माथेरानची सायकल सफर

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
8 Apr 2019 - 12:34 pm

माथेरानची सायकल फेरी

मुंबईपासून सगळ्यात जवळ असा माथेरानचा डोंगर, सदाहरित जंगल अंगावर ल्यालेला. या माथेरानला घेऊन जाणाऱ्या अनेक रानवाटा आहेत; नेरळ, कर्जत जवळील छोट्या-छोट्या गावांमधून फुटलेल्या आणि माथेरानमध्ये फिरवणा-या अनेक नाजुक पाऊलवाटा. माथेरान म्हटलं की आठवते माथेरानची लाल माती, माथेरानमधील घोडे, शार्लोट लेक आणि माथेरानमधील खाऊ पळविणारी माकडे. माथेरानला घेऊन जाणारी माथेरानची राणी मिनी ट्रेन म्हणजे माथेरानचा दिमाख! माथेरानशी सलगी करणा-या अनेक आठवणी आहेत. कॉलेजच्या मैत्रीणींच्या ग्रुपबरोबर पहिल्यांदा माथेरानला गेले होते.आॕफिसच्या ग्रुपच्या पिकनिकला रात्री रेल्वे ट्रॕकमध्ये बसून गाण्याच्या भेंड्या खेळणे, घोड्यावरुन फिरतानाची मजेशीर आठवण, माकडांचा धाक दाखवून शार्लोट लेकच्या वाटेवर दोन वर्षांच्या दीपश्रीला भरविण्याची आठवण, भावंडांच्या स्नेहमिलनाच्या वेळी केलेली मजा आणि पावसाळ्यात भिवपुरी रोडहून तळ्याच्या काठाकाठानी तुडवलेली गारबेट पॉइंटची वाट, पेब किल्ल्यावरुन माथेरानला जाऊन कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेऊन रेल्वे रुळांमधून फिरलेले माथेरान आणि अगदी अलीकडे युथ होस्टेलबरोबर केलेला पोखरवाडी ते अलेक्झांडर पॉइंटचा ट्रेक आणि आणखीही बरेच काही या माथेरानच्या आठवणींच्या पोतडीत दडलेले आहे.
माथेरान हे माझे अगदी लाडके ठिकाण. येऊररच्या समर्पयामि सायकल मित्रांचे माथेरानला सायकलनी जाण्याचे ठरले. सायकलनी हा खडा चढ चढणे खरंच अवघड आहे, म्हणूनच हे आव्हान स्वीकारायचे ठरविले. तीन आठवडे सायकलला फिरायला नेले नव्हते म्हणून सायकल जरा रुसली होती. पण गुरुवारी धुळवडीच्या सुट्टीची संधी साधून सायकलला प्रेमानी आंजारुन-गोंजारुन येऊरला चार फे-या मारुन आले. मग सायकल जरा खुशीत आली आणि शनिवारी माथेरानला जायला सज्ज झाली. शुक्रवारी रात्री सॕक तयार ठेवली. २३ मार्चला पहाटे ३.४५ च्या गजराने लगेच जाग आली. सव्वाचारला किशोरीला तिकिट काढण्यासाठी संदेश पाठवला. आणि पाचची कर्जत गाडी पकडण्यासाठी पावणे पाचला ठाणा स्टेशनवर पोहोचले. मी वेळेवर येत्येय की नाही याची किशोरीला काळजी होती म्हणून ४.३५ लाच 'गाडी आली आहे, तू ताबडतोब ये.' असा किशोरीचा फोन येऊन गेला होता. स्टेशनपासून लांब राहणारे सगळे सायकल मित्र माझ्याआधीच पोहोचले होते. चार जणांच्या सायकली कर्जत बाजूच्या मालडब्यात तर आम्हा सहा जणांच्या सायकली मुंबई बाजूच्या मालडब्यात उलट्या करुन ठेवल्या आणि त्यांची काळजी घ्यायला आमचे चार मित्र असल्यामुळे मी आणि किशोरी बाजूच्या लेडिज ङब्यात जाऊन बसलो. माझ्याकडे खाऊ म्हणून फक्त एक केळं होतं पण आवश्यक त्या वस्तू म्हणजे हँड ग्लोव्हज्, फुल स्लीव्हज्, गॉगल आणि मुख्य म्हणजे शिरस्त्राण या सगळ्या वस्तू मात्र न विसरता घेतल्या होत्या. खोपोली - खंडाळा सायकल फेरी अशोक खळेजींना श्रद्धांजली म्हणून केली होती, त्यावेळी घरातून निघताना शिरस्त्राण विसरले होते; मग पहाटे पाचला अंबरनाथला राहणाऱ्या स्मिताताईला मला स्टेशनवर हेल्मेट आणून दे म्हणून सांगितले होते. ती आणि विनायक सर पहाटे पावणेसहाला माझ्यासाठी हेल्मेट घेऊन अंबरनाथ स्टेशनवर हजर झाले होते, त्याची आठवण आताही हटकून झाली. गाडीत थोड्या गप्पा आणि थोड्या डुलक्या झाल्या. नेरळ आल्यवर सायकली उतरवून घ्यायला बाजूच्या मालडब्याकडे आम्ही लगेच गेलो. गार्डनी सायकली चढवताना ठाण्याला बघितले होते. त्यामुळे सायकली उतरवेपर्यंत गाडी न सांगता थांबली होती. गार्डला धन्यवाद देऊन आम्ही