे मर्दानगीचे प्रतिक समजला जातो. या कल्पनेचा वापर व्यापारजगतात केलेला दिसतो. शर्यतींसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वेगवान मोटारसायकल्स व कार्सना “Adrenaline वाहने” असे संबोधले जाते.

ग्रंथीचे आजार
हे आजार तसे दुर्मिळ आहेत. दोन शक्यता असतात:

अ) क्षयरोग किंवा ऑटोइम्यून आजारांत या ग्रंथीचा नाश होऊ शकतो. त्यामुळे तिच्या सर्व हॉर्मोन्सची कमतरता होते. अशा रुग्णांत वजन कमी होणे, उलट्या, डीहायड्रेशन, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

आ) काही विशिष्ट ट्युमर्समुळे या ग्रंथीची हॉर्मोन्स जास्त प्रमाणात स्त्रवतात. तसेच ही हॉर्मोन्स जर उपचार म्हणून दिली असल्यास त्यांचेही दुष्परिणाम दिसू शकतात. अशा रुग्णांत चेहरा सुजणे, पोट सुटणे व वजनवाढ, हाडे ठिसूळ होणे आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दिसतात.

हॉर्मोन्सचे औषधी उपयोग
वर आपण पहिले की ग्रंथीच्या बाह्य विभागात ‘स्टिरॉइड’ हॉर्मोन्स तयार होतात. त्यातील Cortisol हे मुख्य आहे. त्याच्याच गुणधर्माची काही कृत्रिम ‘स्टिरॉइड्स’ औषधे म्हणून वापरली जातात. आधुनिक वैद्यकात त्यांचा वापर बऱ्यापैकी होतो. त्यांच्या गुणधर्मानुसार ती मुख्यतः खालील प्रकारच्या आजारांत वापरतात:

१. दाह कमी करण्यासाठी : दमा, सांधेदुखीचे आजार
२. अ‍ॅलर्जी कमी करण्यासाठी
३. तीव्र जंतूसंसर्ग (sepsis) झाला असताना

४. अवयव प्रत्यारोपणानंतर प्रतिकारशक्ती दाबण्यासाठी (Immunosuppresants)
५. अ‍ॅड्रिनल ग्रंथीचा पूर्ण नाश झालेला असल्यास ही हॉर्मोन्स औषधी रुपात कायम घ्यावी लागतात.

अशा विविध आजारांत स्टिरॉइड्सचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. उपचाराचा डोस आणि कालावधी यानुसार त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. विशिष्ट आजारांत स्टिरॉइड्सची उपयुक्तता बघता त्यांचे अटळ दुष्परिणाम सहन करावे लागतात. अर्थातच ही औषधे नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायची असतात हे वेगळे सांगायला नकोच !
****************************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

2 Aug 2019 - 2:13 pm | जॉनविक्क

_/\_

जालिम लोशन's picture

2 Aug 2019 - 2:41 pm | जालिम लोशन

ह्या बरोबरच रोजच्या जनरल प्रॅक्टिशनरच्या वापरातील गुल्कोकाॅरटिसाल गटातील डेक्सामिथासोन व प्रेडनिसोलन ह्या स्टिराॅइडसची ऊपयुक्तता आणी दुष्परिणाम यांची माहिती देता आली तर ऊत्तम, तसेच जीवरक्षक एपीनेफराइन इंजेक्शनबद्दल पण सांगता येईल.

कुमार१'s picture

2 Aug 2019 - 3:01 pm | कुमार१

जॉन , उद्घाटन प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

जा लो, उत्तम सूचना. नंतर भर घालतो. आभार !

कुमार१'s picture

2 Aug 2019 - 3:26 pm | कुमार१

जा लो,
१. Prednisolone : मुख्यतः दाह-प्रतिबंधक , परिणाम कमी वेळ टिकतो

२. Dexamethasone : दाह-प्रतिबंधक, अलर्जी-विरोधक, शॉक अवस्थेत देतात. परिणाम जास्त वेळ टिकतो ( Predच्या दुप्पट).

दोन्ही दीर्घकाळ दिल्यास असे दुष्परिणाम:
जठराम्ल-अधिक्य, उच्च रक्तदाब, ग्लुकोज-पातळीत वाढ, स्नायुदुखी, त्वचा पातळ होणे, हाडे ठिसूळ, इ.

कुमार१'s picture

2 Aug 2019 - 5:29 pm | कुमार१

Adrenaline व Epinephrine हे समानार्थी आहेत.

Adrenaline injection हे जीवरक्षक म्हणून खालील प्रसंगी दिले जाते:

१. हृदयक्रिया बंद झाली असता (arrest)
२. तीव्र अलर्जीक प्रतिक्रिया येऊन रुग्ण shock मध्ये गेला असता.

सुधीर कांदळकर's picture

2 Aug 2019 - 7:45 pm | सुधीर कांदळकर

डॉक्टर्स एके काळी सर्दीपडशावर एखाद्या अ‍ॅन्टीबायोटीकबरोबर सीपीएम, डेक्सामीथेझोन आणि प्रेडनीसोलोन देऊन पेशन्टला एका दिवसात फिट करून देत. मुंबईतल्या वर्क कल्चरमध्ये हे आवश्यकच असे. त्यामुळे या तिन्हीच्या अतिशय छोट्या गोळ्या मी भरपूर कुटल्या आहेत.

