सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 5 : हरिहरेश्वर ते अलिबाग

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
31 Mar 2019 - 3:18 pm

18.03.2019

आजचा पल्ला या सफरीत सगळ्यात मोठा असणार होता. 110 km. या आधी 81, 105, 99, 98 असे टप्पे करून झालेले होते. रस्त्याची दूरावस्था आणि सतत चे चढ उतार आणि दुसरं म्हणजे सायकल ला हेड/टेललाईट नाहीत म्हणून साडेसहा नन्तर सायकलिंग नाही या मुळे 110 पूर्ण करून अलिबाग मध्ये पोचता येईल की नाही याबाबत साशंक होतो. म्हणून काल रात्री 7 आसपासच काशीदमध्ये 'पेमेंट ऑन आराइवल बेसिस वर' रूम बुक केली होती. त्या नंतर रात्री मोगलीशी फोनवर बोललो. त्याच अलिबागमध्ये घर आहे. मी येतोय एवढ्यासाठी तो लॉन्चमध्ये बाईक टाकून अलिबाग मध्ये येणार होता. 'काशीद अलिबाग अगदी जवळ आहे. मला काही सांगू नको. मुक्काम माझ्याकडेच… तुला नाही जमलं तर मी बाईक घेऊन येतो. शेवटचे 20 km सायकल मी चालवेन हवंतर.' या शब्दात त्याने अल्टीमेटम दिला. त्याच्या आग्रहाला मान देत, आज मुक्काम अलिबाग, अस म्हणून सकाळी 6 ला हॉटेल आणि हरिहरेश्वर सोडलं.

आज हवेत छान गारवा होता. या सफरीतला सगळ्यात छान. हरिहरेश्वर सोडलं आणि आजच्या प्रवासातला पहिला घाट लागला. होता छोटासाच पण थंडी पळवायला पुरेसा होता. अंग मस्त गरम झालेलं आणि हाताची बोटं थंडीने आखडलेली असा मजेशीर प्रवास सुरु होता. रस्ता खोलात उतरला की तिथे धुकं साचलेलं असे. त्यातून पार झालो की ते धुकं चष्म्यावर! आता सूर्य नीट वर येईतो चष्मा नकोच अस म्हणून तो शर्टला लावला. आसपास गावं जस्ट झोपेतून जागी होत होती. सगळीकडे पाणी भरायची धांदल आणि शाळेकडे रमत गमत निघालेली मुलं असं दृश्य. मध्ये एकेठिकाणी मी चढ पार करून वर येतोय, टॉपला एका वडाच्या झाडाखाली म्हशी रवंथ करत उभ्या आहेत, पलीकडे वर चढणारा सूर्य त्यांनी झाकलाय पण त्याचे सोनेरी किरण म्हशीच्या गळ्या डोक्यावरच्या केसातून येताहेत असं दृश्य दिसलं.या फ्रेमच्या मोहाने चढावर असून थांबलो आणि ती सुन्दर दिसणारी म्हैस कॅमेरात कैद केली. एकदम गौतम राजाध्यक्ष फील! फक्त इथे प्रकाशयोजना निसर्गानेच केली होती. :)

सततचे चढ उतार पार करत दीड तासाने एका टपरीवर थांबलो. तिथे गप्पा करताना पुढला रूट समजून घेतला. श्रीवर्धन दिवेआगर ला लांबूनच टाटा करून आरवी पर्यंत जायचं आणि तिथला सहज लक्षात न येणारा फाटा थेट दिघीकडे जातो असं समजलं. निवांत कॉफी घेऊन निघालो. एकूण 45 km दिघी/राजापुरी उरले. आत्ता 8 होऊन गेले होते. म्हणजे आता tp न करता रपेट मारायला हवी होती तर साडेबारा पर्यंत मुरुडला पाटील खानावळीत जेवण घेऊन 2 तास आराम करता आला असता. आता फारच छान काही दिसलं तर थांबायचं. नाहीतर 20 km झाल्याशिवाय नो हॉल्ट असं ठरवून निघालो.