पलीकडे गेलो. पाठोपाठ मागच्या गाडीनी सतीश सर आणि लक्ष्मण सर आले. आम्ही एकूण तेरा जण होतो. आमच्यामध्ये दोघे म्हणजे म्हात्रे आणि हिरेन हे उत्तम सायकलपटू आणि मेकॕनिकही होते. आदित्य आणि मयुरेश यांनी हा कार्यक्रम ठरवला होता. नेरळ स्टेशनबाहेर टपरीवर चहा घेऊन आणि पंचमहाभूतांना प्रार्थना करुन आदित्यनी काही खबरदारीच्या सूचना दिल्या. आम्ही माथेरानकडे निघालो. सायकलपटू असलेला मयुरेशचा मित्र निरंजन आमच्या बरोबर सपोर्टसाठी गाडी घेऊन आला होता. त्या गाडीला वरती सामान ठेवण्यासाठी स्टँड असल्यामुळे गरज पडली तर त्यामधून सायकली आणि सायकलस्वारही जाऊ शकणार होते. गाडीत बिस्लेरीचा दहा लिटरचा कॕनही त्यानी ठेवला होता. फक्त एक पाण्याची बाटली बरोबर ठेवून सॕक गाडीत टाकली आणि आम्ही माथेरान कडे निघालो. दुकानदार सकाळी - सकाळी रस्त्यांवर उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी बादल्या भरभरून पाणी मारत होते. त्यामुळे सचैल स्नानाची आयतीच सोय होती. 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करून आम्ही जोशात निघालो कारण नंतर सगळ्यांची हवा निघाणार होती. मी उत्साहामध्ये २/५ वर चालले होते, म्हात्रेंना ते पसंत नव्हते. ते मला १/३ वर यायला सांगत होते आणि मला ते मान्य नव्हते. सुरुवात अशी जोरदार झाली.
मस्त हवा होती. आता आमच्या आगमनामुळे सुस्त रस्ते जागे झाले. मधेच ऊन मधेच सावली; रस्ता मात्र गुळगुळीत होता. मयुरेशला त्यानी दोन वर्षांपूर्वी केलेल्या माथेरानवारीच्या वेळचा खडबडीत रस्ता आठवत होता. किशोरी सुरुवातीला अगदी वेगात चालली होती, मी मात्र मध्यम गतीनी पुढे सरकत होते. म्हात्रे पुढे जाऊन कोण कुठे आहे, कोणाला काही मदत हवी आहे का याची काळजी घेत होते. मयुरेश आणि आदित्य गार्डच्या डब्यांना पुढे ढकलत होते, सायकलने कसे चढावे याचे तंत्र शिकवीत होते. थोडे मागे फिरुन पुढे चढायला सांगत होते. हे मागे फिरुन वळण घेऊन पुढे चढण्याचे तंत्र भारी आहे. पण वाहत्या रस्त्यावर मध्येच असे वळण घेणे अवघड असते. म्हात्रे जाता-जाता सूचना देऊन गेले , जुम्मापट्टीला काही जण थांबले आहेत, तिथेच थांबा त्यांच्या पुढे जाऊ नका. जुम्मापट्टी रेल्वे स्टेशन आलं आणि एक वळण घेऊन पुढे गेल्यावर हॕपी पिकनिक पॉइंटला काही जण थांबलेले दिसले. चढाईचा हा पहिला टप्पा तर हसतच गाठला होता. एनर्जी बारचा एक-एक तुकडा खाल्ला आणि मजेत गप्पा सुरु झाल्या. सगळे जण पोहोचल्यावर निरंजनची गाडी आली. गाडीमध्ये आदित्यनी स्वतः तयार केलेला नाश्ता होता. स्ट्राॕबेरी क्रीममध्ये मुबलक सुका मेवा घालून दोन मोठे डबे गच्च भरुन आणले होते. सगळ्यांसाठी बाउल्स आणि चमचेही होते. असा दमदार नाश्ता घेऊन आम्ही पुढे निघालो. आता खडा चढ सुरु झाला. पण माझी सायकल अजून १/३ वरच होती. कारण आपण उभे राहून सायकल दामटवू या असा मला फाजील विश्वास होता. मग एका कठीण क्षणी चाकांनी पुढे जायला नकार दिला. आणि पेडल्सही अडूनच बसली. आता खाली उतरून पुन्हा चढणे क्रमप्राप्त होते. बरोबर मयुरेश आणि म्हात्रे होतेच. मी मुकाट्याने सायकल उलटी फिरवली. आणि खाली गेले पण रस्त्यावर सफाईदार वळण घेणे काही जमेना. माझ्या तंत्राप्रमाणे मी अजून थोडे खाली जाऊन आडवे जात सायकल सुरू केली असती पण उत्साही म्हात्रे म्हणाले तुम्ही बिनधास्त पॅडल वर पाय ठेवा मी आहे मागे मग पटापट१/२ - १/१ वर आले आणि माझी गाडी मार्गी लागली. मग मात्र मी मनाशी खूणगाठ बांधली की आता आगाऊपणा न करता मुकाट्यानी १/१ वर सायकल न्यायची. जुम्मापट्टी पर्यंत एक घोटही पाणी पिण्याची गरज पडली नव्हती. पण आता ऊन होऊ लागले होते. वाॕटर पाईप स्टेशनच्या अलीकडे