Cortisol : हे हॉर्मोन मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीच्या नियंत्रणात असते. ती ग्रंथी ACTH हे हॉर्मोन सोडते आणि त्याच्या उत्तेजनातून अ‍ॅड्रिनल Cortisol तयार करते. याच्या उत्पादनाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचे प्रमाण रोज सकाळच्या वेळी (८ वाजता) सर्वाधिक असते

१. याचाच उपयोग 'मोरारजी कोला' ऊर्फ 'शिवाम्बु चिकित्से'त होतो असे कुठेतरी वाचले होते. हे खरे का?

२. डोळ्यांत घालायच्या थेंबात स्थानिक उपाय म्हणून देखील अ‍ॅन्टीबायॉटीक्सबरोबर कॉर्टीकोस्टेरॉईड्स वापरत. का ते ठाऊक नाही. कळले तर बरे होईल.

लेख वाचनीय आहेच. सोबत स्मृती जागवल्यात.

अनेक, अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

2 Aug 2019 - 8:17 pm | कुमार१

सुधीर, धन्यवाद.

डोळ्यांत घालायच्या थेंबात स्थानिक उपाय म्हणून देखील अ‍ॅन्टीबायॉटीक्सबरोबर कॉर्टीकोस्टेरॉईड्स वापरत. का ते ठाऊक नाही

.>>>>

चांगला प्रश्न.

जेव्हा डोळ्याला जंतूसंसर्ग होतो तेव्हा तिथे दाहप्रक्रिया होते. आता अ‍ॅन्टीबायॉटीक्सबरोबर कॉर्टीकोस्टेरॉईड्सचे थेंब घातल्यावर असे होते:

१. अ‍ॅन्टीबायॉटीक जंतू-विरोधक म्हणून काम करते आणि

२. स्टेरॉईड्स दाहप्रक्रिया कमी करतात. त्यामुळे अशा संसर्गातून होणारी अजून गुंतागुंत – विशेषतः वण (scar) होणे - रोखली जाते.

लई भारी's picture

3 Aug 2019 - 11:45 am | लई भारी

नेहमीप्रमाणे उत्तम सुटसुटीत लेख.
बर्‍याच गोष्टी नुसत्या ऐकल्या होत्या म्हणजे 'Adrenaline rush' वगैरे. आज उलगडा झाला :-)
स्टिरॉइडची माहिती तर भन्नाट आहे. स्टिरॉइड घेऊ नयेत एवढंच ऐकलंय. सरसकट त्याविषयी भीती आहे. Cortisol कुठल्या तरी औषधाच्या घटकात वाचल्या सारख वाटतय. ते हार्मोन आहे माहीत नव्हत.

कुमार१'s picture

3 Aug 2019 - 12:05 pm | कुमार१

ल भा, धन्यवाद.

स्टिरॉइड घेऊ नयेत एवढंच ऐकलंय.

>>>>>>
ही अर्धवट माहिती झाली. यानिमित्ताने स्टिरॉइड बद्दलचे गैरसमज दूर करतो:

१. योग्य वैद्यकीय तज्ञाचे सल्ल्याने आणि ठराविक काळच ती घेतल्यास नुकसान नाही.
२. काही जुनाट किचकट आजारांत त्यांचा फायदा जरूर होतो; जरी काही दुष्परिणाम सहन करावे लागले तरी. इथे फायदा व तोटा हे तराजूत घालून पाहिल्यास फायद्याची बाजू जड राहते !

३. काही गंभीर रुग्णांत ती जीवरक्षक ठरतात.
४. भोंदू मंडळी मात्र स्टिरॉइडस छुप्या पद्धतीने देऊन त्यांचा गैरवापर करीत आहेत. हे अर्थातच धोकादायक आहे.

गुंतागुंतीचे विषय सहजसोपे करून मांडण्यात तुमचा हातखंडा आहे डॉक्टर साहेब. छान माहिती मिळाली!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2019 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच, सर्वसामान्यांना सहज समजेल अश्या भाषेतला माहितीपूर्ण लेख.

तुमच्या ताजमहालाला एक छोटीशी विट :

भावनावश आणि ताणपूर्ण (stress) काळात Adrenaline जास्त प्रमाणात निर्माण होते, "ते किती प्रमाणात निर्माण झाले तर काय होऊ शकेल", हे खालीलप्रमाणे सांगता येईल :

१. Adrenaline जास्त पण तरीही शरीरासाठी योग्य प्रमाणात निर्माण झाले तर, विचारशक्ती जास्त तल्लख होते व शारिरीक क्रिया जास्त जोमदार होतात. त्यामुळे, तणावपुर्ण परिस्थितीत खालीलपैकी कोणती कृती फायद्याची आहे हा निर्णय करून ती कृती अंमलात आणता येते...