आता गावं तुलनेने लगेच येत होती त्यामुळे कदाचित, रेफ्रँसेस मिळत गेल्याने प्रवास वेगात सुरुए अस वाटत होतं. सव्वा तासात पहिला 20 km टप्पा पार झाला. साडेनऊ होऊन गेले तसं ऊन जाणवायला लागलं. दिघीच्या अलीकडे एक घाट आहे तेवढाच.. या माहितीवर भरोसा ठेवला तर 12 आधी दिघी शक्य होतं. पण न सांगितलेला घाट आचानक समोर यायचा, खराब रस्ता मधेच येऊन छळायचा कालचा अनुभव ताजा असल्याने वेळ न घालवता निघालो. आरवी अलीकडे एका पंपावर हवा परत चेक करून भरून घेतली. आणि अर्ध्यातासात आरवी आलंच. या प्रवासात एक अनुभव आला. एकटाच सायकलवर भटकणारा असल्याने लोक इंग्रजीतच बोलायचे. एका रेकत चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना डायवरला विचारलं 'आरवी सरळच ना?' तर त्यावर यस एस गो स्ट्रेट असं उत्तर आलं. नन्तर आरवीला देखील टपरीवर चहा पिणाऱ्या घोळक्याकडे सखीला उभं करून जात होतो तर एक 70चे गृहस्थ 'व्हॉट हॅपंड? एनी हेल्प?' असं विचारते झाले. पुढली 2एक वाक्य माझ्याकडून मराठीत गेल्यावर मराठीत उत्तरं मिळाली.

आरवी फाट्यावरून निघाल्यावर 3एक km मध्ये मोठा घाट लागला. 4 km तरी असेल. त्याच्या पायथ्याला थांबून चिक्की थांबा साजरा केला. सखीच्या बाटलीत इलेक्ट्रोल टाकलं. थोडं प्यायलं आणि निघालो. मिळालेली माहिती खरी असेल तर हा घाट चढून उतरला की दिघी असायला पाहिजे. पण अंतराचा हिशोब केला तर घाटा नंतर 10-15 km तरी हवेतच. म्हणजे हा अचानक समोर आलेला घाट. मध्ये tp केला नाही ते बरंच झालं. सुरवात 1-6 ने करून शेवटी 1-4/3/2 करत टॉप गाठला. सहज डावीकडे बघितलं तर डॉगराचा पदर सावरी कापसाने भरलेला होता. आठवण म्हणून मूठभर कापूस गोळा केला आणि कागदात गुंडाळून सॅक मध्ये टाकला. नन्तरच्या उतारावर तरंगत एका मोठ्या गावात पोचलो. इथे बोर्ड दिसला. दिघी 11 km. कॉफी ब्रेक घेऊन लगेच निघालो.

आता रस्त्याला चढ होते पण उतार जास्त. आणि रस्ता अधिकाधिक खराब होत होता. पुढे तर जोरदार खोदकाम सुरू होतं पोकलेन वगैरे लावून. वरन ऊन भाजत होतं आणि रस्ता खराब. अशात परत एक घाट आला. हाही 3-4 km असेलच. रत्यात केवळ सावली नाही म्हणून न थांबता पेडल हाणत घाट चढवत होतो. दर 2 मिनिटांनी घोटभर गरम पाणी.. शेवटी अर्धा km घाट बाकी असताना डाव्या दरीत पायऱ्या उतरताना दिसल्या. नीट पाहिलं तर एक मंदिर आणि अंगणात नंदी. लगेच थांबलो. सखी उचलून पायऱ्या उतरत मंदिरापर्यंत पोचलो. कुणीतरी नुकतंच मंदिर धुवून स्वच्छ केलंय असं दिसत होतं.
नुकतीच पूजाही झालेली होती. एका बाजूला सावलीत 2 कळशा स्वच्छ थंड पाणी भरलेलं होतं. ताबडतोब जामानिमा उतरवून मिनी अंघोळ करून फ्रेश झालो. थोडी शोधाशोध केल्यावर मागे काही अंतरावर डोंगरातील पाझरणाऱ्या पाण्याचं कुंड दिसलं. परत दोन्ही कळशा भरून ठेवल्या. शंकर आहे म्हणजे आसपास छान पाणी असणारच. माझ्यासारख्या भटक्याला शंकर मंदिर आवडतं ते उगाच नव्हे. कितीही ऊन असो, आत थंडगार, शांत आणि पाण्याची उत्तम सोय. माझ्यासारख्या भटक्याला आणखी काय हवं!

एकूण निवांत अर्धातास तिकडे काढून निघालो. अगदी फ्रेश वाटत होतं. टीशर्ट ओला करून पिळून परत घातलेला. त्यामुळे गार वाटत होतं. पलीकडे उतरून 20 मिनिटात दिघी आलंच. अजून अर्ध्यातासाने बोट सुटली आणि सव्वा बारा आसपास आगरदांड्यावर उतरलो. इथे एक लिंबू सरबत पिऊन निघालो. इथून मुरुड 8-9 km. पहिल्या 2 km नंतर लगेच चढाव सुरू झाला. पण आता डावीकडे समुद्राचं दृश्य, त्यावरून येणारा वारा यामुळे झकास वाटत होतं. बरोबर एक वाजता पाटील खानावळीत बसून मालकांशी गप्पा करत जेवणाची ऑर्डर दिली होती. जेवल्यावर तिथल्याच नारळी बागेत सावलीत लुंगी अंथरून पावणेतीनचा गजर लावून डाव्या कुशीवर झोपून गेलो.