दोघे- तिघे थांबले होते. माथेरानची राणी उजवीकडून येणार होती. सतीश सरांनी स्टेशनवरून विलायती चिंचा घेतल्या होत्या. त्यांचा मस्त आस्वाद घेत टाइमपास सुरू होता. तेवढ्यात झुक - झुक गाडी आली. तिचं व्हिडिओ शूटिंग सुरू झाले. तेवढ्यात कोणी पटकन उडी मारून गाडीत चढले आणि फोटो काढून घेतला. अशी गंमत जंमत केल्यावर रुळ ओलांडून पुढे निघालो. असे करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण सायकल चे चाक घसरण्याची किंवा अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे रुळावरून चपळाईने सटकावे लागते. माझ्यापुढे पुढे राज, लक्ष्मण नवले आणि सतीशसर निघाले होते. नंतर मला नवले भेटले, राज पुढे दिसत होता. सतीश सर मात्र कुठे दिसेनात. मी आणि नवले सर जरा गप्पा मारत चाललो होतो. तेवढ्यात ठाण्याचे जाधव सर ही आले. दरीच्या भिंतीला टेकून थोडे विसावून आणि पाण्याचे दोन घोट घेऊन मी पुढे निघाले. आता मी ठरवले होते की जास्त गंमत करत बसायचे नाही, दोन क्षण विसावून लगेच पुढे निघायचे आणि चाकांची आणि पेडल्सची फार परीक्षा बघायची नाही, पायांनी संप पुकारे पर्यंत वाट बघायची नाही, दोन वळणे झाली की आपल्या शक्तीचा अंदाज घेऊन मुकाट्याने अशी जागा बघून थांबायचे की तिथून सायकल पुन्हा सुरू करता येईल. आणि शरीराने मागण्या आधीच दोन घोट पाणीही प्यायचेच. हे अनुभवाचे तंत्र शंभर टक्के यशस्वी ठरले. आणि वाॕटर पाईप स्टेशन नंतर तीन वेळा लघु विश्राम घेऊन मी राजच्या पाठोपाठ दस्तुरीला पोहोचले. हे तीनही विश्राम मी इतर कोणी थांबले म्हणून नाही तर मला हवे तिथे सावली आणि रस्त्याचा उतार बघून घेतले होते. पण सतीश सर वाटेत कुठेच दिसले नव्हते; हे न थांबता कसे गेले म्हणून मी हैराण होते.
बरोबर साडेनऊ वाजता मी आणि राज दस्तुरीला
पोहोचलो. दस्तुरीला सगळे घोडेवाले आणि टॅक्सीवाले आमच्या दुक्कलीबद्दल सायकल घेऊन आलेले असल्यामुळे उत्सुकता बाळगून होते. भरपूर माकडे झाडांवर बागडत होती. आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला मारलेल्या पत्र्याला सायकली टेकवून गप्पा मारत बसलो. मी बाटलीतले शिल्लक पाणी संपविले. हळूहळू घोडेवाल्यांची भीड चेपली. कुठून आलात, किती वेळ लागला, कोण-कोण आला आहेत इत्यादी प्रश्न सुरू करून सायकलची किंमत किती, गिअर कसे टाकायचे वगैरे - वगैरे अनेक गोष्टी त्यांनी विचारून घेतल्या. त्यांनाही तिथे सायकल चालवून बघण्याची इच्छा वाटत होती. राज हा आमच्या ग्रुप मधला वयानी सगळ्यात छोटा भिडू होता. तो कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. त्याची सायकल त्याला स्केटिंग मध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्याच्या काकांनी बक्षीस म्हणून दिली होती. राजला ट्रेकिंगची आणि मोटरसायकल, गाड्या चालविण्याची ही आवड होती. त्यामुळे आमच्या गप्पा रंगात आल्या. साधारण सव्वादहा नंतर आमचे एक - एक भिडू यायला सुरुवात झाली. तेव्हा उलगडा झाला की सतीश सर रानमेवा घ्यायला वाॕटर पाइप स्टेशनमध्ये शिरले होते. साडेदहा वाजता मयुरेश, आदित्य, किशोरी आणि निरंजन आले. मग प्रत्येकाचे टाळ्या वाजवून स्वागत, शुभेच्छा देणे आम्ही मनापासून केले. कारण माथेरानचा घाट सायकलने चढणे ही अती अवघड अशी श्रेणी आहे आणि सगळ्यांनी ही सायकल स्वारी पूर्ण केली होती. त्यामुळे विशेष उत्साहाचे वातावरण होते. मग थोडे वर चढून फोटो झाले आणि मिठ्ठास संत्र्यांचा व एनर्जी बार्सचा आस्वाद घेतला. गुलाबी विलायती चिंचाही सोबतीला होत्याच. थोडी मजा झाल्यावर निघायचे झाले. सगळ्यांनी पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. मुख्य भाग झालेला असला तरी खाली