* 'जिंकण्याची शक्यता असेल आणि/किंवा लढण्यावाचून इतर उपाय नाही' असा निर्णय असेल तर... Fight (परिस्थितीला सामोरे जाणे, लढणे).

* 'जिंकण्याची शक्यता नसेल आणि/किंवा लढण्याशिवाय इतर जास्त फायदेशीर उपाय शक्य आहे' असा निर्णय असेल तर... Flight (यशस्वी माघार घेणे, पळुन जाणे)

२. Adrenaline शरीरासाठी अयोग्य अश्या जास्त प्रमाणात निर्माण झाले तर, विचारशक्ती गोंधळते, शारिरीक क्रिया नियंत्रणाबाहेर जातात आणि माणूस मानसिक व शारिरीकरित्या गोठतो...

* हे घडणे म्हणजे, Freight (भितीने गोठून जाणे).

त्यामुळेच, "Adrenaline is a hormone of Fight, Flight, Freight" असे म्हटले जाते.

त्याचे काम धोकादायक अथवा युद्धसदृश परिस्थितीत जेवढे महत्वाचे असते, तेवढेच ते परिक्षा आणि (बैठे/मैदानी) खेळांच्या बाबतीतही महत्वाचे आहे.

कुमार१'s picture

3 Aug 2019 - 1:07 pm | कुमार१

गड्डा झब्बू, धन्यवाद

डॉ. सुहास,
छान उपयुक्त भर घातल्याबद्दल मनापासून आभार !

Adrenaline हे अगदी सळसळ उत्पन्न करते खरे .

चौकटराजा's picture

4 Aug 2019 - 5:24 pm | चौकटराजा

सर्वानाच माहीत आहे की .. निर्लज्जम सदा सुखी ..... पण सर्वच माणसे अशी नसतात. सर्वानाच माहीत आहे वैराग्य सुखाचे साधन .. पण सर्वच माणसे अशी नसतात नं ! सबब अन्यायाची चीड असणारी , कामाची विशेषतः: पटापट कामाची आवड असणारी , प्रामाणिक, पुरूषार्थवादी , महत्वाकांक्षी माणसे यातील काही गूण काही प्रमाणात असलेली माणसे " ए " पर्सोनालिटी वाली व बाकी बिनधास्त, सावकाशी. निलाजरी . हू केअर्स ,सब चालता है वाली " बी" . काही माणसांना बी मध्ये असतानाही घराण्यांची देणगी म्हणून अतिरिक्त ऍड्रिनॅलिन असू शकते. काहीना " ए" व्यक्तीमत्वाने . आता शरीर हे सवयीचे गुलाम .सबब एकदा ही अतिरिक्त ऍड्रिनॅलीन ची सवय लागली की आपण त्याला मला ब्लड प्रेशर चा विकार जडला आहे असे म्हणतो. आज ही ही घातक सवय काही मानसिक उपचाराने पूर्ण जाणे शक्य आहे असे अनेकांना वाटते.

मी अशा "ए " च्या सापळ्यात अडकलो आहे. " ए " च्या २१ गुणविशेषा पैकी जवळ जवळ १७ मला लागू होतात. ( पैशाच्या पाठिमागे लागलेला माणूस हे मला त्या २१ मधील लागू नाही. ).

आता वर आलेल्या इम्युनोसप्रेसंट औषध माझ्या बायकोच्या नशीबाला येण्याची शक्यता आहे. तिचे काही केल्या हिमोग्लोबिन ७ च्या वर जायला तयार नाही. मला पर्सिस्टंट बॉन मॅरो सप्रेशनची शक्यता वाटत आहे. आणकाही काही टेस्ट झाल्या तर स्टिरॉइड्स देता येतील असे डॉना वाटत आहे .हा २०११ पासून ताप असल्याने कर्काची शक्यता जवळ जवळ नाहीच !

बाकी हार्मोन्सचे काऱ्या नक्की काय ? तो एक केमिकल निरोप्या आहे काय ?

कुमार१'s picture

4 Aug 2019 - 5:58 pm | कुमार१

चौरा , छान प्रतिसाद

‘A ‘ ची गुणवैशिष्ट्ये आवडली . ते ‘लागू नसलेले ‘तर अधिक छान !

बाकी हार्मोन्सचे कार्य नक्की काय ? तो एक केमिकल निरोप्या आहे काय ?

>>>>
Catecholamines मध्ये Noradrenaline आणि Dopamine हेही घटक आहेत . ते रासायनिक निरोप्या आहेत.

उत्तम लेखाला सुधीरजी, डॉ. म्हात्रे आणि चौकटराजांच्या माहितीपूर्ण/अनुभवी प्रतिसादांची जोड! क्या बात है.
कुमार साहेब लेख नेहमीप्रमाणेच छान झाला आहे.

कुमार१'s picture

8 Aug 2019 - 5:04 pm | कुमार१

टर्मिनेटर,
धन्यवाद ! तुमच्या प्रतिसादाने दुधात साखर पडली आहे. लेख उपयुक्त वाटल्याचे समाधान आहे.