बरोब्बर 3 ला सखीच्या बाटलीत लिंबू सरबत आणि सॅक मध्ये थंड पाण्याची बाटली घेऊन निघालो. आता अंतर 55 km आणि हाती वेळ साडे तीन तास. काशीद इथून 15 km. मोगलीला कॉल करून सांगितलं की मी सांगितल्याशिवाय अलिबागमधून निघू नको. 99% मला साडेसहा पर्यंत पोचणं जमेल. आता रस्ता बऱ्यापैकी सरळ होता. चढ होतेच पण तितकेच उतार देखील. म्हणून चांगला ताशी 18 वेगाने काशीद बीचवर पोचलो. तिथे मस्त हॅमोक मध्ये पडून समुद्र पहात कॉफी घेतली. सतत लिंबूपाणी प्यायल्यावर कॉफीची कडसर गोड चव छान वाटत होती. आता निघालो तेंव्हा अंतर उरलेलं 33 km आणि हाती वेळ दीड तास (सहा पर्यंत. संधीप्रकाश जमला धरला तर साडेसहा पर्यंत 2 तास).

फणसाड अभयारण्य मागे पडलं आणि अलमोस्ट सपाटी सुरू झाली. मधेच कधीतरी छोटा चढ. हर्णे सोडल्यापासून पहिल्यांदा पुढे तिसरा गियर टाकला. प्रवास आणखी वेगात होऊ लागला. आता त्रास फक्त खराब रस्ते. 5 आसपास चौलमध्ये आलो आणि फफेच्या दुकानासमोरच थांबलो. त्यांना म्हटलं 100 ग्राम पेढे द्या. त्यांनी विचित्रपणे माझ्याकडे बघितलं. त्यांच्याकडे इतके कमी पेढे कुणी घेत नसेल. मग मीच परत सांगितलं.. मला वडे वगैरे तेलकट खायचे नाहीयेत आत्ता. सोबतचे खजूर खायचा कंटाळा आलाय. मी अलिबाग मधल्या तुमच्या औटलेट मधून उद्या जास्त घेईनच पण आत्ता मला पाठीवर वजन नकोय. आत्ता 10-12 पेढेच खाईन म्हणतो. म्हणून 100च ग्राम. त्यांनी हसून मान हलवत पेढे दिले. ते तिथेच कट्यावर बसून संपवले. आता साडेसहापर्यंत नक्की पोचतो असा विश्वास वाटत होता. तसं मोगलीला कळवून टाकलं. म्हणाला ये लौकर म्हणजे पटकन मासे घेऊन येऊ. म्हणजे मग रिलॅक्स. यथावकाश नागाव आक्षी करत समोर मावळता सूर्य पहात अलिबागमध्ये एन्ट्री घेतली. मोगली वाट बघत होताच. सामान सखी घरात ठेऊन लगेच परत बाहेर पडलो.

आता उद्या रेवस पर्यंत सायकलिंग नन्तर लॉंचने मुंबई आणि ट्रेन ने बदलापूर अस असल्याने सफर आजच संपल्यात जमा होती.

क्रमशः

-अनुप

प्रतिक्रिया

हा भागही आवडला. फोटो टाकले असतेत तर मजा आली असती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2019 - 6:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो पाहिजेत राव.

-दिलीप बिरुटे

मिपावर टंकनाच्या अडचणी सुटत नसतील तर गप्प राहणेच बरं..

प्रसाद_१९८२'s picture

31 Mar 2019 - 7:41 pm | प्रसाद_१९८२

खूप छान लिहिलेय.

प्रचेतस's picture

1 Apr 2019 - 9:09 am | प्रचेतस

मस्तच लिहिताय भो.

गोरगावलेकर's picture

1 Apr 2019 - 10:01 am | गोरगावलेकर

सलग सर्व भाग वाचून काढले. मस्त वर्णन. मुंबई-अलिबाग-हरिहरेश्वर-केळशी-हर्णे-दापोली-खेड-मुंबई अशी सहल एकदा केली आहे त्यामुळे प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.