जातानाही सावधगिरीने जाणे आवश्यक होते. बहुतेक सगळ्यांकडे माऊंटन बाइक होत्या. पण माझी सायकल हायब्रीड आहे. माऊंटन बाइकला डिस्क ब्रेक असतात; ते उतारावरही चांगले लागतात. तसेच चढावर जाताना सस्पेन्शन लाॕक काढल्यामुळे चढ चढणे थोडे सोपे पडते. माझ्या सायकल ला V ब्रेक आहेत. त्यामुळे उतरताना मी अगदी जपून जाणार होते. निघण्याआधी आदित्यने सर्वांना गवती चहाच्या सुगंधी आणि थंड पाण्याचा हातांवर, तोंडावर फवारा मारला. ही अक्षरशः उच्च दर्जाची चैन होती. मी सर्वात पुढे निघाले पण माझ्या मागून येऊन सगळे सुसाट गेले. मी मात्र अतिशय मर्यादित वेगाने तंत्र सांभाळत शांतपणानी आणि घाट उतरले. कारण या आधी बोर घाटात माझ्यासमोर बारावीतला एक मुलगा वेग आवरता न आल्यामुळे जोरात आपटून त्याला फ्रॕक्चर झाल्याचे मी बघितले होते. घाटाचा राजा अशोक खळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दूर-दूरहून आमच्यासारखे अनेक सायकलस्वार खोपोली- खंडाळा सायकल फेरी करुन परत चालले होते, त्या वेळची ही घटना. माथेरानहून निघताना इथून कर्जतला न जाता आपण ठाण्यापर्यंतही सायकलने जाऊ शकतो असा माझा विचार मी मयुरेश ला सांगितला पण मी - मी म्हणणाऱ्या उन्हामुळे त्याला तो फारसा रुचला नसावा. शिवाय त्याला ग्रुप मधल्या सर्वांच्या क्षमतेचा विचार करणे गरजेचे होते. मी आणि राज तर अरे हा तर एकच लूप झाला अजून एक लूप करू या, असेही सगळे वर आल्यावर त्यांना सांगत होतो. चढ चढायला किती वेळ लागतो; उतरताना तेच अंतर पंधरा मिनिटात कापले गेले. जुम्मापट्टी ला हॕपी पिकनिक पॉइंट ला आता सगळे ताक पीत होते. ताक संपले म्हणून लिंबू सरबताची ऑर्डर दिली आणि गरमागरम वड्यांवर ताव मारण्यासाठी सगळे सज्ज झाले. इथे मुलुंडच्या समर्थ वडापाव वाल्या बहात्तर वर्षांच्या खेडेकर काका आणि त्यांच्या पुतण्याची ओळख झाली. माथेरानला सायकल फेरी मारण्याचा काकांचा उत्साह अतुल्य होता आणि त्यांनी त्यासाठी पुरेपूर प्रयत्नही केला होता. अरुणाताई पण आल्या असत्या का? साठी ओलांडून पुढे आल्यावर देखील अरुणाताईंचा उत्साह आणि स्फूर्ती एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. जाधव सर, नवले सर, सतीश सर, खेडेकर सर ही सारी बुजुर्ग मंडळीही आम्हाला असेच स्फूर्तीदायी चित्र दाखवतात आणि माणूस हा वयानी नाही तर मनानी म्हातारा होतो हे वाक्य अगदी मनोमन पटते.
सगळे सुखरुप खाली उतरले. इथे कर्जत कडे जाण्यासाठी उजवीकडे वळायचे होते. या चौकात शिवजयंतीनिमित्त शिवसेनेची बाईक स्वारांची मिरवणूक होती. त्यांनी आमच्या सायकलींनाही भगवे झेंडे लावून आमच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केले. शिवाजी महाराजांचा जयजयकार करून आम्ही कर्जत कडे रवाना झालो. आता भट्टी चांगलीच तापली होती, पण रस्ता सपाट होता. वाटेत एक-दोन ठिकाणी थांबून सुगंधी जल फवारून आदित्य आणि निरंजननी आमचे लाड पुरवले. कर्जत स्टेशन बाहेर सतीश सरांनी जाम घेतले. निरंजन पोहोचल्यावर त्याच्या गाडीतून सामान घेऊन आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानून आम्ही १.२७ ची कर्जत-ठाणे गाडी पकडण्यासाठी पूल पार करून फलाटावर आलो. सायकली माल डब्यात लावून घ्यायला हिरेन मदतीला आलाच. आम्ही लेडीज डब्यात गेल्यावर किशोरीकडून कळले की घाट चढताना तिला पायात गोळे आल्यामुळे बराच त्रास झाला पण निरंजननी तिला ॲक्युप्रेशर च्या उपचारांनी लगेच उभे केले आणि आदित्य, मयुरेश आणि म्हात्रे यांच्या प्रोत्साहनामुळे ती हा सगळा चढ चढून येऊ शकली; किशोरीच्या प्रयत्नांना खरंच सलाम!आता पुढची माथेरान फेरी मात्र परत येताना ठाण्यापर्यंत करण्याचा मानस आहे.

प्रतिक्रिया

मनिषाचा प्रियकर's picture

8 Apr 2019 - 1:08 pm | मनिषाचा प्रियकर

खूप छान. फोटो असते तर आम्हालाही माथेरान पहाता आले असते.

पाषाणभेद's picture

12 Apr 2019 - 4:09 pm | पाषाणभेद

+१
सुंदर लेखन.
प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते.

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2019 - 1:15 pm | चौथा कोनाडा

एक नंबर भटकंती वर्णन ! खूप ओघवतं. स्वतःच सायकलिंग करत माथेरान चढतोय असं वाटलं! भारी.
आमच्या एका जुन्या सायकल सफारीची आठवण झाली.

फोटो आणि दोन परिच्छेदांमध्ये ब्रेक असते तर लेखाला चार चांद लागले असते !

कंजूस's picture

8 Apr 2019 - 2:51 pm | कंजूस

व्वा!!

अन्या बुद्धे's picture

9 Apr 2019 - 12:25 pm | अन्या बुद्धे

झकास!
येत्या रविवारी हे करायचं ठरवलं आहे..

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Apr 2019 - 1:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

मजा आली वाचायला

सोन्या बागलाणकर's picture

12 Apr 2019 - 5:48 am | सोन्या बागलाणकर

वाह!
माथेरान माझीदेखील अतिशय आवडती जागा आहे.
तिथे सायकलने घाट चढणे किती कठीण आहे याची जाणीव आहे. तुमच्या प्रयत्नांना सलाम!

mayu4u's picture

13 Apr 2019 - 3:34 pm | mayu4u

जमल्यास फोटो टाका.

निशाचर's picture

14 Apr 2019 - 5:39 am | निशाचर

सफर आवडली.

किरण कुमार's picture

16 Apr 2019 - 12:30 pm | किरण कुमार

मस्त वर्णन , काही निसर्गाचे आणि सायकल फ्रेम मध्ये असलेले फोटो लेखनात अपेक्षित